मधुकर भावे
बाबूजी,तुमच्या आणि माझ्या भेटीला ४६ वर्षे झाली. १९७४ ते १९९७. तेवीस वर्षे तुमच्या सहवासात गेली. तुमच्या मनाचं मोठेपण, तुमच्यातलं साधेपण, तुमच्यातला चिंतक, तुमच्यातला तत्त्ववेत्ता, छोट्या माणसांच्या खांद्यावर हात ठेवून अचंबित करणारा तुमचा सहज स्वभाव. तुम्ही किती जणांना मदत केलीत! किती स्वरूपाची मदत केलीत!!... पण हे करताना तुम्ही जे केलंत ते उजव्या हाताचं डाव्याला कळलं नाही. तुमच्यामध्ये एखाद्या साधकासारखी ही समचित्त वृत्ती होती. तुम्हाला ‘सिद्धी’ जमली होती; पण प्रसिद्धीची हाव नव्हती. तुम्ही असे एकमेव नेते आहात की टीकेचं विष तुम्ही वर्षानुवर्षे पचवलंत. तुम्ही स्वातंत्र्यसैनिक होतात. वयाच्या २५व्या वर्षी ‘नवे-जग’ साप्ताहिकाचे संपादक, मालकही होतात. लोकमत साप्ताहिक, द्वि-साप्ताहिक, नंतर दैनिक, त्याच्या दहा शाखा आणि त्याचा वटवृक्षाप्रमाणे पसरलेला पसारा हे सर्व तुमचं कर्तृत्व होतं. तुम्ही काँग्रेसचे नेते होतात. २३-२४ वर्षे आमदार होतात. १८ वर्षे मंत्री होतात. वसंतदादा पाटील असोत, शरद पवार असोत, बॅ. अंतुले असोत, निलंगेकर असोत, सुधाकरराव नाईक असोत किंवा पुन्हा पवारसाहेब असोत. भिन्न प्रकृतीच्या या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना ‘दर्डाजी’ मंत्रिपदी हवेत असं वाटायचं. कारण सरकारमधील अनेक कठीण प्रसंगांच्या निरगाठी तुम्ही सहज सोडवत आलात.
२ सप्टेंबर १९७४ ला आपली पहिली भेट तुमच्या घरी झाली. तुम्ही मला लोकमतसाठी मुंबईतून काम करण्यास सुचवलं. मी सहज बोलून गेलो. ‘माझी ‘मराठा’तील पत्रकारिता आक्रमक होती. तुमच्या वृत्तपत्राचं आणि माझं कसं जमेल?’ तुम्ही शांतपणे म्हणालात, ‘जमतंय का बघा! मी तुम्हाला सूट होतोय का तुम्ही बघा, तुम्ही मला सूट होता का, हे मी बघतो. महिनाभर प्रयोग करू...’ तुमच्या त्या एका वाक्याने पूर्ण दिवस मी अस्वस्थ होतो. पुढे ‘दर्डासाहेब’ या नावाऐवजी तुम्ही माझ्यासाठी ‘बाबूजी’ कधी झालात हे मला कळलेही नाही.पण हे सगळं करत असताना तुमच्या मनात मोठा माणूस कायम वस्तीला होता. त्या सर्वोत्तम मानवी गुणाची जाहिरातबाजी तुम्ही कधीही केली नाही. तुम्ही पदाने मोठे नव्हतातच. तुमच्यामुळे पदं मोठी झाली. तुमच्या मनाचं मोठेपण इतकं विलक्षण होतं बाबूजी, दिलदारी अशी काही होती, माणूसपण सदैव जागृत होतं, की आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या सर्व गुणविशेषांचं काळजीपूर्वक जतन करून त्या गुणांना तुम्ही वाढवलंत. तुम्हाला राग नव्हता, अहंकार नव्हता. संपादकपदाची जी काही थोडी गुर्मी असते ती कधीही नव्हती. मंत्री असताना सत्ता तुमच्या अंगात कधीच भिनली नाही. उलट तुमचं सत्तेतील मोठेपण तुमच्या विनयाच्या नम्र वागणुकीनं आणखी मोठं दिसू लागलं. माझं अगदी ठाम मत आहे, की तुमच्या या महानपणाचा महाराष्ट्राला कसलाच परिचय नाही. तुम्हाला त्यांची खंत नव्हती, त्याचा खेदही नव्हता; कारण कोणी मोठं म्हणावं यासाठी तुमचं मन मोठं नव्हतंच!बाबूजी, तुम्ही आयुष्यभर खादी वापरलीत. कॉंग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन शेवटपर्यंत एकटे लढत राहिलात. विचारांवर पक्के राहिलात. गांधी, नेहरू, स्वातंत्र्य आंदोलन हे सगळे तुमचे अत्यंत आत्मीयतेचे विषय होते. तुमच्या विश्रांतिगृहात सरदार भगतसिंग यांचा फोटो लावला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा चौघांचा तुम्हाला सहवास लाभला होेता. त्यांची विचारधारा तुम्ही जोपासलीत! १९४९ साली काढलेल्या साप्ताहिकाचं नाव तुम्ही ‘नवे जग’ ठेवलंत. तुमच्यातला माणूस समजून घ्यायला ही एक गोष्टही खरं तर पुरेशी व्हावी.
