यदु जोशी
दहा दिवसांच्या गणरायांचं विसर्जन व्हायला एक दिवस बाकी आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभ्यतेचं विसर्जन चाललंय. एकमेकांविरुद्ध वाट्टेल ते बोलण्याची स्पर्धा लागली आहे. पूर्वीही प्रत्येक पक्षात एक शाऊटिंग ब्रिगेड असायची पण तिचा वापर कधीकाळी व सोईनुसार करवून घ्यायचे. आता असभ्य भाषा मुख्य बनली असून, सभ्यता अडगळीत पडत चालली आहे. ‘राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे’ हे प्रवीण दरेकरांचं विधान त्याचंच लक्षण आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या रुपाली चाकणकरांचं, ‘महिलांचा अपमान करणाऱ्यांचा गाल आणि थोबाडही आम्ही रंगवू शकतो’, हे विधानही राऊडी स्टाईलचंच.
दरेकरांना सुरेखाताई पुणेकर यांच्यासारख्यांचे रंगलेले गाल दिसले पण त्यामागचे कष्ट, बांधिलकी आणि समर्पण दिसलं नाही. ठाण्याच्या पहिल्या लावणी महोत्सवात फाटकी साडी घालून गेलेल्या सुरेखाताईंनी स्वत:चं विश्व तर निर्माण केलंच पण लावणी सातासमुद्रापार नेली. महिलांच्या भरगच्च उपस्थितीत त्यांचे शेकडो कार्यक्रम झाले. बीभत्सपणा, अंगप्रदर्शनाला फाटा देत संस्कारक्षम, ठेवणीतली लावणी त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली. सुरेखाताई अन् त्यांच्या दोन बहिणी लोकांकडे धुणीभांडी करायच्या, त्यातून साठलेल्या पैशांतून सुरेखाताई कथ्थक शिकल्या. हजारो मुलींना त्यांनी कलावंत म्हणून घडवलं. लावणी जातीपातीपलिकडे नेली.
राष्ट्रवादीला डिवचताना लोककलावंतीणी अन् लोककलेचा उपमर्द झाल्याची उपरतीही दरेकरांना झालेली नाही. यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, छाया-माया खुटेगावकर, शकुंतलाबाई नगरकर, मधु कांबीकरांपासून मंगला बनसोडेपर्यंतच्या लावणी/तमाशा कलावंतांनी समाजाचं निखळ मनोरंजन करताना दरवेळी गाल रंगवले, उच्चभ्रू समाजानं हिणवलेल्या कलाप्रांतात ठसा उमटवला. गर्दीतून कोणी नवथर स्टेजवर येईल आणि काही अशीतशी हरकत करेल; अशी कोणाची हिंमत होत नसे. समाजातील काही विशिष्ट लोकांनी अनैतिकतेचा ठप्पा मारलेल्या या कलाप्रकाराची पालखी वाहणाऱ्या या लोककलावंतीणींचा नैतिक धाकच तसा होता. हे सगळं दरेकर यांना समजलं असतं तर त्यांना कलावंत महिलांचे फक्त लाल गाल न दिसता त्यांचं योगदान दिसलं असतं.
‘पिंजरा’ सिनेमा खूप गाजला, पण समाजानं लोककला म्हणून स्वीकारलेला तमाशा ‘पिंजरा’ने सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य केला. लावणी, तमाशाकडील लोकांचा ओढा कमी करण्यासाठी तमाशाला सिनेमांमध्ये नेहमीच बदनाम केलं गेलं, असं मानणारा लोककलावंतांचा मोठा वर्ग आजही आहे. गाल रंगवून सिनेमा, टीव्हीचा पडदा गाजवणाऱ्या अनेक नट्या वेगवेगळ्या पक्षात गेल्या, तेव्हा त्यांच्या रंगवलेल्या गालांवर कोणी बोललं नाही. पण सुरेखा पुणेकरांसारखी अत्यंत लोकप्रिय लावणीसम्राज्ञी राजकारणात प्रवेश करत असताना दरेकर यांना हे असं विधान करावंसं वाटावं?
दिल्लीत काँग्रेस टार्गेटवर पण...
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील भाजपचे नेते हे शिवसेना व राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना ‘टार्गेट’ का करत असावेत? खरंतर उद्या भाजपला राज्यात काही चमत्कार करायचा तर या दोन पक्षांपैकीच एकाची मदत घ्यावी लागणार आहे. तरीही दोन पक्षांना खच्ची करण्याचं का चाललं आहे? की वरून तसे काही आदेश आहेत? राष्ट्रीय पातळीवर मोदी-शहा हे काँग्रेसला अधिकाधिक नाऊमेद करताना दिसतात, पण राज्यातील भाजपच्या नेत्यांचा निशाणा काँग्रेसवर नाही. शेवटी केंद्राचं राजकारण वेगळं, राज्याचं वेगळं. एकतर काँग्रेसच्या मंत्र्यांची काही प्रकरणं नसावीत किंवा भाजपच्या राज्यातील नेत्यांना ती काढायची नसावीत. काँग्रेसला असं अभय देण्यामागची काहीतरी रणनीती नक्कीच असली पाहिजे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या रडारवर शिवसेना, राष्ट्रवादी आहेत पण काँग्रेस नाही. प्रादेशिक पक्षांची स्पेस घेता येईल तितकी घ्यावी, असं सूत्र दिसतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ‘आज माजी अन् एकत्रित आले तर भावी सहकारी’ असा भाजपबाबत उल्लेख करून गुगली टाकली. चंद्रकांत पाटील काल म्हणाले, ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवस वाट पहा’... महाराष्ट्रात वेगळं काही घडणार तर नाही?
भाजपचं वेगळेपण
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे राज्यातील काही नेते दिल्लीला गेले होते. दिल्लीतील महाराष्ट्राच्या मंत्र्यांशी प्रदेश भाजपचा पुढेही ‘कनेक्ट’ राहील, असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. ते अन् देवेंद्र फडणवीस तेवढ्यावरच थांबले नाहीत. केंद्रातील मराठी मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी अन् भाजपचे राज्यातील पदाधिकारी यांची नावं समन्वयासाठी निश्चित झाली अन् काम सुरू झालं. गणेशोत्सवानंतर केंद्रातील मंत्र्यांचे विभागवार दौरे होणार आहेत. विश्वास पाठक, ओमप्रकाश शेटे, अमित चव्हाण हे भाजप-संघाची पार्श्वभूमी असलेले तिघे अनुक्रमे रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड या मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून जाणीवपूर्वक नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे विषय भाजप मार्गी लावत आहे.