- श्रीमंत माने (कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)
कोरोना लाॅकडाऊनच्या काळात ‘लुडो’ खेळले म्हणून काहीजण केंद्रीय मंत्र्यांवर हसले असतील; पण, हसणारेही लुडो खेळलेच असतील. बाॅलगेम खेळण्याची मैदाने बंद असल्याने हा घरात खेळायचा बोर्डगेम. पाककृती बनवून कंटाळा आला तर तो घालविण्यासाठी अनेकांनी जुने कॅरम बोर्डही बाहेर काढले असणार.. किंवा लहानपणी खेड्यापाड्यात शिळोप्याच्या गप्पांचाही कंटाळा आला तर शेणाने सारवलेल्या जमिनीवर काचपाणीसारखा खेळ खेळला आहात का? फोडलेल्या चिंचोक्यांचाच फासे म्हणून वापर करून कोळश्याने आखलेल्या चाैकटीत पच्चीसीचे दान टाकले आहे का? फोडून दोन पाकळ्या केलेल्या चिंचोक्यांपैकी पालथे व उताणे पडतील त्यावरून सोंगटी पुढे सरकवण्याचा खेळ ज्यांनी खेळला त्यांनी जणू परंपरागत खेळाच्या अद्भुत दुनियेचे संचित जपले !हे आठवण्याचे कारण म्हणजे नागपूरजवळच्या कुही परिसरातल्या गुफांमध्ये ग्रीस, इजिप्त या देशांमध्ये मूळ असलेल्या ‘मनकला’ खेळाचे अवशेष पुरातत्व अभ्यासकांना सापडले आहेत. तो खेळ व्यापाऱ्यांनी इकडे आणला असावा. गुफांमध्ये खडकावर ओळीने खोदलेले काही इंच व्यासाचे खोल खड्डे मनकला या प्रसिद्ध खेळाचे असावेत. हा खेळ दक्षिण भारतात पल्लनकुझी किंवा पल्लनकुली नावाने खेळला जातो. त्याचा पट चाैकोनी, लंबगोलाकार वगैरे कोणत्याही आकाराचा असू शकतो. हा एक प्रकारचा बोर्डगेमच आहे. असे प्राचीन किंवा अश्मयुगीन अवशेष पूर्व विदर्भाला नवे नाहीत. कारण, नर्मदा व गोदावरीच्या नद्यांमधला हा टापू अश्मक नावाचा महाभारतकालीन सोळा महाजनपदांपैकी एक मानला जातो. त्या काळाच्या खाणाखुणा नागपूरजवळ अधूनमधून सापडतात.जगभरातल्या प्राचीन संस्कृतींसोबत झालेला खेळांचाही प्रवास रंजक आहे. व्यापार, त्यासाठी प्रवास, थोडेबहुत स्थलांतर व लोकजीवनाची सरमिसळ वाढली तसे त्यासोबत खेळांचीही देवाणघेवाण झाली. कुस्ती, मल्लखांबसारखे जामानिमा, खर्चिक साधनांची गरज नसणारे खेळ गरिबांचे तर तशा साधनांची गरज असणारे खेळ अमिरांचे. अशांपैकी मणिपूरचा सगोल कंगजेट मुस्लीम राजवटीत चाैगान, तर आधुनिक जगात पोलो बनला, ऑलिम्पिकमध्ये गेला. चेंडूला पक्ष्यांची पिसे चिटकवलेला बैटलदाैड पुढे बॅडमिंटनचे शटल बनले. शतरंज किंवा चतुरंग हे बोर्डगेममधील युद्धच. चतुरंग सेना हे नावही त्याच्याशी संबंधित. बुद्धिबळाच्या पटावर राजापासून उंट, हत्ती, घोड्यांसोबत सामान्य सैनिकही विराजमान असतात आणि हडप्पा-मोहोंजदडोच्या उत्खननात साडेचार-पाच हजार वर्षांपूर्वीचा बुद्धिबळाचा पट सापडला, इतका हा खेळ जुना. पूर्वीचा मोक्षपट पुढे सापशिडी बनला. नव्या पिढीच्या स्नेक-लॅडरची आधीची आवृत्ती. आताचे कार्ड्स पूर्वी कधी गंजिफा होते, कधी चाैसर होते, कधी पासा होते. तपशिलात थोडा बदल साेडला तर जगभरातले खेळ जणू एकसारखेच. मनोरंजनाच्या मानवी संकल्पनांचा विकासही जणू समांतर झाल्याचे दाखविणारे हे खेळ. त्याचे कारण आपले पूर्वज, आदिमानव दर दहा-बारा हजार वर्षांच्या अंतराने येणाऱ्या पृथ्वीवरील उष्ण व शीतकालाच्या चक्रानुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होत गेले. तापमानवाढीच्या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत गेली, किनारे पाण्याखाली गेले, स्थलांतराचा वेग मंदावला. शीतकालात समुद्र गोठत गेले, किनारे उघडे पडले व नव्या जगाच्या शोधात निघालेल्यांची गती वाढली. भारतीय उपखंडातून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधून अलास्कामार्गे अमेरिका खंडात माणूस पोहोचला तो शीतकालातच. भटकंती व शिकार करून पोट भरणारा केवळ माणूसच नवे भूभाग पादाक्रांत करीत राहिला असे नाही. सोबत त्याचे भावविश्व होते. खाणेपिणे, जगणे, राहणीमान, पाेटापाण्याची साधने आणि मनोरंजन, विरंगुळ्याच्या पद्धतीही त्यांनी सोबत नेल्या. त्याच्या वापराची पदचिन्हे जागोजागी अवशेषांच्या रूपात अधूनमधून सापडतात. सगळा हा खेळ केवळ खेळांचा नव्हे तर माणूस उत्क्रांत होत असतानाही त्याने जपलेल्या, टिकवून ठेवलेल्या विरंगुळ्याच्या साधनांचाही आहे. shrimant.mane@lokmat.com