न्यायालयाने दहीहंडीवरील थरांचे आणि वयाचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही दहीहंडी उत्सवातील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. मात्र उत्सवात सहभागी झालेल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या गोविंदांच्या उत्साहाने मुंबापुरीवर हंडीचा ‘फिव्हर’ चढल्याचे चित्र होते. विशेषत: प्रायोजक आणि आयोजक यांची घटलेली संख्या ओसरत्या गर्दीला कारणीभूत असली तरी ‘माना’च्या हंड्या फोडणाºया मोजक्या गोविंदा पथकांसह सातत्य टिकवून ठेवणाºया गोविंदांच्या रेट्यामुळे का होईना उत्सवातील उत्साही गोविंदांनी जान आणली होती. गोविंदा पथकांमध्ये सामील होणाºया गोविंदांचे वय आणि थरांचे निर्बंध अशा दोन प्रमुख कारणांमुळे गोविंदा गेल्या काही वर्षांपासून हिरमुसला होता. न्यायालयीन प्रक्रिया, राज्य सरकारची भूमिका आणि गोविंदांमधील अंतर्गत स्पर्धा; अशा अनेक कलहांनी हंडीला घेरले होते. विशेषत: लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये लागलेल्या चढाओढीने उत्साहासोबतच स्पर्धा आणि अर्थकारणाचा खेळ दिसून आला. विशेषत: मोठ्या गोविंदा पथकांसह छोटी गोविंदा पथके लाखमोलाच्या हंड्या फोडून येणाºया गणेश उत्सवाची तजवीज करण्यात मग्न होते. विशेषत: नऊ एक वर्षांपूर्वी पूर्व उपनगरात सुरू झालेल्या ‘देशातील सर्वांत मोठ्या हंडी’ने उत्सवाला ‘बाजारीकरणा’चे स्वरूप दिले. ठाण्यातील लाखमोलाच्या हंड्यांसह वरळी येथील तारकादळांच्या हंडीनेही गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचविला होता. प्रत्यक्षात मात्र थरांसह बालगोविंदांच्या मुद्द्यांवर सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया आणि दरम्यानच्या काळात प्रायोजकांसह आयोजकांनी मागे घेतलेले पाऊल ओसरत्या गर्दीला कारणीभूत ठरले. परिणामी लाखमोलाच्या हंड्याही कमी झाल्या. उत्सवाला राजकारणाचे गालबोट लागले आणि उत्साह आणि उत्सवाभोवती केंद्रित असणारी हंडी अर्थकारणाभोवती फिरू लागली. गेल्या वर्षी न्यायालयाच्या निर्णयामुळे उत्साह ओसरला होता. यंदा वाट मोकळी होऊनही प्रायोजकांअभावी दहीहंडीतील उत्साह पूर्वीप्रमाणे दिसला नाही. त्यातूनच ६० ते ७० टक्के आयोजन कमी झाले. नोटाबंदीपाठोपाठ आलेल्या जीएसटीचा परिणाम असल्याचे आयोजक दबक्या आवाजात सांगू लागले आहेत. तथापि, ‘गर्दी ओसरली तरी उत्साह कायम’ हे ठळकपणे निदर्शनास आले. एकूणच न्यायालयाचे निर्बंध हटनूही ‘वलयप्राप्त’ हंडी कोरडीच राहिल्याचे अधोरेखित झाले.
गर्दी ओसरली, उत्साह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:42 AM