डी. बी. एन. मूर्ती. निसर्गावर प्रचंड वेड्यासारखे प्रेम करणारा हा माणूस कधी थकेल, असे वाटत नाही. त्यांना निसर्गातील आविष्कार अनुभवण्याचे वेड आहे. मानवाने या पृथ्वीवर उभारलेल्या सुंदर कलाकृती पाहण्याचे वेड आहे.बंगलोर शहरातील लालबागच्या पश्चिम गेटासमोर पुढे गेले की, जयनगरचा परिसर सुरू होतो. लालबागेची दक्षिण बाजू किंवा मागील बाजूही म्हणता येईल. अशोक स्तंभाला वळसा घालून सहाव्या क्रॉसला एक अवलिया माणूस राहतो. त्याचं वय अवघे शहाऐंशी वर्षे. या वयात स्वारी एकट्याने परदेशी प्रवास करण्याची तयारी करीत होती. यावेळी कोणत्या देशाचा पर्यटन दौरा आहे याच्या उत्सुकतेपोटी चौकशी केली तेव्हा सांगितले, आफ्रिका खंडातील झिम्बाब्वेची तयारी!
डी. बी. एन. मूर्ती त्यांचे नाव. जन्म १२ जून १९३२ रोजीचा. कर्नाटकातील शिमोगा त्यांचे गाव. वडील वनखात्यात अधिकारी होते. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने निसर्गात म्हणजे जंगलात राहण्याची सवय लहानपणापासूनच होती. कदाचित निसर्गाचे संस्कार त्याचवेळी जडले असणार. ‘नेचर इज गॉड अॅण्ड गॉड इज नेचर’ अशी त्यांची धारणा बालपणापासून झाली असावी. शिमोगा, चिक्कमंगळूर, हसन, म्हैसूर, कोडगू या पट्ट्यात त्यांनी वडिलांसोबत वास्तव्य केले. वडिलांचे नाव डी. बी. नरसिंहा मूर्ती! डी. बी. एन. मूर्ती यांच्या नावाची रचनाही दाक्षिणात्य आहे. दोडाबल्लापूर, भोजा, नरसिंहा मूर्ती. (डी. बी. एन. मूर्ती) निसर्ग आणि विज्ञानाच्या आवडीने हा विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळला. सुमारे 3३ वर्षे नोकरी केली. त्यांची अखेरची नोकरी पुण्यात होती.
फिलिप्स या जगप्रसिद्ध कंपनीत ते उच्चपदस्थ होते. पुण्यात ते सेनापती बापट मार्गावर राहायचे आणि औद्योगिक वसाहतीतील फिलिप्स कंपनीत ये-जा करायचे. दोन मुले, मुलगा अमेरिकेत सी.ए.ची प्रॅक्टिस करतो आणि मुलगीने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्समधून अभ्यास करून समाजशास्त्रज्ञ म्हणून संशोधनाचे काम करते. जावई सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत.
