संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
यंदा राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्याने बहुतांश धरणे भरली आहेत. या धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग मन मोहवून टाकणारा असतो. देशातील व महाराष्ट्रातील मोठी धरणे ही तर राजकीय नेतृत्व, नियोजनकर्ते यांच्या दूरदर्शीपणाचे पुरावे मानले जातात. या धरणांच्या लगत वसलेली शहरे, गावे ही विकासाची केंद्रे झाली. सिंचन, जलविद्युतनिर्मिती, पिण्याकरिता मुबलक पाणी, पर्यटन यामुळे या धरणांनी आपल्या कित्येक पिढ्यांना समृद्ध केले. मात्र ही धरणे भविष्यातील टाइमबॉम्ब आहेत. अशा मोठ्या धरणांचे किमान सुरक्षित आयुष्य ५० वर्षे गृहीत धरले असून, मागील विसाव्या शतकात बांधलेल्या अनेक धरणांचे आयुष्य संपलेले आहे. अपेक्षित आयुष्य पूर्ण झालेली मोठी धरणे अचानक फुटून महाभयंकर विनाश होण्यापेक्षा ती सुनियोजित पद्धतीने बंद करून जागेवरून हटवणे हा सध्या जागतिक पातळीवर मोठ्या चिंतेचा विषय ठरला आहे. याचा अभ्यास करण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघ विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर वॉटर, एन्व्हॉयर्नमेंट अँड हेल्थने अन्य काही तज्ज्ञ संस्थांच्या मदतीने सर्वंकष व माहितीपूर्ण अहवाल तयार केला आहे. मोठी धरणे सुनियोजित पद्धतीने बंद करून (डिकमिशन) ती जागेवरून हटवण्याचा सुरक्षित असा वैज्ञानिक प्रोटोकॉल अहवालात दिला आहे.
मोठी धरणे म्हणजे १५ मीटर उंचीची अशी व्याख्या केलेली आहे. अशा धरणांचे किमान सुरक्षित आयुष्य ५० वर्षे गृहीत धरले आहे. या व्याख्येत बसणारी व ज्यांचे सुरक्षित आयुर्मान उलटून गेले आहे अशी जगभरात ५८ हजार ७०० धरणे आहेत. जगभरातील सर्व प्रमुख नद्यांमधून दरवर्षी ४० हजार घन किमी एवढ्या पाण्याचा विसर्ग होतो. त्यापैकी १६ टक्के म्हणजे ७००० ते ८३०० घन किमी एवढे पाणी या मोठ्या धरणांनी अडवले आहे. तज्ज्ञांच्या मते ही सर्व धरणे फुटल्यास महाभयंकर अनर्थ होऊ शकतो. पर्यावरणीय असमतोल ही सध्या जगापुढील मोठी समस्या आहे. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने एकीकडे जगभरातील समुद्रालगतचा परिसर समुद्र पोटात घेण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे पर्यावरणाच्या असमतोलामुळे अचानक ढगफुटीसदृश पाऊस होण्याचे प्रमाण वाढल्याने व भविष्यात ते आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अशी आयुर्मान पूर्ण केलेली मोठी धरणे अतिमुसळधार पावसामुळे फुटण्याचा व त्या लगतची शहरे, गावे वाहून गेल्याने मोठी जीवितहानी होण्याची टांगती तलवार जगभरातील मानवी वसाहतींच्या मानगुटीवर आहे.
भारतात आयुर्मान पूर्ण झालेली अशी थोडीथोडकी नव्हे तर ४ हजार ४०७ मोठी धरणे आहेत. त्यांची सरासरी उंची २४ मीटर असून, संभाव्य आयुर्मान ४१ वर्षे आहे. १९६० ते ७० या दशकात देशाच्या वेगवेगळ्या भागात एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्याने या धरणांची उभारणी झाली आहे. वेगवेगळ्या देशांत मोठी धरणे बांधण्याची ही प्रक्रिया १९३० पासून सुरू झाली.
