मिलिंद कुलकर्णी !लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे गेली सहा महिने राजकारण हा विषय देश आणि राज्याच्या अग्रस्थानी होता. निवडणुकांपुढे अर्थव्यवस्था, शेती, औद्योगिक, व्यापार, दळणवळण, शैक्षणिक या क्षेत्रांपुढील महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडले. तरीसुध्दा प्रत्येक राजकीय पक्ष विकासाचे दावे करीत असताना सद्यस्थितीला सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरत होता. सत्ताधारी भाजप मात्र आमच्या पाच वर्षांचा हिशेब मागता, तुमच्या ७० वर्षांचा हिशेब कोण देणार असे, काँग्रेस आणि त्याचा मित्रपक्षांना सुनावत होता. मतदारांना जे पक्ष आणि उमेदवार भावले, त्यांना मतदान केले. महाराष्टÑात भाजपला मोठा भाऊ केले तर उर्वरित शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी या तिन्ही पक्षांना साधारण सारख्या जागा दिल्या. कौल इतका परिणामकारक दिला आहे की, एक तर दोन पायांची किंवा तीन पायाची कसरत करावी लागेल. एकट्याच्या बळावर कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. एकत्र येऊन महाराष्टÑाचा विकास करा, असा कौल मराठी जनतेने दिला आहे. त्याचा आदर आणि सन्मान राजकीय पक्ष कसा करीत आहेत, हे आपण गेल्या २० दिवसांपासून पहात आहोत.या सत्तानाट्यात दिवसागणिक रोमांचकारी घडामोडी घडत आहे. सत्तेची अनिश्चितता कायम आहे. परंतु, चारही पक्षांचे समर्थक समाजमाध्यमांवर एकमेकांवर तुटून पडले आहेत. त्यात अग्रभागी आहेत ते भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते. १९८४ पासूनची युती तुटल्याचे दु:ख असले तरी शिवसैनिक हे भाजपच्या दादागिरीने दुखावलेले दिसतात. तर शिवसेना केवळ सत्तेसाठी हिंदुत्वाची भूमिका घेते आणि सोयीच्यावेळी भाजपला दगा देऊन काँग्रेस, राष्टÑवादीला मदत करते असा भाजप कार्यकर्त्यांचा दावा असतो. या दोघांच्या भांडणात काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील उडी घेतात. सेनेने आणीबाणी समर्थन, प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना राष्टÑपतीपदासाठी पाठिंबा दिला होता, त्यामुळे सेना आणि काँग्रेसची मैत्री जुनीच आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र होते, याची आठवण राष्टÑवादीचे कार्यकर्ते आवर्जून सांगताना दिसत आहे. आपल्या पक्ष आणि नेत्याविषयी असलेला अभिमान प्रत्येक कार्यकर्त्याच्या उक्ती आणि कृतीतून प्रकट होत असताना दिसत आहे. इतके निष्ठावंत कार्यकर्ते असताना राजकीय पक्ष हे ऐन निवडणुकीच्या काळात ‘मेगाभरती’ का करतात हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.ऐन निवडणुकांमध्ये आयाराम गयाराम आणि मेगाभरतीमुळे राजकीय वातावरण तापले होते. मातब्बर राजकीय नेत्यांचे नातलग, कट्टर समर्थक, निष्ठावंत सहकारी यांनीही परिस्थितीचा अंदाज घेत कोलांटउड्या मारल्या. पक्ष विस्तार आणि सत्तास्थापनेसाठी ‘इलेक्टीव मेरीट’ असलेल्या नेत्यांना आवर्जून पक्षात घेतले गेले. त्यातले काही जिंकले, काही हरले. काहींचा प्रभाव पडला तर काही निष्प्रभ ठरले. सर्वच पक्षांना या निवडणुकीने धडा शिकविला. जनतेशी नाळ जुळलेली असेल तर कार्यकर्ता आणि नेता यशस्वी होतो. नेत्याच्या यशस्वितेमध्ये संघटना आणि कार्यकर्त्याचा खूप मोठा वाटा असतो. मेगाभरतीतील दिग्गज पडले, याचे कारण निष्ठावंतांनी ‘हीच ती वेळ’ म्हणत त्यांना भूईसपाट केले. ज्या नेत्यांची पक्षासोबतच स्वत:ची यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची फळी होती, ते आवर्जून निवडून आले. त्यामुळे संघटनेला आणि कार्यकर्त्याला खूप महत्त्व आहे, हे विसरता कामा नये.कार्यकर्ता आणि कढीपत्ता या दोघांच्या उपयोगाविषयी मार्मिक संदेश समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. जेवताना आणि लाभाच्यावेळी सगळ्यात आधी कढीपत्ता आणि कार्यकर्ता उचलून बाहेर काढला जातो. किती चपलख वर्णन केले आहे, परिस्थितीचे. नेत्यांच्या पालखीचे भोई होणारे कार्यकर्ते पालखीत कधी बसणार? घराणेशाही त्यांच्या माथी मारली जात असताना त्यांनी गुमानपणे ती सहन करायची किंवा वर्तुळाबाहेर पडायचे हे दोन पर्याय असतात.राजकारणातील वास्तव स्विकारण्याची तयारी आणि डोक्यात हवा जाऊ न देणारा कार्यकर्ता हा यशस्वी होतो. अन्यथा पाच वर्षांची सत्ता आली म्हणजे स्वर्ग दोन बोटे उरले असे मानणारे कार्यकर्ते आपण सभोवताली बघतो. ‘समर्थाघरचे श्वान’ असल्यासारखे तो वागतो आणि सत्ता गेल्यावर मात्र त्याची अवस्था दयनीय होते.राजकारणात असे अनेक येतात आणि जातात, पण पक्षविरहीत मैत्री, जनतेशी नाळ जोडून ठेवणे, अडीअडचणीला धावून जाणे या गुणांसह निरपेक्षपणे कार्य करणारा कार्यकर्ता हा जनतेच्या गळ्यातला ताईत बनतो. सत्तेने तो उत-मात करत नाही आणि सत्ता नसली तरी गलितगात्र होत नाही. हाच खरा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणावा लागेल.