शंभर बातम्या जो परिणाम साधणार नाहीत, तो परिणाम एक छायाचित्र करते आणि हजारभर बातम्यांतून जे साध्य होणार नाही, ते एक व्यंगचित्र करून दाखवते, हे सत्य आहे. ठाण्यात गेले दोन दिवस संपन्न झालेल्या अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलनाच्या निमित्ताने हेच वास्तव पुन्हा अधोरेखित झाले. या अधिवेशनाच्या समारोपाला व्यंगचित्रकार राज ठाकरे हे उपस्थित राहिले. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सरकारच्या बाजूने लिहिणारे ते भक्त व विरोधात लिहिणारे ते देशद्रोही असे वातावरण असल्याचे मत व्यक्त केले. व्यंगचित्रकार, साहित्यिक, पत्रकार, संपादक यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे ते बोलले. दोनचार दिवसांपूर्वी सांगलीतील औदुंबर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राज यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांना अशाच कानपिचक्या दिल्या होत्या. लागलीच बडोदा येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज यांना साहित्य क्षेत्रातील काय कळते, असा सवाल उपस्थित करून आपण समाजातील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध कसा वेळोवेळी आवाज उठवला, त्याचे दाखले दिले. राज यांचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रांत असहिष्णुता पराकोटीची वाढली आहे. आमच्याबद्दल चांगले लिहा, चांगले बोला. आमची रेवडी उडवू नका. आमच्यावर आरोप करू नका, अशी राजकारण्यांपासून क्रिकेटपटूंपर्यंत आणि कॉर्पोरेट कंपन्यांपासून बॉलिवूड स्टार्सपर्यंत साºयांची अपेक्षा असते. त्यामुळे विरोधात लेखन करणाºया पत्रकारांच्या हत्या घडवून आणल्या जातात, तर तिरकस प्रश्नावर विराट कोहलीसारखा शीघ्रकोपी क्रिकेटपटू जाहीर पत्रकार परिषदेत संताप व्यक्त करतो. एखादा सलमान खानसारखा अभिनेता आणि त्याचे आडदांड रक्षक छायाचित्रकारांना बिनदिक्कत बुकलून काढतात. डेव्हिड लो, डेव्हिड लेविन किंवा बॉब ग्रॉसमन आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली काही व्यंगचित्रे पाहिल्यावर आज जर कुणी तशी हिंमत केली, तर त्याची काय अवस्था होईल, या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहतो. हेन्री किसिंजर यांच्या युद्धखोरीवर मार्मिक भाष्य करणारे लेविन यांचे व्यंगचित्र व्यंगचित्रकारांची ताकद दाखवणारे आहे. आर.के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेली काही राजकीय व्यंगचित्रे अशीच ढोंगावर आघात करणारी आणि राजकारण्यांची दुखरी नस दाबणारी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाºया बातम्या रोजच प्रसिद्ध होतात. मात्र, त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली ती, राज यांच्याकडून रेखाटण्यात येणाºया त्यांच्या भल्यामोठ्या पोटाबद्दल. व्यंगचित्राची ताकद किती, हे सांगण्यास हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे.
कुंचल्याच्या मुक्या माराचे फटकारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:06 AM