मिलिंद कुलकर्णीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमनाला आता चार दिवस उरले आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी स्वागताची तयारी सुरु आहे. बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या खोलीत आवराआवर करणे, आरासीचे जुने साहित्य शोधणे, नवीन कोणते घ्यायचे याविषयी विचारविनीयम करणे, मूर्तीची आगाऊ नोंदणी करणे, उकडीच्या मोदकांची नोंदणी करणे, रोज दुर्वा आणि फुले देण्यासाठी फुलवाल्याशी बोलणे ही पुरुष मंडळींची कामे असल्याने त्यांची लगबग सुरु झाली आहे. महिला वर्गाची धावपळ तर सर्वाधिक असते. चतुर्थीच्या साग्रसंगीत पूजेच्या साहित्यापासून तर रोज सकाळ-संध्याकाळ दाखवायच्या नैवेद्याची यादी करणे, वाणसामानाची यादी करणे, घरात गौरी असतील तर तयारी दुप्पट करावी लागते. नातलग येणार असल्याने त्यांची व्यवस्था असे सगळे गृहिणीला बघावे लागणार असते. हाती असलेल्या एकमेव रविवारी करावयाच्या कामांची यादी तयार करुन झाली आहे. रविवार पूर्ण बाजारपेठेत जाणार हे निश्चित आहे. एवढी धावपळ असूनही ‘बाप्पा’ येणार असल्याचा आनंद आणि उत्साह प्रचंड आहे. बाजारपेठेतदेखील चैतन्य पसरले आहे. आर्थिक आघाडीवरील चढउतार, महागाई, करप्रणालीतील बदल, पर्जन्यमान अशा सगळ्या गोष्टींमुळे उद्योग-व्यापारावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ‘सुखकर्ता, दु:खहर्त्या’च्या आगमनाने हे सगळे दूर होईल. चिंता मिटतील आणि बाजारपेठेत पुन्हा वैभव जाणवेल, अशी आशा घेऊन उद्योजक, व्यापारी तयारीत आहेत. गणेशोत्सव मंडळांची तयारी तर महिनाभरापासून सुरु आहे. आरास कधीच निश्चित झाली आहे. त्याची उभारणीदेखील निम्म्याहून अधिक पूर्ण होत आली आहे. मूर्तीची नोंदणी झाली आहे. बाप्पांचे वाजत गाजत स्वागत करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून विसर्जन मिरवणुकीसाठी ढोलपथक सज्ज झाले आहेत. प्रशासनाच्या परवानगीची प्रक्रिया बऱ्यापैकी सोपी झाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. डीजे, गुलालावरील बंदी मंडळांनी कधीच स्विकारली आहे. पर्यावरण पूरक उत्सव, विधायक वळण, समाजोपयोगी उपक्रम यासाठी महामंडळांची आचारसंहिता पाळण्यासाठी सर्वच मंडळांची तयारी आहे. सार्वजनिक मंडळांसोबत गल्लीबोळातील छोटी मंडळेदेखील जय्यत तयारीत आहेत. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरु आहेत. नियोजनाचा दोन-तीनदा आढावा घेण्यात येत आहे. ऐनवेळी येणाºया अडचणी, समस्यांवर मार्ग करण्यासाठी विचारांचे अदान-प्रदान केले जात आहे. महसूल, पोलीस, महावितरण, महापालिका या प्रशासनांनीदेखील उत्सवाची पूर्वतयारी केली आहे. आढावा बैठका, पूर्वतयारी बैठका, शांतता समितीच्या बैठका, बंदोबस्त अशा सर्व पातळीवर नियोजनबध्द तयारी सुरु आहे. मंगलदायी सणाला गालबोट लागू नये, म्हणून प्रत्येक शासकीय विभाग काटेकोर नियोजन करीत आहे.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याविषयी जनजागृतीसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाने शतकीय उंबरठा केव्हाच ओलांडला आहे. विधायक उपक्रमांमुळे हा उत्सव महाराष्टÑाची ओळख बनला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने त्याचे मोल वाढले आहे. त्यासोबतच समाजाची जनजागृती करण्यासाठी या उत्सवात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. समाजापुढे असलेल्या जातीयता, स्त्रीभ्रुणहत्या,दहशतवाद, भ्रष्टाचार अशा समस्यांविषयी जनजागृतीसाठी सजीव देखावे, चित्र प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. गणेश मंडळांमध्ये शिस्त, विधायकता वाढावी, म्हणून शासन, सामाजिक संस्थांतर्फे स्पर्धा आयोजित केल्या जातात. बक्षीसे देऊन मंडळांना गौरविले जाते. त्यामुळे अधिकाधिक मंडळे या विधायकतेकडे वळतील, हा उद्देश सफल होऊ लागला आहे. किरकोळ अडचणी, वाद हे घडत असतात, परंतु त्यावर मात करीत हे उत्सव व्यापक आणि देखणे होत आहे, हे विशेष.