कधी एखादी मंत्री विरोधी पक्षाच्या नेत्याच्या प्रकृतीची वास्तपुस्त करण्यासाठी अनपेक्षितपणे रुग्णालयात पोहचते, तर कधी प्रचारासाठी निघालेले दोन उमेदवार अचानक अमोरासमोर येतात अन् राजकीय विरोध बाजूला सारून अल्पोपहार, चहा घेत गप्पा मारतात! असे क्षण वाऱ्याच्या सुखद झुळकीसारखे सुखावून जातात; पण हल्लीच्या राजकारणात ते खूप दुर्मीळ झाले आहेत. राजकीय विरोधक म्हणजे जणू काही शत्रू असल्यासारखे हल्लीचे राजकीय नेते वागू लागले आहेत. साधनशुचिता हा शब्द तर राजकारणातून केव्हाच हद्दपार झाला होता; पण निवडणुकीत प्रचार करताना भाषेचा दर्जा सांभाळण्याचीही गरज अलीकडे राजकीय नेत्यांना वाटेनाशी झाली आहे. मतदाराला राजा संबोधल्या जाते; पण हल्ली मतदार नावापुरताच राजा उरला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत तर उमेदवार चक्क मतदारांना धमकवित असल्याचे प्रकार घडत आहेत.एखाद्या नवख्या उमेदवाराने असे प्रकार केल्यास एकदाची त्याकडे डोळेझाक करता येईलही; पण अनेक वर्षांपासून संसदेत प्रतिनिधीत्व करीत असलेले, जबाबदारीची पदे भुषविलेले ज्येष्ठ नेतेही मतांसाठी लोकशाही मूल्यांना खुंटीवर टांगून ठेवत अश्लाघ्य वक्तव्ये करतात, तेव्हा लोकशाहीचे काय होईल, हा प्रश्न कोणत्याही सुज्ञ नागरिकाच्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी भूतदयेसाठी ओळखल्या जातात. कोणत्याही मुक्या प्राण्याला थोडा जरी त्रास झाला तरी त्यांना अतीव दु:ख होते; मात्र आपल्याला मतदान न केल्यास कामे घेऊन याल तेव्हा लक्षात ठेवेल, असा धमकीवजा इशारा मुस्लिम मतदारांना देताना त्यांना काहीच वाटत नाही! त्यामुळे झालेल्या टीकेनंतर त्यांनी पक्षाच्या सोशल मीडिया सेलवर खापर फोडले; पण स्वत: काही धडा घेतल्याचे दिसले नाही. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी ‘एबीसीडी फॉमर््युला’ आणला. या ‘फॉमर््युला’नुसार, मतदारसंघातील सर्व गावांची मनेका गांधींना मिळालेल्या मतांनुसार ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ अशी वर्गवारी करण्यात येईल आणि संबंधित गाव कोणत्या श्रेणीत मोडते हे बघून विकासकामे केल्या जातील! स्वत:ला पशू हक्क कार्यकर्ती, पर्यावरणवादी म्हणविणाºया व्यक्तीने लोकशाही मूल्यांचा एवढा अनादर करावा?भारतीय जनता पक्षाचेच सन्यासी खासदार साक्षी महाराज यांनी तर त्यांना मतदान न करणाºया मतदारांना चक्क पाप लागेल, अशी धमकीच देऊन टाकली! ‘‘एक सन्यासी तुमच्या दरवाजात आला आहे. सन्यासी तुमच्या दरवाजात येतो, तुम्हाला भिक्षा मागतो आणि जर त्याला भिक्षा मिळाली नाही तर तो कुटुंबवत्सल व्यक्तीचे पूण्य घेऊन जातो आणि आपले पाप त्या व्यक्तीला देऊन जातो,’’ अशी मुक्ताफळे त्यांनी प्रचारादरम्यान उधळली. वरून हे आपले म्हणणे नाही, तर शास्त्रांमध्येच तसे नमूद केलेले आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. भाजपचेच गुजरातमधील आमदार रमेश कटारा यांनी तर मतदारांना धाक दाखविण्यासाठी नवीनच शक्कल लढवली. एका प्रचारसभेस संबोधित करताना ते म्हणाले, ‘‘मतदान यंत्रावरील कमळाचे चिन्ह असलेली कळच दाबा. यावेळी मोदीसाहेबांनी मतदान केंद्रांमध्ये कॅमेरे बसविले आहेत. कुणी भाजपला मत दिले अन् कुणी कॉंग्रेसला मत दिले, हे त्यांना तिथे बसल्या बसल्याच दिसणार आहे.