पुणे सोडून आपल्या आवडत्या बंगलोर शहरात राहायचे ठरविले. वडिलोपार्जित घर होते. पती-पत्नी दोघांनाही फिरायची, वाचनाची प्रचंड आवड. शिवाय डी. बी. एन. मूर्तींना लिखाणाची देखील आवड होती. द हिंदू, डेक्कन हेरॉल्ड, टाइम्स, आदी इंग्रजी वृत्तपत्रांच्या वाचकांच्या पत्रात दर आठवड्याला एकतरी अत्यंत सुरेख पत्र मूर्ती यांचे प्रसिद्ध होतच असते. शिवाय छोटे छोटे लेख लिहिणे, प्रवासवर्णने हा तर अत्यंत आवडीचा छंदच! वयाच्या ५६व्या वर्षीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि अत्यंत साधे राहणीमान स्वीकारून वाचनाबरोबर प्रचंड प्रवास करायचा निर्णय त्यांनी घेतला. पत्नीच्या निधनापर्यंत देशांतर्गत एकत्र फिरायचे. हिमालयाच्या दऱ्याखोºयांतील ट्रेकिंग मात्र ते मुलगी लक्ष्मीबरोबर करीत असायचे. नेपाळच्या पर्वतरांगा, उत्तराखंडमधील गढवालचा परिसर, जम्मू-काश्मीरची खोरी, सिक्कीमची सर्वांगसुंदर हिमशिखरे, अन्नपूर्णाचा बेस कॅम्प, दाजिर्लिंग, आदी सर्व निसर्गाने नटलेली ठिकाणे त्यांनी पालथीघालण्यास सुरुवात केली. १९८८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर पर्यटनाचा एकही हंगाम त्यांनी खाडा जाऊ दिला नाही. एक पर्यटन पूर्णहोताच, पुढील पर्यटन दौऱ्याचा अभ्यास सुरू होणार, असे चक्र गेली तीस वर्षे चालू आहे. आज वय वर्षे ८६ असताना ते झिम्बाब्वेच्या दौºयावर गेले आहेत. गेल्याच वर्षी ते चीनला एकटेच तीन आठवडे जाऊ न आले.
जपान, आॅस्ट्रेलिया, संपूर्ण युरोप, अमेरिका, आफ्रिका खंडातील अनेक देश, आशिया खंडातील बहुतेक सर्वच देश त्यांनी स्वत:च्या पायांनी चालत दृष्टिआड घातले आहेत. जसे देशातील सर्वच राज्यांतील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळ, निसर्गाने नटलेली दरीखोरी तसेच निसर्गाचा आविष्कार अनुभवला आहे. त्याचप्रमाणे प्राचीन मंदिरे, शिल्पे, गुहा, वास्तूरचना अशा कोणत्याही प्रकारचे वैभव पाहणे, त्यांनी टाळले नाही किंवा त्यांच्या नजरेतून सुटलेले नाही. वीस एक वर्षांपूर्वी एकेदिवशी सांगलीला माझ्या घरी सकाळी नऊ वाजता त्यांचा फोन आला. कोल्हापुरात सहपत्नी आहे. अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या रचनेविषयी ऐकून, वाचून होतो. काल कोल्हापुरात पोहोचलो. दर्शन घेतले. मंदिराच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. पहाटेच्या प्रहरी मंदिराचे सौंदर्य न्याहाळले आहे. दुपारी चार वाजता मिरजेहून राणी चन्नम्मा एक्स्प्रेसने बंगलोरला जाण्यापूर्वी सांगलीत येतो आहे. दर पंधरा मिनिटाला सांगलीला कोल्हापूरच्या सेंट्रल बस स्टँडवरून गाडी सुटते. याची माहिती घेतली आहे. सव्वा तास लागेल असा अंदाज आहे. दुपारचे जेवण सोबत करू अन् पुढील प्रवास करेन असा सर्व सविस्तर तपशील चार मिनिटांच्या फोन संभाषणात स्पष्ट केला.
