विनायक पात्रुडकर
गुन्हा कोणताही असो, त्यामागे स्वार्थी वृत्ती दडलेली असते. कोणाला शरीराची लालसा असते, कोणाला मालमत्तेची, तर कोणाला पैसा आणि दागिन्यांची. मोह आवरत नाही आणि मग तो कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही. लहान मुलं, अंथरूणाला खिळलेले शरीर, अशा कोणत्याही अवस्थेतील व्यक्तीचा बळी स्वार्थासाठी जातो. सतत जागी असलेली मुंबईसारखी शहरेदेखील अशा घटनांसाठी अपवाद राहिलेली नाहीत. या मायानगरीत कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने ७० वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केला. ही महिला एकटी राहत होती. तिच्याकडे खूप दागिने होते. आरोपी जोडप्याचे या महिलेकडे रोजचे जाणे-येणे होते. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्या महिलेचे दागिने चोरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महिलेने त्याला विरोध केला. अखेर त्या दोघांनी महिलेचा खून केला.
मुंबईपोलिसांची ख्याती जगभरात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना पोलिसांनी तयार केल्या आहेत. गेली दोन वर्षे या उपाय योजनांची घोषणा दणक्यात केली जाते. घरात एकट्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी पोलीस जाईल, त्यांची चौकशी करेल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे. असे असताना ७० वर्षीय महिलेच्या हत्येसाठी नेमके दोषी कोणाला धरावे. हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे की सर्वसामान्य नागरिकांचा निष्काळजीपणा. २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा अधिक अद्ययावत झाली. नवनवीन तंत्रज्ञान पोलीस ताफ्यात दाखल झाले. नाक्या नाक्यावर सीसीटीव्ही लागले. तरीही घरात एकट्या असलेल्या महिलेचा जीव जाणे हे पोलिसांना शोभनीय नाही. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही जबाबदारीने वागायला हवे. वयोवृद्ध महिला घरात एकटी राहते. तिच्याजवळ दागिने कशासाठी होते. बँकेत दागिने ठेवण्याची व्यवस्था असते. वेळेला आपण ते बँकेतून काढूही शकतो. मग घरात दागिने का ठेवावेत, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येणार नाही. जीवघेण्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतात, त्यासाठी नागरिकांचीही मदत आवश्यक असते. ज्येष्ठ नागरिक लहान मुलांप्रमाणे असतात. त्यांना काय द्यावे, काय देऊ नये, त्यांच्याजवळ काय असायला हवे किंवा त्यांना एकटे सोडू नये, अशी काळजी घ्यावी लागते. यात कसूर केल्यास अनुचित प्रकार घडतो. तेव्हा भविष्यात पैशासाठी ज्येष्ठ नागरिकाचा बळी जाऊ नये, यासाठी सर्वांनीच सर्तक राहायला हवे. कुटुंब, शेजारी, अशा प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सतर्क राहायला हवे. तरच अशा घटना टाळात येतील. अन्यथा मुली व महिलांसाठी असुरक्षित असल्याचा ठपका मुंबईला लागलाच आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचीही भर पडेल.