मंत्रिपदाचा वृथा अभिमान तुम्ही कधी बाळगला नाही. १९८० साली बॅ. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही उद्योगमंत्री झालात. लीली कोर्ट या निवासस्थानी तुमचं अभिनंदन करायला अनेक उद्योगपती आले होते. तुम्हाला त्यातल्या अनेकांची नावंही माहीत नव्हती. त्यांनी मोठमोठे पुष्पगुच्छ आणले होते. तुम्ही ते स्वीकारले. सर्वांचं आदरातिथ्य केलंत. सगळे गेल्यावर तुम्ही शिपायाला म्हणालात, ‘हिराजी, महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यासाठी आलेले हे सर्व पुष्पगुच्छ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दे, यातला एकही गुच्छ जवाहरलाल दर्डा या व्यक्तीचा नाही.’ मंत्रिपदाच्या स्वागतामागचं हे मुख्य सूत्र ज्याला कळलं; मंत्रिपद त्यांच्या डोक्यात जाणं कसं शक्य असेल ?
‘लोकमत’मध्ये सीमाताई साखरे महिलांचा कॉलम चालवत होत्या. ‘मधुमालती’ या नावाने. महिलांवरील अन्याय, अत्याचाराचे विषय त्या मांडायच्या. इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांच्यात कौटुंबिक वाद झाला. मनेका गांधींनी घर सोडलं. सीमाताईंनी कॉलम लिहिला... ‘सुनेला घराबाहेर काढणारी खाष्ट सासू’... नागपूरच्या एका आमदाराने इंदिराजींना फॅक्स केला. श्री. फोतेदार यांचा तुम्हाला फोन आला. ‘मॅडमने याद किया है।..’ तुम्ही आणि मी दिल्लीला गेलो. विषयाचा अंदाज होताच. इंदिराजींना भेटलो. भेटल्याबरोबर इंदिराजींनी टेबलाचा ड्रॉवर उघडला. फॅक्सची प्रत समोर ठेवली. ते कात्रण पाहून शांतपणे तुम्ही म्हणालात, ‘मॅडम, मै नम्रता से कहता हॅूं लोकमत चलाने के लिए सौ विचारधारा के लोग साथ में लेके मुझे काम चलाना पडता है। इतनी छोटी बातोें पर आपने ध्यान नही देना चाहिए।’थक्क होऊन इंदिराजी नुसत्या ऐकत राहिल्या. त्यांनी झेरॉक्स कॉपीची प्रत उचलून ड्रॉवरमध्ये ठेवली. ‘बाकी ठीक है ना..?’- त्यांनी विचारलं.