जर तुमच्या मतदान केंद्रात भाजपला कमी मते पडली तर तुम्हाला कमी कामे दिली जातील. मोदीसाहेबांना तिथे बसल्या बसल्याच हे कळेल, की तुम्ही काही तरी चुकीचे केले आहे. तुमच्या मतदार ओळखपत्रावर, आधारकार्डवर आणि शिधापत्रिकेवरही तुमचे छायाचित्र आहे, हे लक्षात ठेवा!’’मतदारांना अशा धमक्या देण्याचे काम केवळ भाजपचीच नेतेमंडळी करीत आहे असे नव्हे! कॉंग्रेसची मंडळीही त्यामध्ये मागे नाही. कॉंग्रेस सोडून इतर कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबल्यास विजेचा धक्का लागेल, अशी अफलातून धमकी छत्तीसगढमधील एका मंत्र्याने मतदारांना दिली आहे. ज्या मतदारसंघात मंत्री महोदय प्रचारासाठी गेले होते, त्या मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराचे नाव मतदान यंत्रात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचा लाभ घेत मंत्री महोदयांनी मतदारांना असे सागितले, की पहिल्या क्रमांकाची कळ दाबल्यास तुम्हाला काहीही होणार नाही; मात्र दुसºया, तिसºया किंवा अन्य कोणत्या क्रमांकाची कळ दाबल्यास तुम्हाला विजेचा जोरदार धक्का लागेल. आम्ही मतदान यंत्रांमध्ये तशी व्यवस्था केली आहे, असे हे मंत्री महोदय म्हणाले.जगातील सर्वात मोठी लोकशाही असा भारताचा जगभर उल्लेख केला जातो. तमाम भारतीयांना त्याचा सार्थ अभिमानही आहे; मात्र स्वातंत्र्य, समता आणि न्याय या लोकशाही मूल्यांप्रती आम्ही प्रामाणिक आहोत का? क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी मतदारांना धमकावण्यापर्यंत मजल गाठणाºया नेत्यांना तरी त्या मूल्यांची चाड असल्यासारखे वाटत नाही. सरकारे येतील अन् जातील, नेते येतील अन् जातील; पण हा देश आणि देशाने स्वीकारलेली लोकशाही प्रणाली टिकली पाहिजे! त्यासाठी लोकशाहीच्या मूल्यांचे जतन कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे. राजकीय नेत्यांना ती समज नसेल तर सर्वसामान्य जनतेने ते उत्तरदायित्व निभावले पाहिजे आणि लोकशाहीचे सर्व लाभ उपटताना लोकशाही मूल्यांचाच अनादर करणाºया तमाम नेत्यांना त्यांची लायकी अन् जागा दाखवून दिली पाहिजे!
राजकारणाचा घसरता स्तर
By रवी टाले | Published: April 19, 2019 4:13 PM
साधनशुचिता हा शब्द तर राजकारणातून केव्हाच हद्दपार झाला होता; पण निवडणुकीत प्रचार करताना भाषेचा दर्जा सांभाळण्याचीही गरज अलीकडे राजकीय नेत्यांना वाटेनाशी झाली आहे.
ठळक मुद्देमतदारांना अशा धमक्या देण्याचे काम केवळ भाजपचीच नेतेमंडळी करीत आहे असे नव्हे! कॉंग्रेसची मंडळीही त्यामध्ये मागे नाही. ज्येष्ठ नेतेही मतांसाठी लोकशाही मूल्यांना खुंटीवर टांगून ठेवत अश्लाघ्य वक्तव्ये करतात, तेव्हा लोकशाहीचे काय होईल, हा प्रश्न डोकावल्याशिवाय राहत नाही.