पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरून मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर रुजलेली आहे, हे अधोरेखित होते. जग एकविसाव्या शतकात पोहोचले आहे; माहिती-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे, असे म्हणत असताना आमच्या मनातून जात, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे भेद जात नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या आणि संविधानानुसार चालणाºया या देशात अशा घटनांचे प्रमाण वाढणे सामाजिकदृष्ट्या निरोगी नसल्याचे लक्षण आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा मूलमंत्र जपून सरकार काम करीत असेल तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात असे का दिसतात, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना विकासाची समान संधी मिळत असल्याचा दावा शासन आणि प्रशासन करीत असले तरी ग्रामीण महाराष्ट्रातील भयावह स्थितीचे दर्शन या घटनेने घडविले आहे. स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्यासारख्या महात्म्यांनी प्रयत्न केले. देशाला समतेचा संदेश देण्यात महाराष्ट्र अग्रभागी असल्याचा अभिमान आम्ही बाळगत असताना अशा घटना ही काळाचे चक्र उलटे फिरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाकडीसारख्या छोट्या गावात भयंकर प्रकार घडूनही तीन दिवस त्याची वाच्यता होऊ नये, यावरून त्याठिकाणी किती दहशतीत पीडित कुटुंब राहत असेल त्याची कल्पना येते. विहिरीत पोहण्यास मज्जाव केल्यानंतरही ते पोहल्याबद्दल जाब विचारताना त्यांना नग्न करून मारहाण केली जात असताना त्याचा व्हिडीओ बनविणे, त्यात या तरुणांना हीन लेखणारी उद्दाम भाषा वापरणे यावरून ही प्रवृत्ती किती बेमुर्वतखोर, आढ्यताखोर, वर्चस्ववादी आहे हे ठळकपणे जाणवते. मंत्री, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांमधून या घटनेविषयी संताप व्यक्त झाला. तो रास्त आहे. पण केवळ तेथे न थांबता अशी हिंमत समाजातील कुठलाही घटक करणार नाही, अशा पध्दतीने गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
मानवतेला काळिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 1:09 AM