विकास झाडेफेब्रुवारी २०२०. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार म्हणून त्यांच्या स्वागताची तयारी. त्यांना येथील फाटकेपणा दिसू नये म्हणून अहमदाबादेत उभारण्यात आलेली ‘गरिबी छुपाओ भिंंत’. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा शिगेला पोहोचलेला प्रचार, देशावर येत असलेले कोरोनाचे संकट. मध्यप्रदेशात सरकार यावे म्हणून भाजपकडून रचलेले डावपेच, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (एनआरसी) शाहीनबाग येथे महिलांच्या अहिंसावादी आंदोलनाला देशभरातून मिळत असलेला प्रतिसाद व त्या आंदोलनाचा प्रतिकार म्हणून ‘नाथुराम विषाणू’ने फुत्कारण्याचा काळ. नंतर ईशान्य दिल्लीत उसळलेली दंगल. या सर्वच चांगल्या-वाईट गोष्टी देशाने अनुभवल्या.
दिल्लीत ट्रम्प यांचे स्वागत दंगलीने झाले. शाहीनबाग व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात एनआरसीच्या विरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलनच दंगलीला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. २३ फेब्रुवारीला दिल्लीत हिंदू-मुसलमानांमध्ये दंगल भडकली. त्याचे पडसाद सहा दिवस होते. ईशान्य दिल्लीतील सोनिया विहार, गोकुळपुरी, जाफराबाद, कबीरनगर, विजय पार्क, मौजपूर, करावल नगर, सिलमपूर आदी भाग बेचिराख झाला. सर्वत्र इमारती, दुकाने, वाहनांचे सांगाडे होते. रस्त्यांवर दगड-विटांचे ढिगारे होते. जिकडे पाहावे तिकडे रक्ताचा सडा होता. या दंगलीत ५३ जणांचा बळी गेला. त्यात ३६ मुस्लिम आणि १५ हिंदू होते. या दंगलीत ४३४ लोक जखमी झालेत. २२०० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ७८३ गुन्हे नोंदविले गेले. दंगलीला शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. उत्तरपूर्व दिल्लीतील जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी या भागातील दंगलीच्या जखमा अद्यापही ताज्या आहेत. ही दंगल कशामुळे झाली? त्याची पाळेमुळे कशात आहेत? खरे आरोपी कोण? याबाबत दिल्ली पोलिसांनी बरेच अध्ययन केलेले दिसते. आता आरोपपत्र दाखल होत आहेत. शाहीनबाग व जामिया मिलियामधील आंदोलन उधळून लावण्यासाठी विषाक्त विचारांची उधळण करणारे महाभाग या दंगलीस कारणीभूत ठरू शकतात, असेही अंदाज व्यक्त होत गेले. परंतु, दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रांमध्ये या बाबींचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास हा एकाच विशिष्ट दिशेने वळविण्यात आल्याची शंका येते.
एनआरसीला विरोध करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. जामिया मिलियाची समाजशास्त्रात एम.फिल्. करणाऱ्या २७ वर्षीय सफुरा जरगर हिला अटक करण्यात आली आहे. ती गर्भवती आहे. २३ फेब्रुवारीला तिने चांदबाग इथे भाषण दिले होते, त्यामुळे दुसºयाच दिवशी इथे दंगल भडकली, असे मत पोलिसांनी नोंदविले. मी भाषण केलेच नाही; केवळ त्या भागातून गेले होते, असे सफुराचे म्हणणे आहे. तीे अद्यापही तुरुंगातच आहे. ‘नाथुराम विषाणू’ची लागण झालेल्यांनी तिच्या गर्भवती असण्यावर घाणेरडे तोंडसुख घेतले आहे. तिच्यावर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए)अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे तिला जामीन मिळणार नाही. याच श्रृंखलेत ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी उमर खालिद आहे. आम आदमी पार्टीचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन, जामिया को-ऑर्डिनेशचे प्रमुख मिरान, आसिफ तनहा, इशरत असे शेकडो आरोपी आहेत.
शाहीनबागप्रमाणेच जामिया मिलियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततेत होते. पोलीस जामियात शिरले. लायब्ररीत बसलेल्या विद्यार्थ्यांना बदडले. अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्याच विद्यापीठाचे नाव गुणवत्तायादीत आले. पोलिसांनी आम्ही जामियाच्या इमारतीमध्ये गेलोच नव्हतो, असा खुलासा केला. एक व्हिडिओ प्रकाशात आला व पोलिसांच्या खोटारडेपणाचे बिंग फुटले. या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी राजघाटावर शांतता मार्च काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर तरुणाने ‘ये लो आझादी’ म्हणत गोळीबार केला. हा राष्ट्रभक्त आहे असे अभिमानाने म्हणत एक संघटना त्याचा सत्कार करण्याचे जाहीर करते. शाहीनबागला केंद्रबिंदू करत ‘देश के गद्दारों को, गोली मारो सोलों को’ हे वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुरांचे वक्तव्य दुर्लक्षित करायचे काय? त्यानंतर अन्य एक तरुण आंदोलकांवर गोळ्या झाडतो. भाजपचे नेते कपिल मिश्रा २३ फेब्रुवारला मौजपूर भागात जातात. आंदोलनकर्त्यांना हटवा. ट्रम्प येणार असल्याने परत जात आहोत. नंतर तुमचेही ऐकणार नाही, अशी पोलिसांना ताकीद देतात. दुसऱ्या दिवशीपासून दंगलीने विक्राळ रूप धारण केले असते. मोहन नर्सिंग होमच्या छतावरून गोळीबार केला जातो. गोळीबार करणारे लोक कोण आहेत हे स्पष्टपणे दिसते. यातील किती जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत? आरोपपत्रांमध्ये या बाबींची दखल का घेतलेली नाही? दिल्ली पोलिसांना याचे उत्तर द्यावे लागेल.
एक बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. हिंसेत मुसलमानांनी अनेक हिंदूंना वाचविले व हिंदूंनी मुसलमानांना. शिखबांधव पगडी उतरवत मुसलमानांचा आधार झाले. ते वार करणाऱ्यांसमोर ढालीसारखे उभे राहिले. मशिदी व मंदिरे उद्ध्वस्त होऊ दिली नाहीत. सर्वाधिक हिंसा झालेल्या जाफराबाद येथील मस्जिदीतून शांतता राखण्याचे आवाहन केले. चितावणीखोरांना यातील सलोखा कळणार नाही. प्रसंगानुरूप नाथुराम विषाणू असेच डोके वर काढत राहील. ‘कालाय तस्मै नम:’ अशी पोलिसांची भूमिका निश्चितच न्यायोचित दिसून येत नाही.(लेखक लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक आहेत)