‘लोकमत’मध्ये प्रभाकर कोंडबत्तुनवार नावाचे उपसंपादक होते. त्यांचा लहान मुलगा अचानक गंभीर आजारी झाला. तुम्हाला कळताच तुम्ही कार्यालयात आलात. सांगितलंत, ‘घटसर्प असू शकतो, नागपुरात अॅडमिट करू नका. रात्रीच्या विमानाने मुंबईला न्या.’ त्यांच्या विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करून दिलीत. मुंबई विमानतळावर गाडी पाठविण्याची व्यवस्थाही केलीत. बॉम्बे हॉस्पिटलचे मॅनेजर श्री. शर्मांना सांगितलं. ‘माझ्या घरची केस असं समजा!’ सहा तासांत उपचार सुरू झाले. मुलगा वाचला. अशा किती जणांना तुम्ही कशा प्रकारे मदत केली असेल, याची गणती नाही. एकदा मी थोडा कौटुंबिक अडचणीत होतो. मोठी मुलगी कॅन्सरने दगावली होती. नैराश्य आलं होतं, तेव्हा पाठीवर हात ठेवून मला म्हणालात, ‘ मी तुमचं मन समजू शकतो; पण कौटुंबिक अडचणी सिकंदरालाही आल्या असतीलच की! तो जग जिंकायचं थांबला असता का? हिम्मत मत हारो, काम करते रहो। जीवन क्षणभंगूर आहे हे लक्षात ठेवा’... त्या शब्दांनी मनाचं ओझं हलकं होऊन गेलं. असे किती प्रसंग सांगू? शेतीचा, पानाफुलांचा, बांधकाम व्यवसायाचा तुमचा अभ्यास थक्क करणारा होता. नागपूरच्या आजच्या ‘लोकमत’च्या इमारतीचं प्रवेशद्वार आर्किटेक्टने चार फुटांचं ठेवलं होतं, तुम्ही संध्याकाळी कार्यालयात आलात, तो दरवाजा तोडायला लावलात व २४ फूट लांबीचं प्रवेशद्वार केलंत! अशा कितीतरी विषयांचा तुमचा अभ्यास होता. यवतमाळच्या बगीच्यात सकाळी पक्ष्यांचा मंजुळ आवाज ऐकत म्हणायचात, ‘भारतीय शास्रीय संगीताचं मूळ या पक्ष्यांच्या आवाजात आहे.’ सामान्य माणसाबद्दलची तुमची आपुलकी विलक्षण होती. व्यक्ती लहान असो वा मोठी, कोणाबद्दलही तुमच्या तोंडून एकही अपशब्द २४ वर्षांत मी ऐकलेला नाही.
नागपुरात ‘लोकमत’ सुरू करताना पत्रपंडित पां. वा. गाडगीळ यांना संपादक म्हणून आणणे, आणि त्यांचं नाव संपादक म्हणून टाकणे, औरंगाबादेत दैनिक लोकमतसाठी म. य. दळवी (बाबा दळवींना) संपादक म्हणून आणणं आणि या सर्व संपादकांना जीव लावून सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती. तुम्हाला माणसांची कमालीची पारख होती. घट्ट राजकीय भूमिका घेऊन परिणामांची पर्वा न करता तुम्ही इंदिराजींसोबत राहिलात. वसंतराव नाईक यांच्यासारख्या बंधुतुल्य मित्रापासून राजकीयदृष्ट्या अलग झालात; पण प्रेम, आदर यात तसूभरही फरक केला नाहीत.. राग-द्वेष याचा लवलेश तुमच्याजवळ किंचितही नव्हता. प्रेमाच्या शब्दाने माणसं जिंकता येतात हे तुमच्या जीवनाचं मुख्य सूत्र होतं; पण हा निव्वळ सिद्धांत नव्हता. कृती तशीच होती. मुंबईतील तुमच्या घरचे महाराज (स्वयंपाकी) राजस्थानच्या किशनगढचे होते. त्यांचं नाव लीलाधर महाराज. वयाच्या ७० वर्षांपर्यंत ते तुमच्या घरी महाराज म्हणून काम करीत होते. निसर्गनियमाने थकले तेव्हा ते गावी जायला निघाले. त्यांचा गावी जाण्याचा दिवस जवळ आला तेव्हा उषाताईंनी स्वत: स्वयंपाक करून त्यांना त्या दिवशी जेवू घातले. तुम्ही त्यांना धोतर, शर्ट, गांधी टोपी भेट दिली. १०,००० रुपयांचं पाकीट दिलं आणि त्यांना सांगितलंत, ‘महाराज तुमच्या गावी तुम्ही असेपर्यंत तुम्हाला महिना ७०० रुपये पेन्शन पाठविलं जाईल’. महाराजांच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली. तुम्ही स्थितप्रज्ञतेने त्यांना म्हणालात, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत असतो. आप जहाँ हो, हमारे हो.’
