भारत तरुणांचा देश आहे, हे वाक्य राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळते. तरुणाईच्या बळावर भारताला लवकरच महासत्ता बनविण्याचे स्वप्नही नेते दाखवतात; पण प्रत्यक्षात भारतातील तरुणाईची स्थिती कशी आहे, यावर जगविख्यात आॅक्सफर्ड विद्यापीठाने नुकताच प्रकाश टाकला आहे. या विद्यापीठाने नुकताच जागतिक गरिबीचा अभ्यास केला. त्या अंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न श्रेणीत मोडणाऱ्या १०३ देशांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, एकूण ५२ कोटी ८० लाख भारतीय नागरिक गरीब असून, त्यापैकी जवळपास निम्मी १८ वर्षांखालील बालके आहेत. हे चित्र खरोखर विदारक आहे. युनिसेफच्या व्याख्येनुसार, जी बालके जीवन संघर्षात तग धरण्यासाठी आवश्यक त्या भौतिक, आध्यात्मिक व भावनिक संसाधनांपासून वंचित राहतात, ज्यांना त्यांचे हक्क उपभोगता येत नाहीत, स्वत:ची पूर्ण क्षमता विकसित करता येत नाही आणि समाजात बरोबरीच्या दर्जाने वावरता येत नाही, ती बालके गरीब ! या व्याख्येत बसणारी असंख्य मुले रोज आपल्या अवतीभवती दृष्टीस पडतात. अशा मुलांचे पालक गरीब असतात म्हणूनच त्यांना गरिबीत खितपत पडावे लागते. त्यामध्ये त्यांचा काहीही दोष नसतो. याशिवाय एकत्र कुटुंब पद्धतीचा व कौटुंबिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, कुमारी मातांची वाढती संख्या यांसारख्या कारणांचाही बालकांना गरिबीत जीवन जगावे लागण्यास हातभार लागतो. पालक गरीब म्हणून पाल्य गरीब, पुढे ते पालक झाल्यावर त्यांचे पाल्यही गरीब, असे हे दुष्टचक्र आहे. ते केवळ भारतातच नव्हे, तर इतरही अनेक गरीब देशांमध्ये, शेकडो-हजारो वर्षांपासून अविरत सुरू आहे. याचा आणखी एक पैलू आहे. बालपणी मुला-मुलींमधील गरिबीचे प्रमाण सारखेच असते; मात्र वयात आल्यानंतर, गरिबीच्या निकषावर त्यांच्यात दरी निर्माण होते व ती रुंदावत जाते. फार थोड्या देशांना गरिबीचे दुष्टचक्र भेदून त्यामधून बाहेर पडण्यात यश मिळाले आहे. बालकांना गरिबीतून बाहेर काढणे हाच त्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. गरिबीत जीवन जगत असलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शिक्षणाचा दर्जा उंचाविणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, कौटुंबिक मूल्यांना चालना देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हेच त्यासाठीचे मार्ग आहेत. भारताने स्वातंत्र्यानंतर या मार्गानेच वाटचाल सुरू केली; मात्र स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही एकूण गरिबांच्या संख्येत निम्मी बालके असतील, तर मार्ग बरोबर; पण वाटचाल चुकली, असेच वर्णन करावे लागेल. संपूर्ण देशासाठी, विशेषत: धोरण निर्धारण करणाऱ्यांसाठी, ही चिंतेची बाब आहे. नेमके काय चुकले, याचा शोध घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या न केल्यास, तरुणाईच्या बळावर महासत्ता होण्याचे स्वप्न आपण विसरलेलेच बरे !
बालगरिबीचा शाप !
By admin | Published: June 10, 2017 12:35 AM