विशेष : चेतन ननावरे३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन आता अगदी धूमधडाक्यात सगळेच करतात. खरं तर हा दिवस पाश्चात्य देशातून आलेला सण आहे. या वर्षी तर रात्रभर फिरणाऱ्या नागरिकांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी, म्हणून प्रशासनाने रात्रभर हॉटेल सुरू ठेवण्याची तयारी दर्र्शवली आहे. मात्र, हा इव्हेंट साजरा करताना त्याचे विकृतीकरण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे...राज्यासह मुंबईत पडलेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनच्या चर्चांना उधाण आले आहे. नाक्यावरच्या टपरीपासून आॅफिसमधल्या डेस्कपर्यंत प्रत्येकजण थर्टीफर्स्टचे प्लॅनिंग करत आहे. त्यात कॉमन विषय आहे, तो कोण किती आणि कितव्यांदा पिणार याची....थर्टीफर्स्ट म्हटले की, ‘थर्टी’ (३० मि.ली. दारू) ‘फर्स्ट’ असा गैरसमज देशात रूढ झाला आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण केल्याचा हा परिणाम म्हणता येईल. तोच गैरसमज दूर करण्यासाठी ‘नव्या वर्षाचे स्वागत होशमध्ये करा,’ असे म्हणत राज्याच्या नशाबंदी मंडळाने कंबर कसली आहे. नशाबंदी मंडळाच्या या मोहिमेत वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस आणि अनेक सामाजिक संस्थाही सामील झाल्या आहेत. थर्टीफर्स्टनिमित्त पिण्याचा आग्रह अनेक पार्ट्यांमध्ये होताना दिसतो. मात्र, अशा आग्रहाला स्पष्टपणे नाही म्हणता आले पाहिजे. दारूच्या नशेत कोणतीही व्यक्ती आनंद कसा साजरा करेल? किंवा नव्या वर्षाचे स्वागत कसे करेल? या प्रश्नांतच दारू न पिण्याचे उत्तर मिळते, असे प्रबोधन नशाबंदी मंडळ करत आहे. मुंबईच्या रस्त्यांवर एखाद्या सणोत्सवाप्रमाणे पोलिसांना थर्टीफर्स्टच्या रात्री पहारा द्यावा लागतो. कारण असते, एखाद्याचे सेलिब्रेशन दुसऱ्याच्या जीवावर बेतू नये हे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, ती पुरेशी नाही. एक हजार रुपये दंड किंवा सहा महिने वाहतूक परवाना रद्द किंवा दोन्ही अशा कडक शिक्षांची तरतूद असली, तरीही या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांत १० हजार ७०० तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत, तब्बल २ कोटी ४५ लाख ९६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.महिलांच्या सुरेक्षेची जबाबदारी कोण घेणार? हॉटेल व्यवसायिकांसाठीही थर्टीफर्स्टमध्ये म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. त्यात सरकारने पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देत, या इव्हेंटला परवानाच दिला आहे. मात्र, त्याच वेळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची, पार्टीसाठी येणाऱ्या महिला ग्राहकांची जबाबदारी कोण घेणार? याबाबत स्पष्टता यायला हवी. कारण दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबई कधीच सहन करू शकणार नाही.ज्या हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये उशिरापर्यंत पार्टी सुरू असणार आहे, अशा व्यवसायिकांनी त्या-त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रात्री पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करण्याची गरज आहे.खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घ्याथर्टीफर्स्टला हॉटेल किंवा हॉटेलबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची गरज आहे, ज्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या महिला वर्गाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देता येईल.मद्य सेवन केलेल्या ग्राहकांना स्वत:हून वाहन चालवू न देता, त्यांच्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षाची व्यवस्था केल्यास नक्कीच अपघात टाळता येतील. त्यासाठी हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेलबाहेरील रिक्षा किंवा टॅक्सी स्टँडजवळ नेहमीच्या मानाने अधिक वाहने उभे करण्याचे आवाहन करावे.
३१ डिसेंबरचे अंधानुकरण नकोच!
By admin | Published: December 27, 2015 1:38 AM