अजित मांडकेठाण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळेच येथील प्रत्येक पंरपंरा समस्त महाराष्ट्रासाठी अपरंपार आहे. याचाच एक भाग म्हणजे ठाण्यात मुंबईपेक्षाही दिमाखात साजरा होणारा दहीहंडी उत्सव. पांरपारिक समजला जाणारा हा उत्सव हायटेक कधी झाला ते समजलेच नाही. गेल्या दोन वर्षांत न्यायालयाचा अडसर आल्याने गोविंदा पथकांचा हिरमोड झाला. या उत्सवाला हायटेक आणि कॉर्पोरेट स्वरुप प्राप्त करुन देणाºया मंडळांनाही धक्का लागला होता. यामुळे दहीहंड्यांची संख्या तर रोडावली. गोविंदांचे वय आणि थरांवर बंधने आली होती. न्यायालयाने आता कुठे दिलासा दिला आहे. हा दिलासा देत असतांना गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर टाकली आहे. आता दहीहंडीचे प्रायोजक, गोविंदा पथकांची रोडावलेली संख्या आणि आवाजाची बंधने यातून अद्यापही मार्ग निघू शकलेला नाही. दहीहंडी उत्सव मंडळांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याचीही सूची तयार आहे. परंतु ती काळजी घेतली जाईल का? याबाबतही संभ्रम कायम असल्याचे दिसत आहे.‘गोविंदा रे गोपाळा यशोधेच्या तान्ह्या बाळा’ म्हणत ठाण्यात दहीहंडी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होत होता. पाच थर लावण्यापर्यंत हातावर मोजता येतील एवढ्याच मंडळांनी मारली होती. केवळ टेंभीनाका येथील एकमेव दहीहंडी उत्सव हा ठाणेकरांचे आकर्षण होता. देशात टी. एन. शेषन यांनी निवडणूक सुधारणा लागू करुन जाहीर प्रचारावर निर्बंध आणल्यानंतर कार्यकर्त्यांना व आपापल्या मतदारसंघातील तरुणांना स्वत:बरोबर बांधून ठेवण्याकरिता लोकप्रतिनिधींनी दहीहंडी मंडळांचा वापर केला. गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली. सेलिब्रिटी आणून दहीहंडी उत्सव पंचतारांकित केला. बड्या कंपन्या स्पॉन्सर म्हणून उतरल्या. मीडियातून प्रसिद्धी मिळवण्याकरिता पेड स्लॉट घेतले गेले. हीच कार्यपद्धती गणेशोत्सवाबाबत राबवली गेली. गेल्या दहा ते बारा वर्षांत पारंपारिक उत्सवाला मूठमाती देण्यात आली. वेगवेगळ््या पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये बक्षिसाच्या रकमेची, सेलिब्रिटी आणण्याची चुरस सुरु झाली. त्यातूनच ‘संघर्ष’ हीच ठाण्यातील दहीहंडीची ‘संस्कृती ’ बनली. ‘संघर्ष’ने ठाण्यात स्पेनचे पथक आणून ठाण्याचा गोविंदा थेट सातासमुद्रापास नेण्याचा विक्रम केला.ठाण्यातील उत्सवाची गिनिज बुकने देखील दखल घेतली. याच स्पर्धेत जेमतेम पाच थरांची हंडी ११ थरांपर्यंत पोहोचली. एकेकाळी चाळी, इमारती, गल्लीत हौसेनी खेळला जाणारा गोपाळकाल्याला व्यावसायिक बाजारु स्वरुप प्राप्त झाले. मग गोविंदा मंडळांत स्पर्धा सुरु झाली. त्यांनी नऊ थर लावले तर आम्ही दहा किंवा अकरा थर लावणार. वरवरच्या थरावर चढण्याकरिता बाल गोविंदांचा वापर होऊ लागला. लहान मुले वरुन पडल्याने त्यांची डोकी फुटली, मणके मोडले, ती जायबंदी होऊ लागली. काही मुले कोमात गेली तर काहींना उभे राहता येणार नाही, अशी स्थिती झाली. दहीहंडी उत्सवाची रौनक पाहायला येणारे व थरांचा थरार अनुभवून टाळ््या पिटणारे अशा मृत अथवा जखमी बालगोविंदांच्या अवस्थेवर हळहळ व्यक्त करायचे. मात्र क्षणिक.पुन्हा येरे माझ्या मागल्या या न्यायाने दहीहंडीच्यानिमित्ताने सुरु असलेल्या स्पर्धेचा आनंद घ्यायचे. जखमी बालगोविंदांची आयोजक लोकप्रतिनिधी भेट घेत, काही मदत करायचे. मात्र अधू झालेला मुलगा सांभाळण्याची जबाबदारी आई-बापावर यायची. हा लोळागोळा झालेला मुलगा कसा वाढवायचा? पण त्याचा विचार करायला कुणाला वेळ होता. दहीहंडी संपली की, जो तो आपल्या कामात मग्न. मग पुन्हा पुढील वर्षी दहीहंडीत आणखी एखादा-दुसरी गोंिवंदा एकतर मरण पावायचा किंवा जायबंदी व्हायचा. हे पाहून काही सूज्ञ मंडळी न्यायालयात गेली. त्यांनी बाल गोविंदांच्या सहभागाला आणि थरांच्या