थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर लोकप्रिय होत्या यात शंका नाही. कदाचित त्यामुळेच त्यांच्या मृत्युनंतर जेमतेम महिनाभराच्या आतच त्यांच्यावर पुन्हा मृत्यूस सामोरे जाण्याची वेळ आलेली दिसते. अद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असल्याने जयललिता जिवंत होत्या तोपर्यंत त्यांच्या पक्षातील सारे त्यांचे गुलाम होते. मैत्रीण म्हणून शशीकला नटराजन त्यातल्या त्यात जवळ इतकेच. साहजिक त्याच पक्षातील जयललितांची जागा नव्हे तर पद स्वीकारतील असे वातावरण असतानाच दुसऱ्या शशीकला म्हणजे पक्षातून खूप आधीच निलंबित खासदार शशीकला पुष्पा यांनी उघड आव्हानात्मक पवित्रा धारण करुन पक्षाच्या सरचिटणीसपदावर हक्क सांगितला. त्यांच्या या हट्टापायीच पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी एक रक्तरंजित हाणामारीही झाली. त्यामुळे हा संघर्ष तिथेच थांबेल असे समजायचे कारण नाही. दुसरीकडे याच पक्षाचे एक पाईक पी.ए.जोसेफ यांनी जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात शंका उपस्थित करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली असता, आश्चर्य म्हणजे ज्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली त्या खंडपीठानेदेखील ‘आमच्या मनातसुद्धा जयललितांच्या मृत्युविषयी शंका आहे’ असे उद्गार काढून दफन केलेला जयललितांचा मृतदेह तपासण्यासाठी पुन्हा बाहेर काढण्याचे आदेश आम्ही का देऊ नयेत असा सवालदेखील उपस्थित केला आहे. तब्बल ७५ दिवस त्या रुग्णालयात दाखल होत्या आणि मधून मधून त्यांची प्रकृती सुधारत आहे, त्या आहार घेत आहेत, कागदपत्रांवर सह्या करीत आहेत आणि बैठका घेत आहेत अशा बातम्या आम्हीही वाचत होतो मग अचानक असे काय झाले, हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. केवळ तितकेच नव्हे तर न्यायालयाने पंतप्रधान आणि केन्द्र तसेच राज्य सरकारला नोटीसदेखील जारी केली आहे. वस्तुत: जयललिता यांना पहिल्यांदा जेव्हां रुग्णालयात दाखल केले तेव्हांच त्यांचा अवतार आटोपल्याची कुजबुज सुरु झाली होती. पण कधी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तर कधी पक्षांतर्गत तजवीज करायला वेळ मिळावा म्हणून तर कधी भक्तांचे मनोबल खच्ची होऊ नये म्हणून जयललिता यांना बळेबळे जगवले जात होते अशीदेखील चर्चा होती. हे सारे खास दक्षिणी भडकपणाला साजेसेच होते. पण आता ते सारे अंगलट येण्याची शक्यता दिसत असल्याने जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा मरणाला सामोेरे जाण्याची वेळ येईल असे दिसते.
मृत्युनंतरचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 2:48 AM