मोठ्या धरणांची जगभरातील निर्मिती ही सिंचनाकरिता झाली असून, जगभरातील ३० ते ४० टक्के सिंचनाखालील जमीन जगाची ४० टक्के कृषी उत्पादनांची गरज भागवत आहे. अर्थात, धरणाचे बांधकाम उत्तम असेल व देखभाल-दुरुस्तीवर लक्ष दिले असेल तर धरणे १०० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ टिकलेली आहेत, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे एकाचवेळी बांधलेली दोन धरणे ही गुणवत्तेच्या आधारे वेगवेगळ्या दर्जाची असू शकतात. जगभरातील वेगवेगळ्या देशांत होणारा पाऊस, येणारे पूर, बाष्पीभवन वगैरे साऱ्यांचा बरा-वाईट परिणाम धरणाच्या स्थैर्यावर होत असतो. उत्तर अमेरिका, आशिया मिळून १६ हजार मोठी धरणे असून, १०० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलेली २३०० धरणे आहेत. मात्र, आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार मोठ्या, मध्यम, लहान आकाराच्या एकूण धरणांची संख्या ९० हजार ५८० असून, या सर्व धरणांचे सरासरी आयुर्मान ५६ वर्षे आहे. त्यापैकी ८५ टक्के धरणांचे आयुर्मान २०२० सालापर्यंत संपुष्टात आले आहे. केवळ चीनमध्ये ३० हजार धरणांनी आयुर्मान पूर्ण केले आहे.
जगभरातील मोठ्या धरणांच्या ४० टक्के मोठी धरणे ही केवळ चीनमध्ये आहेत. भारतामधील एक हजार ११५ धरणे २०२५ सालापर्यंत ५० वर्षे पूर्ण करतील. भारतामधील ४ हजार २५० मोठी धरणे ५० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य पूर्ण करीत आहेत, तर देशातील ६४ धरणे २०५० सालापर्यंत १५० वर्षे पूर्ण करतील. ही आकडेवारी धरणांच्या टिकाव धरण्याच्या क्षमतेची ग्वाही जरी देत असली तरी धरणांचे सरासरी आयुर्मान पूर्ण झालेले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
गेल्या चार दशकांत मोठ्या आकाराची धरणे बांधण्याचा कल जगभर कमी झाला आहे. त्याचबरोबर मोठ्या धरणांच्या बांधणीकरिता पूरक अशी ठिकाणे आता उपलब्ध नाहीत. भारतात मात्र आजही धरण बांधणीचा दर जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे.
जगभरात सिंचन, जल विद्युतनिर्मिती, पाणीपुरवठा, पूरनियंत्रण, मनोरंजन, मासेमारी व अन्य, या व केवळ याच वापराकरिता २४ हजार ३११ मोठी धरणे उपलब्ध आहेत. मिश्र वापराकरिता उपलब्ध मोठी धरणे ८ हजार ८१७ आहेत. अशा पद्धतीने ३३ हजार १२८ मोठी धरणे जगभर असून, बहुतांश धरणांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे.
ही धरणे सुनियोजित पद्धतीने बंद करायची तर तीन पर्याय उपलब्ध असतील. १) धरण तसेच ठेवायचे, पण अन्य कामांकरिता त्याचा वापर करायचा. २) काही अंशी धरण काढून टाकायचे. ३) धरण पूर्ण काढून टाकणे. अर्थात धरण सुनियोजित पद्धतीने बंद करणे, ही मोठी प्रक्रिया असून, त्यामध्ये दशकभराचा किंवा त्यापेक्षा अधिक काळ जाऊ शकतो. धरणांच्या लगत शेती होते, वसाहती उभ्या राहतात, व्यापारी केंद्रे निर्माण होतात. धरण बंद केले तर पिण्याच्या पाण्यापासून जलविद्युत निर्मितीपर्यंत अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. अमेरिकेने एक हजार २७५ धरणे अशा पद्धतीने बंद केली आहेत. धरणांचे टाइमबॉम्ब फुटून सारेच नष्ट होण्यापेक्षा वृद्ध धरणांना निरोप देणे हेच श्रेयस्कर ठरणार आहे.