डॉ. बी. एन. मूर्ती यांच्या जीवनशैलीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर जी काही स्वत:ची गंगाजळी होती, त्यावर ते जीवन कंठतात. त्याचे योग्य नियोजन आहे. एक वेळच जेवण घेतात. सायंकाळी फळ किंवा उपमा, इडली असा साधा आहार घेतात. पहाटे उठून किमान आठ-दहा किलोमीटरची पायपीट होते. शेजारीच लालबाग आहे. कॉफीचा आस्वाद घेऊन सायंकाळपर्यंत जग समजून घेणारे वाचन चालू असते. ते प्रवासाला निघताना शक्यतो रेल्वेच्या द्वितीय वर्गाचाच आधार घेतात. रेल्वे नसेल तर एस.टी. गाडीने प्रवास करतात. हा सिरस्ता परदेशातील प्रवासातही आहे. गेल्या वर्षी चीनला गेले तेव्हा स्थानिक सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा त्यांनी वापर केला; पण चीनमध्ये त्यांची थोडी गडबड झाली. ते पोहोचले. पाट्या सर्व चिनी भाषेत लिहिलेल्या होत्या. गुगलवर गेले तर सर्व मजकूर आणि माहिती चायनीज भाषेतच येत होती. मग शक्कल लढविली. वय वर्षे पंचाऐंशी होते. एकटेच प्रवास करीत होते. शांघायहून पुढे जायचे होते. शेवटी वॉट्सअॅपवर मुलगी लक्ष्मीशी संपर्क केला. ती बंगलोरमध्ये बसून गुगलवर माहिती काढत होती. त्याचे स्नॅपशॉट्स घेऊन वॉट्सअॅपवर पाठवीत होती. त्या माहितीच्या आधारे डी. बी. एन. मूर्ती प्रवासाचे नियोजन करीत होते. त्यांना इतिहास प्रसिद्ध चायना वॉलवर चालायचे होते. ते नेहमी म्हणतात की, निसर्गाच्या आविष्काराबरोबरच मानवाने अनेक ठिकाणी चमत्कार वाटावा अशा कला-कृती करून ठेवल्या आहेत. त्या पाहणे, हे माझे स्वप्न आहे. चायनावॉल पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी जगाच्या पाठीवरील एकाही उपखंडाचा अपवाद केलेला नाही. त्यांना लॅटीन अमेरिकेतील देशांबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यांनी काही वर्षांपूर्वी (म्हणजे वय वर्षे ऐंशी असताना) एकट्याने पेरू देशाचा प्रवास केला होता. भारतातून विमान प्रवास; मात्र तेथे नो टॅक्सी, नो एरोप्लेन, रेल्वे किंवा बस गाडीने सर्वत्र संचार त्यांनी केला.‘आॅॅॅॅफ मॅन अॅण्ड माउंटन्स’ या शीर्षकाचे त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे.
गढवाळच्या पर्वतरांगा, त्यातून वाहणारी गंगोत्री, यमनोत्री, भागीरथी, आदी नद्यांचे वर्णन त्यांनी ‘आॅॅॅॅफ गॉडस् अॅण्ड माउंटन’ या प्रकरणात केले आहे. कुमाऊचे जंगल आणि त्यातून ट्रेकिंग केल्याचे उत्तम वर्णन आहे. भूतान आणि सिक्कीम हा भगवान बुद्धांचा प्रदेश त्यांनी अत्यंत जवळून न्याहाळला आहे. नेपाळचा तर त्यांनी अनेक वेळा प्रवास केला आहे. अन्नपूर्णा शिखराच्या बेसकॅम्पपर्यंत त्यांनी ट्रकिंग केले आहे. अशी त्यांची वर्णने वाचताना संपूर्ण प्रवास समोर उभा राहतो. अत्यंत साध्या भाषेत, शेरपाप्रमाणे मार्ग समजून सांगत त्यांनी ही प्रवासवर्णने लिहिली आहेत. भाषेवर प्रभुत्व आणि सर्व प्रवासातील प्रसंग आजही ताजीतवानी वाटावीत अशी त्यांना आठवतात. त्यांच्याकडे गेल्यावर नुकत्याच केलेल्या पर्यटन दौऱ्याचा विषय निघतो. त्याचे वर्णन ऐकून झाल्यावर पूर्णत: नियोजनाचा तपशीलही ते देत राहतात.
माणूस निवृत्तीनंतर हा छंद जोपासत संपूर्ण जगाची प्रदक्षिणा घालतो. याचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. इंटरनेटचा आधार तर त्यांना आता मोलाचा वाटतो. त्याच्या आधारे गुगलवर जाऊन संपूर्ण जग ते वाचत असतात. निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याचा आनंद घेतला पाहिजे, असे त्यांना वाटते. मात्र, माणसाने आनंद घेतानाच या निसर्गाच्या आविष्काराला नख लावता कामा नये, असेही ते मानतात. अनेक ठिकाणांचे प्रदूषण, घनकचरा पाहून ते खिन्न होतात. माणसाने निसर्गाच्या अस्तित्वात ढवळाढवळ करू नये, त्याला कोठे ठेच लागेल असे आपले वर्तन असू नये, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाच्या शेवटी, माझी निरीक्षणे म्हणून एक प्रकरण आहे. त्यात ते यावर स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडतात.
