भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा तळमळीचा सेवक हरपला आहे. ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून झालेले पहिले वकील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या वकिलीचाही प्रारंभ तलासरी आणि पालघर परिसरातच केला. भाजपा आणि संघाशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिलेत. लोकसभेवर ते तीन वेळा निवडून गेले. एकदा ते आमदारही झाले होते. त्यांनी आपली लोकप्रतिनिधित्वाची कारकीर्द इतक्या साधेपणाने पूर्ण केली की तीनदा खासदारकी आणि एकदा आमदारकी, ठाणे जिल्हा भाजपाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांच्याकडे नाव घ्यावे अशी एकही मालमत्ता नव्हती. जी काही जमीन आणि घर होते ते वडिलोपार्जित होते. त्यांनी घेतलेली इंडिका कार ही एकच मोठी मालमत्ता त्यांच्याकडे होती. तिचाही वापर ते समाजकार्यासाठीच अधिक करायचे. भाजपासारख्या पक्षात राहूनही त्यांनी कधीही कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही. आग्रह धरला नाही. २००९ मध्ये ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २0१४ च्या निवडणुकीवेळी विष्णू सवरांचा पारंपारिक वाडा मतदार संघाचे आरक्षण बदलावे लागले होते. त्यावेळी तिकिट वाटपाच्या बैठकीत वनगा यांनी स्वत:चा विक्रमगड मतदारसंघ सवरांसाठी सोडण्याची तयारी दर्शविली. त्याचे बक्षीस म्हणून भाजपाने त्यांना पालघर लोकसभेसाठी उमेदवारी दिली. तिचेही त्यांनी सोने केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी त्यांचा जवळपास १३ हजार मतांनी पराभव केला होता. त्याचे उट्टे त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काढले. त्यांनी जाधव यांचा २ लाख ३९ हजार ५२० मतांनी पराभव केला. ते आदिवासी असले तरी संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीनही स्वरूपाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. एका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्न केले. चार दशकांच्या राजकीय जीवनात त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नोंदविला गेलेला नव्हता. अलीकडच्या काळात आपल्या ज्येष्ठत्वाचा मान राखला जात नाही, अशी त्यांची खंत होती. या भावना पक्षातील योग्य व्यासपीठावर ते मांडतही होते. प्रसारमाध्यमांकडे धाव घेण्याचा आततायीपणा मात्र त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा एक समर्पित कार्यकर्ता भाजपाने गमावला यात शंका नाही.
समर्पित कार्यकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 4:33 AM