महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा झेंडा अटकेपार रोवला जातो. दिवाळी अंक काढून मराठीचा उदोउदो केला जातो. दुसरीकडे मात्र मुंबईसारख्या शहरात मराठीची केविलवाणी अवस्था होत आहे. हे चित्र राज्याच्या दृष्टीने भयावह आहे. मराठी टिकावी, तिचे संवर्धन व्हावे, अशी ओरड नेहमीच राजकारणी, साहित्यिक करत असतात. प्रत्यक्षात मराठी टिकविण्यासाठी व रुजविण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट होते. मोबाइल, इंटरनेटमुळे संपूर्ण जग प्रत्येकाच्या हातात आले आहे. हे जग बघायचे असल्यास तुम्हाला इंग्रजी अनिवार्यच आहे. काही बोलीभाषेतील इंग्रजी शब्द तर सहज लक्षात येतात. त्यामुळे मराठीचा विसर थोड्याफार प्रमाणात अशिक्षित माणसालाही होतो. मराठीचा झेंडा हाती घेऊन काही जण राजकारणात मोठेही झाले. मात्र, मराठीचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मराठी टिकवायची असेल तर त्यासाठी लागणारे शिक्षक, त्यांचे प्रशिक्षण व अन्य आवश्यक गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पालाही मागे टाकेल एवढ्या मोठ्या रकमेची वर्षाला उलाढाल करणाºया मुंबई महापालिकेला मराठी टिकविण्यासाठी काही ठोस करावेसे न वाटणे, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणारी शिवसेना व विरोधी बाकावर बसणाºया अन्य पक्षांनाही मराठीबाबत आस्था नाही. महत्त्वाचे म्हणजे मराठी शाळेचा दर्जा घसरला आहे, तेथे सुविधांचा अभाव आहे, असे मत मुंबईत राहणाºया बहुतांश मराठी जनांनी नोंदविले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत मराठी विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. तरीही मराठी टक्क्यावर निवडून येणाºया नगरसेवकांपैकी एक टक्का नगरसेवकांनी याबाबत दीर्घ चर्चा घडवून आणली नाही किंवा याविषयी आक्र मक झाले नाहीत, ही मराठीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरीही ‘प्रजा’च्या अहवालानुसार इंग्रजी व सेमीइंग्रजी वर्गाचे विद्यार्थी चार वर्षांत लक्षणीय वाढले आहेत ही एका अर्थाने जमेची बाजू आहे. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी टिकविण्यासाठीही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मराठीचा वापर केवळ साहित्य संमेलनात किंवा राजकारण करण्यासाठी होऊ नये; अन्यथा २0२१पर्यंत महापालिकेच्या शाळांतून मराठी नष्ट होईल, ही प्रजा फाउंडेशनची भविष्यवाणी खरी ठरेल. ही भविष्यवाणी खरी ठरू नये, यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करायला हवा, ही काळाची गरज आहे.
मराठीसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:24 AM