प्लास्टिकचा वापर, प्रदूषित करणारी सर्व साधने टाकून दिली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. निसर्गावर प्रचंड वेड्यासारखे प्रेम करणारा हा माणूस कधी थकेल, असे वाटत नाही. काही दिवसांपूर्वी भेट झाली तेव्हा पुढील दौरा झिम्बाब्वेचा करणार असल्याचे सांगत होते. त्या दौऱ्यात स्थानिक प्रवास हा स्थानिक सार्वजनिक व्यवस्थेच्या आधारेच ते करणार आहेत. त्या देशाचा संपूर्ण इतिहास, भूगोल, पर्यावरण, निसर्ग, जमीन, जंगल, पिके, पाणी, आदींचा सखोल अभ्यास त्यांनी आधीच करून ठेवला आहे. त्यांची मुले म्हणतात, आता वय झाले आहे, आता तरी प्रवास थांबवा! एकट्याने प्रवास करणे आता शक्य वाटत नाही. त्यावर त्यांचे एकच उत्तर असते,'
श्वास असेपर्यंत निसर्गात फिरत राहणार आहे. जेथे तो थांबेल तेथेच मला सोडून द्या! तेथून आणण्याचे कष्टही घेऊ नका. बाकीचा सर्व तपशील कपाटाच्या रकान्यात लिहून ठेवला आहे. परतीचा प्रवास मी करणार नाही, नेचरच गॉड आहे, त्याला भेटताना श्वास थांबला तर त्याहून आणखी कोणता मोठा आनंद असू शकतो. त्यांच्या या उत्तराने आपण निरुत्तर होतो. परवा समोर बसलेले असताना मी त्यांचे छायाचित्र घेत होतो तेव्हा वाटत होते की, नव्वदीच्या उंबरठ्यावर एका तरुण तजेलदार मनाच्या माणसाचे हे छायाचित्र आहे. झिम्बाब्वेचा एकट्याने दौरा करण्याच्या तयारीत ते तरुण मन तयार झाले आहे. माणूस वेडाच असावा लागतो. वेड्या माणसाकडूनच असे काहीतरी घडू शकते. त्यांना निसर्गातील आविष्कार अनुभवण्याचे वेड आहे. मानवाने या पृथ्वीवर उभारलेल्या सुंदर कलाकृती पाहण्याचे वेड आहे. यासाठीच मुलांची शिक्षण झाल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेऊन या माणसाने आपला छंद जोपासला आहे. सलाम डी. बी. एन. मूर्ती!मूर्ती यांनी भेट दिलेले देशआशिया : २० - भूतान, कम्बोडिया, चीन, हॉँगकॉँग, इंडोनेशिया, इराण, जपान, जॉर्डन, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ (१४ वेळा), फिलिपाईन्स, सिंगापूर, श्रीलंका, सिरिया, थायलंड (३ वेळा), तुर्की, युएई,व्हियतनामआफ्रिका : ५ --इजिप्त, इथियोपिया, केनिया, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, --आॅस्ट्रेलिया : १युरोप : २४ --आॅस्ट्रिया, बेल्जियम, बुल्गारिया, झेक रिपब्लिक, डेन्मार्क,फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हॉलंड, हंगेरी, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोलंड, रोमानिया, रशिया, स्लोव्हाकिया, स्पेन, स्विडन, स्वित्झर्लंड, यु.के., यगोस्लाव्हिया, --उत्तर अमेरिका : ३ --कॅनडा, मॅक्सिको, यु.एस.ए. --दक्षिण अमेरिका : १--इक्वेडोरअसे एकूण ५४ देश...