डॉ. दीपक शिकारपूर, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक
मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मनुष्य. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवनपद्धतीचे सर्व संदर्भ बदलेले आहेत.
तरुणांमध्ये इंटरनेट वापराच्या 3०% एवढा वेळ सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉग्जसाठी खर्च केला जातो; जो ई-मेलपेक्षाही जास्त आहे. वेळेअभावी पालक व पाल्यांचा संवाद कमी होत आहे. त्यामुळे संगणक, मोबाइल, टीव्ही ही उपकरणे मुलांच्या संवादाची साधने बनली आहेत. ८-१४ वयोगटातील अनेक विद्यार्थी त्याच्या आहारी जाऊन तेच आपले विश्व असल्याच्या भ्रमात वावरतात. नैराश्य, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व व काही व्यक्ती चक्क आत्महत्येचा मार्गही त्यामुळे स्वीकारत आहेत.
पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्ट फोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुऱ्यासारखे असते. त्याने एखादे फळ कापता येते, तसेच एखाद्याचा खूनही करता येऊ शकतो. अमेरिकेत अनेकवेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झालेत. ते आतापर्यंत कुठल्यातरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केलेत; पण भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन व यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल. त्या वेळी खुनी कोण, हे ठरवणे अवघड असेल. शाळा-महाविद्यालयांतही संगणक/ स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. आधुनिक तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरणे म्हणजे सायबर संस्कार. सायबर संस्कार प्रशिक्षणात पुढील गोष्टी असाव्यात.
१- स्मार्टफोनचा वापर, २- सोशल मीडियावर माहिती पोस्ट करणे, ३- मर्यादित सेल्फी, ४- योग्य चलतचित्रण, ५- सायबर गुन्हेगारी, ६- स्वतःला सायबर सुरक्षित ठेवणे, ७- सायबर कायदे व गुन्हेगारांना झालेल्या शिक्षेची माहिती.पूर्वी सुरक्षा ही फक्त भौतिक गोष्टींची गणली जायची. आता सायबर सुरक्षा व सर्व संगणकीय भांडवलाची व माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब झाली आहे. कुंपण, पहारेकरी, कड्या-कुलूप, तिजोरी, शिस्त हे सर्व पर्याय पारंपरिक भौतिक जगातील व्यवसायांना ठीक आहेत; पण डिजिटल युगात ते कुचकामी ठरतात. त्यासाठी वेगळे सायबर नियम अत्यावश्यक आहेत.
आगामी काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, यंत्रमानव (रोबोटिक्स), इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या तंत्रज्ञानामुळे जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध लागतील व नवीन उत्पादने बनतील; पण हेच सर्व तांत्रिक प्रवाह विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींच्या हाती पडले तर नाशही होऊ शकतो. यामुळेच एमआयटी, स्टॅनफर्ड, हार्वर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्य या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञांना व उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. त्यामुळे काय बरोबर, काय चूक याची जाणीव होईल. हा प्रवाह काही वर्षांतच भारतीय शिक्षणपद्धतीमध्येही अंतर्भूत होईल.
कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. तंत्रज्ञानाचेही असेच आहे. गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. इंटरनेट न वापरायचीही सवय झाली पाहिजे. स्वतःवर बंधन व शिस्त या बाबतीतही आवश्यक आहे. जर माफक प्रमाणात हवे तेव्हाच जर आपण तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदेही आहेत.