‘लोकमत’च्या प्रचंड यशाचं श्रेय किती किती जणांचं असेल? अगणित लोक असतील. ‘लोकमत’च्या यशाचे पहिले वाटेकरी घरोघरी वृत्तपत्र टाकणारी मुलं आहेत, असं तुम्ही सांगायचात. दर दिवाळीत एक दिवस या वृत्तपत्र विक्रेत्यांचं स्नेहसंमेलन तुम्ही घ्यायचात. सर्व कुटुंबीयांसह त्यांना आमंत्रण असे. त्यांच्या मुलांसाठी खाऊचं सामान, खेळणी सर्व आणायचात. मोठ्या मंडपात उत्तम जेवण व्यवस्था असायची. जवळ-जवळ प्रत्येकाला जिलेबीचा एक घास तुम्ही भरवायचात! कल्पना तरी करू शकतो का कोणी?तुमचा हा वारसा तुमचे दोन्ही सुपुत्र विजयबाबू आणि राजनबाबू यांनी त्याच आत्मीयतेने चालविला आहे. म्हणून ‘लोकमत’च्या बुटीबोरी येथील प्रवेशद्वारावर सायकलवरून ‘लोकमत’ विक्री करणाऱ्या पेपर विक्रेत्याचा पुतळा उभा केला गेला. ‘लोकमत’ तुमचा श्वास होता. १९८२ साली बाबासाहेब भोसले यांनी ‘लोकमत’च्या जाहिराती बंद केल्या तेव्हा तुम्ही शांतपणे आम्हा सर्व सहकाऱ्यांना म्हणालात, ‘फार चांगलं झालं सरकारच्या भरवशावर वृत्तपत्र अडून बसता कामा नये, याचा धडा तुम्हाला मिळाला. आता तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहा.’ ...आणि आज सबंध महाराष्ट्राच्या अष्टदिशांनी चौफेर पसरलेला ‘लोकमत’ सगळ्या प्रांतांत जनतेने स्वीकारलाय. अगदी गोवा आणि दिल्लीत ‘लोकमत’ धडकला. तुमचे प्राण ‘लोकमत’मध्ये कसे घुटमळले होते, ते डोळ्यांनी मी पाहिले. २५ नोव्हेंबर १९९७ ला तुमचा स्वर्गवास झाला. २४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता राजनबाबूंसोबत मी तुम्हाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेटलो. हात हातात घेऊन तुम्ही म्हणालात, ‘बंबईका क्या?’... म्हणजे ‘लोकमत’ची मुंबई आवृत्ती कधी सुरू करणार?’ आम्ही म्हटले, ‘आपण प्रथम बरे व्हा, मग नक्की!’ त्यावर थकल्या आवाजात तुम्ही म्हणालात, ‘मुंबई आवृत्ती निघाल्याशिवाय ‘लोकमत’चे चार दिशांचे वर्तुळ पूर्ण होणार नाही.’ दुसऱ्या दिवशी तुम्ही गेलात.
‘मृत्यू हा उत्सव असतो, असं तुम्ही म्हणायचात. तुमच्या मृत्यूचं दु:ख शांतपणे पचवून विजयबाबू, राजनबाबू, आम्ही सर्व कामाला लागलो. १ मे १९९८ ला ‘लोकमत’ची मुंबई आवृत्ती सुरू झाली. मुंबईच्या ‘लोकमत’ला २२ वर्षे झाली. औरंगाबाद ‘लोकमत’ला ३८ वर्षे झाली. जळगावच्या ‘लोकमत’ला ४३ वर्षे झाली. नागपूर ‘लोकमत’ पुढच्या वर्षी ५० वर्षे पूर्ण करील. बाबूजी, पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणारं तुमच्या मनाचं मोठेपण महाराष्ट्राने समजून घ्यावं, हीच तळमळ आहे. मनाची इतकी उंची, स्थितप्रज्ञता गाठलेले, मन:शांती ढळू न देणारे राजकारणातले चालते-बोलते तपस्वी होतात तुम्ही!पुढचा जन्म असलाच तर तुम्हाला भेटायला मी १० वर्षे उशीर करणार नाही.
(लेखक लोकमतचे निवृत्त संपादक आहेत)