उंचीवर बंधन आणण्याची मागणी केली. न्यायालयालाही भूमिका पटली. त्यांनी १८ वर्षाखालील गोविंदांचा दहीहंडीतील सहभाग रोखला. २० फुटांपेक्षा अधिक उंची असता कामा नये, असे आदेश दिले. मात्र यामुळे दहीहंडी मंडळे व गोविंदा यांची अवस्था जणू पोटावर लाथ मारल्यासारखी झाली. गोविंदांचे जीव वाचावे याकरिता घेतलेला निर्णय त्यांना आणि त्यांच्या पथकातील इतर गोविंदांना जाचक वाटू लागला. त्यामुळे साहसी प्रकारात या खेळाचा समावेश करण्याच्या घोषणा झाल्या, निर्बंध शिथील करण्याकरिता आमच्या हिंदूंच्या सणांवर बंधने का, असे गळे काढून झाले. आता १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोंिवंदांच्या सहभागावर बंधन घालून कोर्टाने दिलासा दिला. आता १५ ते १७ वयोगटातील मुलं-मुली वरच्या थरावर चढवता येतील. थरांची उंची किती असावी ते राज्य सरकारने ठरवावे आणि सुरक्षेच्या उपायांची जबाबदारीही सरकारवर टाकली. न्यायालयाच्या देखरेखीतून सुटका झाल्याचा आयोजक व गोविंदा मंडळांनी जल्लोष केला.गोविंदांना हेल्मेट, सेफ्टीनेट पुरवणे, खाली गाद्या पसरणे, कंबरेला दोºया बांधणे यासारखी काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. मात्र बरेचदा या सुरक्षा उपायांचाच गोविंदांना अडसर वाटतो. खाली गाद्या पसरल्या तर गोविंदांवर पाणी टाकता येत नाही. सेफ्टीनेट कुठे व कशी बांधायची? असे मुद्दे उपस्थित करुन सुरक्षेचे उपाय धाब्यावर बसवण्याकडे कल असतो.एकेकाळी हा उत्सव संध्याकाळपर्यंतच रंगत होता. आता रात्री १० वाजेपर्यंत ढाक्कुमाक्कुम सुरु राहू लागले. उत्सवाच्या काळात डीजेचा धांगडधिंगां आणि कर्कश आवाजातील साऊंड यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होऊ शकतो, याचा विसर पडला. वृद्ध, लहान मुले यांच्यावर होणाºया विपरीत परिणामाकडे दुर्लक्ष झाले. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याकडे कानाडोळा केला गेला. एक दिवस थोडा त्रास सहन केला तर कुठे बिघडते? अशी आरेरावीची भाषा केली जाऊ लागली. पोलीस दहीहंडी, गणेशोत्सव झाल्यावर नियमभंग केल्याचे गुन्हे दाखल करतात व गप्प बसतात. ध्वनिप्रदूषण किंवा तत्सम गुन्ह्याकरिता असलेली दंडाची रक्कम फारच किरकोळ आहे. त्यामुळे आयोजकांवर त्याचा परिणाम होत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी व जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे दहीहंड्या आयोजित करणारे लोकप्रतिनिधी जरा बिचकले आहेत. काळ््या पैशाचे प्रदर्शन केले तर मोदींचे सरकार आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा तर लावणार नाही नां? अशी भीती विरोधी पक्षातील नेत्यांना भेडसावत आहे. (शिवसेना हा सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधकांची भूमिका बजावत असल्याने त्या पक्षाच्या नेत्यांनाही ही भीती वाटते) गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा बंधने उठल्याने जोश वाढेल. अर्थात यापूर्वीच्या उन्मादाकडे तो सरकू नये हीच अपेक्षा.रोमन साम्राज्यात राजेमहाराजे पिंजºयात एखाद्याला सोडून अनेकांशी तलवारबाजी करायला भाग पाडत किंवा हिंस्त्र पशूंसोबत दोन हात करायला लावत. त्यामध्ये तो जिंकला तरी ते टाळ््या पिटत किंवा तो मेला तरीही आनंदाने चित्कार करीत. दहीहंडी उत्सवातील पारंपरिकतेचा गळा घोटून तिचे हिडीस पंचतारांकित स्वरुप करणाºया लोकप्रतिनिधी व नेत्यांमध्ये तीच मानसिकता दिसू लागली होती. न्यायालयाने तिला वेसण घातली खरी पण त्यामुळे ज्यांच्या सुरक्षेकरिता हा आटापिटा केला गेला तेच गोविंदा निराश, नाराज झाले. आता सरकारवर सर्व जबाबदारी न्यायालयाने सोपवली आहे. आता तरी या उत्सवातील विरलेला उत्साह वृद्धीगंत होवो. मात्र पुन्हा उन्मादाकडे न जावो...
दहीहंडीचा उत्साह हवा, उन्माद नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 3:45 AM