-सुरेश द्वादशीवारजाहिरातीसारखेच नालस्तीचेही एक तंत्र असते. फरक एवढाच की जाहिरातीला बुद्धी व प्रतिभेची जोड लागते. नालस्ती निर्बुद्धांना व प्रतिभाहीनांनाही करता येते. संकुचित व तोकडी नजर, आखीव व एकारलेली वृत्ती आणि आपले नाव गुप्त राखण्याचे कसब एवढे जमले की अशा नालस्तीकरांना भल्याभल्यांची शिकार करता येते. त्यातही काही संघटना व यंत्रणा या मतिमंदांचा वापर आपल्या उद्दिष्टांसाठी कित्येक दशकेच नव्हे तर शतकांपर्यंतही करीत असतात. १९२५ मध्ये अशा यंत्रणांनी गांधीजींच्या बदनामीचे सत्र उघडले. गांधींनी आपल्या आत्मचरित्रातच त्यांच्या जीवनातील दुबळेपणाच्या जागा जगाला विश्वासात घेऊन सांगितल्या. त्यावर १९०६ मध्ये त्यांनी कसा विजय मिळविला हेही सांगितले. पण नालस्तीकरांनी १९०६ पूर्वीचाच गांधी त्याची बदनामी करायला हाती घेतला. नंतरच्या काळात जे जे म्हणून त्याच्याविरुद्ध वापरता येईल त्या त्या साºयांचा वापर त्यासाठी त्यांनी केला. त्यांनी गोडसेला वापरले. हरिलालला वापरले. जमेल तेव्हा भगतसिंग आणि सुभाषबाबूंचाही त्यासाठी वापर करून पाहिला. (ते तो अजूनही करतात) पुढे त्यांची मजल जिनांना सेक्युलॅरिझमचे सर्टिफिकेट देण्यापर्यंत गेली. गांधींएवढेच नेहरूही देशाचे लाडके नेते होते. ११ वर्षे देशासाठी तुरुंगात राहिलेल्या या नेत्याचे वडील ते तुरुंगात असताना वारले. त्यांची पत्नीही तशाच आजारी अवस्थेत १९३६ मध्ये मृत्यू पावली. एवढा वेळ त्यांच्याविषयी गप्प राहिलेल्या नालस्तीकरांचा वर्ग पुढे नेहरूंचा लेडी माऊंटबॅटन यांच्याशी स्नेह जुळला तेव्हा सक्रिय झाला. त्यांच्या संबंधांची काल्पनिक व अज्ञात असणारी ओंगळ चित्रे त्यांनी रंगविली. अशा माणसांच्या रांगेत कुलदीप नायर हे जरठ पत्रकारही आहे. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात एअर इंडियाचे एक विमान नेहरूंचे पत्र एडविनाला द्यायला जायचे आणि दुसरे तिचे उत्तर नेहरूंना आणून द्यायचे, असे म्हटले आहे. (एअर इंडियाची स्थापनाच त्यासाठी झाली असे त्यांनी लिहिले नाही, एवढेच त्यातले आपले नशीब) जॉन मथाईच्या पुस्तकातले एक वाक्यही नेहरूंना बदनाम करण्यासाठी त्यांनी वापरले. हाच प्रकार इंदिरा गांधींबाबतही केला. त्यांचे नाव दिनेशसिंगांशी त्यांनी जोडले. इंदिराजींनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तेव्हा त्यांच्याशी चंद्रास्वामीचे नाव जोडण्याचा आचरटपणा त्यानी केला. हा चंद्रास्वामी फ्रान्सचे अध्यक्ष मितराँ यांचा सल्लागार होता व त्यांचे खासगी विमान तो वापरीत होता. इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचरही त्याच्या सल्ल्यानुसार काही निर्णय घेत आणि त्याने सांगितलेल्या रंगांचे कपडे काहीकाळ वापरीत. चंद्रास्वामीचा हा अधिकार (वाचा-वॉकिंग विथ लॉयन्स) लक्षात घेण्याची गरज न वाटलेल्या या नालस्तीखोरांनी त्याला दिल्लीतला रासपुतीन ठरवून टाकले. राजीव गांधींना, सोनिया गांधींना आणि अजूनतरी राहुलना त्यांना आपल्या अशा टीकेचे लक्ष्य बनविता आले नाही. मात्र त्यांच्या ध्येयधोरणांविरुद्ध बदनामीची मोहीम चालवायला या माणसांनी पगारी यंत्रणा उभ्या केल्या. आता तर या यंत्रणांमध्ये दोन हजाराहून अधिक संगणकतज्ज्ञ राबत असल्याचे स्वाती चतुर्वेदी या शोध पत्रकारितेतील आघाडीच्या महिलेने ‘आय अॅम अ ट्रोल’ या नावाच्या पुस्तकात साºया प्रमाणानिशीच प्रकाशित केले. अमित शहाला तुरुंगात धाडण्याचे धाडसही या स्वातीचेच. या ट्रोलवाल्यांची आणि नालस्तीकारांची एक बरी बाजू ही की त्यांना त्यांचे नेते, पुढारी व आदर्श यासंदर्भात अंधारात ठेवता येतात. त्यांनी विद्याधर पुंडलिकांची ‘सती’ वाचली नसते. आऊट लूकच्या विनोद मेहता या संपादकाचे ‘द लखनौ बॉय’ हे पुस्तक त्यांना ठाऊक नसते. नेहरूंच्या मैत्रिणी शोधणाºया या शहाण्यांना त्यांनी आदर्श मानलेल्या ज्येष्ठांच्या मैत्रिणी कधी दिसत नाहीत. देशभरातील अल्पसंख्याकांच्या कत्तली पाहता येत नाहीत. दलित व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार, भवरीदेवीवरील सामूहिक बलात्कार त्यांच्या नजरेत भरत नाही. काँग्रेस व अन्य सेक्युलर संघटनांबाबत मात्र त्यांच्या नजरा तीक्ष्ण व जिभा सैल असतात. सामान्य व विचारी जनतेवर त्यांचा प्रभाव नसतो. मात्र अर्धवटांना त्यांचे म्हणणे शासकीय वाटते व ते त्याची चर्चा करतात. लेडी माऊंटबॅटन आणि नेहरूंच्या मैत्रीबद्दल एका जाणत्या पत्रकाराशी बोलताना एक निवृत्त ट्रोलधारी म्हणाला, ‘काय हो, हा तुमचा नेहरू, त्याची एडविनाशी म्हणे मैत्री होती.’ त्यावर त्या पत्रकाराने त्याला ऐकविले, ‘अरे गाढवा, एडविनाला मैत्रीच करायची असेल तर ती तुझ्याशी करील काय? तिला नेहरूंच्याच उंचीचा माणूस लागेल ना’... सध्या या ट्रोलवाल्यांचे लक्ष गुजरातच्या हार्दिक पटेलकडे वळले आहे. म्हणून हा लेखनप्रपंच. हा देश माणसांना त्यांचे आयुष्य त्यांच्या मतानुसार जगण्याचा अधिकार देतो. त्या अधिकाराला आपल्या राजकारणाचे लक्ष्य बनविणाºयांजवळ काही नसले की मग याच गोष्टीचा वापर संदीप पात्रासारखी माणसे करताना दिसतात. अशावेळी गल्ली बोळातल्या नालस्तीकारांना काय म्हणायचे बाकी राहते? सगळ्याच यशस्वी नेत्यांच्या वाट्याला हे येते. ते स्त्रियांच्या वाट्याला अधिक येते. हा पाश्चात्त्यांचा गुणविशेष नाही. तो खास भारतीय सद्गुण आहे.
( लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत )