सचिन जवळकोटे
माढा हा तसा ‘निमगाव’च्या ‘शिंदें’चा. अधून-मधून ‘वाकाव’च्या ‘सावंतां’चाही; मात्र चार दिवसांपूर्वी ‘सावंतां’च्या माढ्यात गोव्याचे ‘सावंत’ येऊन गेले अन् काय सांगावं राव; ‘निमगाव’ अन् ‘अनगर’ची लेकरे भलतीच खुळावली. गोव्याच्या बीचचं आवतन मिळाल्यामुळे ‘लेकरांचे पिताश्री’ही हरखले. डोक्यावरची पुणेरी पगडी नीट करत ‘अनगरकर’ही म्हणाले, ‘दाजी..गोवा कधी?’ तेव्हा हातातला हुरडा चोळत ‘निमगावकर’ही खुदकन हसले, ‘दाजी..येवा, आता गोवा आपलाच आसा!’ लगाव बत्ती..
गेल्या साडेतीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात ‘लाल बत्ती’चा पुरता दुष्काळ. लगतच्या जिल्ह्यातले पालकमंत्री वन डे येतात. दोन-चार अधिकाऱ्यांशी बोलून गावी मुक्कामाला निघून जातात. पूर्वी इंदापूर, आता एवढाच काय तो फरक. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ‘सीएम्’चा ताफा जिल्ह्यात फिरला, तेव्हा सोलापूरकर मंडळी चकित झाली. भलेही सीएम तिकडच्या ‘गोव्या’चे असतील; पण इथंली विरोधकही टीमही पाहुणचारासाठी आसुसली.
खरंतर ‘गोव्याचे सावंत’ सोलापुरात कसे काय आले, याचंच कोडं अनेकांना पडलेलं. हे ‘सीएम्’ कोल्हापुरात डॉक्टर झाले. ‘बीएएमएस’ला असताना त्यांच्यासोबत ‘निमगाव’चे ‘लुणावत’ शिकले. पाच वर्षे क्लासमेटच तसेच रूममेटही. शिक्षण झाल्यानंतरही दोघांनी दोस्ती जपलेली. आमदार असतानाही हे गोवेकर ‘सावंत’ माढ्यात येऊन गेलेले. ‘सीएम्’ झाल्यानंतरही त्यांनी एक-दोनदा बोलून दाखविलेलं, ‘हुरड्याला यायचंय नक्की’ त्याला मुहूर्त मिळाला सोलापुरातील हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा. तब्बल पन्नास पार्टनर असलेल्या या नव्या मेडिकल प्रोजेक्टमध्ये ‘लुणावत’ही डायरेक्टर. त्यांनी शब्द टाकताच ‘सावंत’ तयार झाले सोलापूरला यायला. याच दौऱ्यात माढ्यातली हुरडा पार्टीही ठरली.
शेटफळच्या डॉक्टरांकडून ‘सीएम्’ दौरा पोहोचला ‘अनगरकरां’च्या कानावर. त्यांनी विनंती केली ‘लुणावतां’ना, माढ्यात जायला आमच्याच गावावरनं जावे लागते. पाच मिनिटे वेळ द्या म्हणावे त्यांना. हा ‘नॉन पॉलिटिकल’ पाहुणचार मोठ्या मनाने स्वीकारला. ‘सावंतां’नीही मग काय..सोलापुरात कुदळ हाणताच ‘कॅनव्हा’ पोहोचला ‘अनगरा’त. ‘पाटलां’च्या आलिशान वाड्यावर. दोन मोठ्या सिंहासनांवर ‘सावंत’ अन् ‘पाटील’ बसले. बाजूला दोन्ही लेकरं मोठ्या आदबीनं उभारली. आता ‘कमळ’वाल्या ‘सीएम्’ना ‘पगडी’ घालायची म्हणजे ‘सुसंस्कृत’ अन् ‘सभ्यता’ दाखवावीच लागणार की राव..लगाव बत्ती..
या ‘पाटलां’ची एक खासियत. समोरची माणसं बघून त्यांची वागण्याची स्टाईल बदलते. गावाकडच्यांना खच्चून फेटा बांधणारे हे ‘पाटील’ इथं हळूवारपणे ‘पुणेरी’ पगडी बांधण्यासाठी ताटकळले. असो ताफा पुढे सरकला, माढ्यात पोहोचला. तिथं तर त्यांच्या स्वागतासाठी ‘घड्याळ’वाले ‘बबनदादा’ अन् ‘हात’वाले ‘धनाजीतात्या’ अर्धातास अगोदरच येऊन तिष्ठत उभारलेले. सत्कारावेळी ‘तात्यां’नी विनंती केली, घरी येऊन जाण्याची. ‘सावंतां’नीही काय देणार ‘सरपंच सूनबाई’ घाईघाईनं घरी पोहोचल्या. सत्कारानंतर गाड्या निघाल्या; मात्र कनव्होच्या मागं ‘बबनदादां’ची गाडी अडकली, गर्दीत फसली. ‘धनाजीतात्यां’चा पाहुणचार आटोपून परतेपर्यंत बिच्चारे ‘दादा’ बाहेर गाडीतच बसून राहिले.
ताफा लुणावत डॉक्टरांच्या फार्म हाऊसवर पोहोचला. मागून ‘बबनदादा’ही आले. ‘रणजित भैय्यां’सोबत. खरंतर आजपावेतो ‘दादां’च्या ‘निमगाव टेंभुर्णीत’ मोठ-मोठ्या नेत्यांची मांदियाळी असायची. मात्र ‘लुणावतां’च्या ‘निमगाव माढ्या’त हे ‘दादा-भैय्या’ पाहुणे बनून हुरडा पार्टीत रंगले. वीस-बावीस वर्षांची ‘राजकीय दोस्ती’ तुटायची वेळ आली तेव्हा खरीखुरी ‘दिलदार मैत्री’ अनुभवण्याची पाळी या नेत्यांवर आलेली. वक्त वक्त की बात है..लगाव बत्ती..
‘अनगर-माढ्या’तून ‘सीएम्’चा ताफा धुरळा उडवत बाहेर पडला, तसं इकडं लोकांच्या मोबाइलवर ‘पॉलिटिकल पोस्ट’चा जाळ उठला. ‘सावंतां’नी म्हणे ‘पाटलां’ना ‘कमळ’ पार्टीत येण्याचं निमंत्रण दिलं, असा मजकूर वाड्या-वस्त्यांवर फिरला. ‘आमच्या नेत्यासाठी गोव्याचा सीएम् घरापर्यंत येतो’ असं लाडके चेले कौतुकानं सांगू लागले. हा मेसेज ‘कमळ’वाल्यांपर्यंत पोहोचताच त्यांची यंत्रणा गरागरा फिरली. दोनच तासांत पंढरपूरच्या भेटीत ‘सावंतां’नी पार हवा काढून घेतली. ‘मी महाराष्ट्रात कुणालाच पार्टीत या असं सांगू शकत नाही’ हे डिस्प्ले करून टाकल. ‘सावंतां’चे वडीलही कट्टर ‘आरएसएस’वाले. आपल्याला ‘पुणेरी पगडी’ देऊन ‘पार्टीत टोपी’ घालण्याची मोहीम त्यांनी पुरती हाणून पाडली. तरीही म्हणे अशा ‘चाणाक्ष’ मंडळींच्या ‘पार्टी’त जाण्यासाठी ‘अनगरकर पाटील’ कार्यकर्त्यांशी बोलणार..क्या बात है..लगाव बत्ती..
इकडं सोलापुरात ‘सुभाषबापूं’च्या घरी ‘ब्रेकफास्ट’ घेणारे ‘सावंत’ रात्री अक्कलकोटला ‘कल्याणशेट्टीं’कडं ‘डिनर’ला होते. अख्ख्या दौऱ्यात ‘विजयकुमारां’चा कुठे उल्लेखच नाही. मात्र ‘देशमुख’ही खूप हुशार. त्यांनी रात्री कॉल करून ‘सावंतां’ना ‘सिद्धेश्वर मंदिरा’त बोलावले. सकाळी सात वाजता दोघांनी मिळून दर्शनही घेतले. तिकडं ‘सीएम्’ फ्लाईटनं कोल्हापूरला गेले. इकडं ‘देशमुख’ गालातल्या गालात हसले..लगाव बत्ती..
जाता-जाता : हुरडा खाताना ‘सीएम्’नी ‘शिंदे फॅमिली’ला गोव्याला येण्याचे निमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी ‘अनगरकर पाटील’ मीडियाल म्हणाले, ‘तिकडं बबनदादा जातील, तिकडं मीही’ म्हणजे गोव्याच्या बीचवर जायला ‘दाजी-दाजी’ मोकळे. गोव्यात ‘बाटल्यांचं मार्केटिंग’ कसं केलं जात, याचा अभ्यासही होईल नक्कीच; कारण ‘पाटलांच्या नक्षत्रा’ला ‘महाराष्ट्र’ सोडून बाहेर विक्रीला परवानगी मिळालेली. बरं झालं आठवलं अजून एक अंदर की बात, ‘अजितदादा’ या खात्याचे मिनिस्टर असताना ‘नक्षत्र’वरील आरोपांची नुसतीच चौकशी व्हायची, अहवालावर अहवाल तयार व्हायचे; मात्र सहा महिन्यांपूर्वी ‘शिंदे-फडणवीस’ सरकार येताच एका दिवसांत ‘नक्षत्र’ला क्लिन चिट दिली गेली. ‘स्टे होम’वाले ‘शंभूराज’ यांनी झटकन् सही ठोकलेली. यालाच म्हणतात पॉलिटिकल. ‘पाटील’ हे ‘घड्याळ’वाले. जाण्याची हवा करतात ‘कमळ’ पार्टीमध्ये. मात्र त्यांचं मोठ्ठं टेन्शन घालवलं ‘एकनाथभाई’ टीमनं. लगाव बत्ती..