कायद्याच्या रक्षकांना वर्दीतील गुन्हेगारांप्रमाणे वागू दिले तर समाजात अराजक माजेल, अशा कठोर शब्दांत ठपका ठेवत वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तब्बल १८ वर्षांपूर्वी रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैया याची कथित एन्काउंटरमध्ये हत्या केल्याबद्दल शर्मा यांना न्यायालयाने दोषी ठरवले. मुंबई सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये शर्मा यांना याच आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. लखनभैया हा छोटा राजन टोळीचा गुंड होता. मात्र त्याचे बंधू वकील रामप्रसाद यांनी नेटाने हा खटला चालवला व अखेर शर्मा यांना जन्मठेप झाली. पुढील तीन आठवड्यात शर्मांना हजर व्हायचे आहे. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात जामिनाकरिता अर्ज करतील. समजा त्यांना लागलीच जामीन मिळाला तर उच्च न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध अपिल करतील.
सत्र न्यायालयात निर्दोष ठरल्यानंतर उच्च न्यायालयात दोषी ठरायला दहा वर्षांचा कालावधी लागला. लखनभैया याचा एन्काउंटर शर्मा यांनी केला तेव्हा ते ४५ वर्षांचे होते. सत्र न्यायालयात निर्दोष ठरल्यावर उजळ माथ्याने ते फिरत होते तेव्हा त्यांचे वय ५२ वर्षे होते. आता ६३ व्या वर्षी त्यांना उच्च न्यायालयाने जन्मठेप दिली. सर्वोच्च न्यायालयात ते दोषी अथवा निर्दोष ठरेपर्यंत त्यांचे वय किती असेल, याचा लागलीच अंदाज बांधता येणार नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की, शर्मा हे गुन्हेगारांना कंठस्नान घालता घालता गुन्हेगारांसारखे वर्तन करू लागले. लखनभैया प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना व त्यामध्ये कदाचित दोषी सिद्ध होणार हे दिसत असतानाही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानापाशी स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील वाहनमालक मनसुख हिरेन याच्या हत्येच्या प्रकरणातही शर्मा सहआरोपी आहेत. निर्ढावलेपण असल्याखेरीज असे वर्तन होऊ शकत नाही.
एकेकाळी हे शर्मा, त्यांच्या चमूतील दया शर्मा, प्रफुल्ल भोसले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर हे एन्काउंटर स्पेशालिस्ट, सुपरकॉप समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते. पेज थ्रीवर बंदूक हातात धरून नेम लावताना किंवा पेज थ्री पार्टीत बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांचे फोटो प्रसिद्ध होत होते. ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्या. मुंग्यांचे वारुळ फुटून लक्षावधी मुंग्या डसण्याकरिता सैरावैरा धावाव्या तशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच सुमारास राजन काटदरे या पोलिस अधिकाऱ्याने मन्या सुर्वे या गुंडाचा एन्काउंटर केला. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला माया डोळस व त्याच्या साथीदारांचे ए. ए. खान यांनी एन्काउंटर केले. गिरण्या बंद झाल्याने बेरोजगारी, गरिबीचा सामना करणाऱ्या पोरांनी अरुण गवळी, अमर नाईक, छोटा राजन यांच्या टोळ्यांमध्ये प्रवेश करून खंडणीखोरी, खूनबाजी सुरू केली. हप्ते वसुलीवरून या टोळ्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले.
सुरुवातीला टोळ्यांमधील शार्प शूटर एकमेकांच्या जीवावर उठले होते. पुढे गँगवाले एकमेकांच्या टीप पोलिसांना देऊन एन्काउंटर घडवू लागले. यातून मग शर्मांनी शंभरहून अधिक गुंडांना टपकवले तर साळसकरांनी ८० गुंडांना यमसदनी धाडले, अशी स्पर्धा सुरू झाली. गुन्हेगारी संपवण्याकरिता सुरू झालेल्या एन्काउंटरचा धाक दाखवून बिल्डर, उद्योजक, बॉलिवूड स्टार्स यांच्यात मांडवल्या केल्या जाऊ लागल्या. कुणी गावाकडच्या शाळेला एक कोटीची देणगी दिली, तर कुणी पाच पाच मोबाइल, मर्सिडीज गाड्या घेऊन फिरू लागला. एन्काउंटर स्पेशालिस्ट हे शेकडो कोटींचे धनी असल्याच्या सुरस व चमत्कारिक कहाण्या कानावर यायला लागल्या. मुंबईच्या पोलिस आयुक्तांपेक्षाही आपल्याला ग्लॅमर असल्याचा साक्षात्कार झालेले हे सुपरकॉप आता राजकीय व्यवस्था हाताशी धरून आपणच बदल्या, बढत्या ठरवू शकतो, अशा अविर्भावात वावरू लागले. येथेच या अधिकाऱ्यांचा उतरता काळ सुरू झाला.
गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली. गँगचे काही म्होरके हे विदेशात स्थायिक झाले तर काहींनी भारत सरकारला शरण येऊन येथील तुरुंगात ‘सरकारी पाहुणचार’ घेण्याचा मार्ग पत्करला. ‘एनआयए’सारख्या संस्था प्रबळ झाल्या. तंत्रज्ञानाने गुन्हेगारांवर वॉच ठेवणे सोपे झाले. अनेक टोळ्यांनी खंडणी वसुलीपेक्षा कित्येक पटीने बरकत देणाऱ्या ड्रग्ज, सायबर क्राईम यासारख्या गुन्हेगारी कृत्यात बस्तान बसवले. साहजिकच आता सुपरकॉपची गरज ऐंशी-नव्वदच्या दशकाएवढी उरलेली नाही. शर्मा यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे काही काळ तुरुंगवास भोगावा लागणे, कोर्टात खेटे घालायला लागणे व माध्यमांत खलनायक म्हणून रंगवले जाणे हीच तूर्त जन्मठेप आहे.