‘ते’ सरकारमध्ये आहेत, सरकारसोबत ‘दिसत’ नाहीत!
By यदू जोशी | Published: November 17, 2023 09:22 AM2023-11-17T09:22:34+5:302023-11-17T09:23:04+5:30
सरकारमध्ये अजित पवार अजूनही पूर्णत: मिसळल्यासारखे वाटत नाहीत. फारसे बोलत नाहीत, अबोलीच्या झाडाला मग शंकेची फळं येत राहतात.
- यदु जोशी
जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाल्याबरोबर त्यांनी हॉस्पिटलच्या सर्टिफिकेटसह सोशल मीडियावर पोस्ट टाकली. अजित पवार यांना डेंग्यू झाला तेव्हा त्यांनी ना अशी पोस्ट टाकली ना सोशल मीडियातून स्वत: माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल यांनी ही बातमी सगळ्यांना सांगितली. पोस्टला सर्टिफिकेट जोडून जयंत पाटील यांना काही सुचवायचे असावे. अजितदादांच्या डेंग्यूबाबत नकळत शंका घ्यायची असावी. अजितदादांचा डेंग्यूही खराच होता; पण टायमिंग चुकलं... त्यांचं नाही; पण डेंग्यूचं टायमिंग चुकलं म्हणा हवं तर! गजानन कीर्तीकरांशी भांडण आटोपताच रामदास कदम यांनी तोफेची दिशा बदलली अन् ती अजितदादांवर डागली, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या नाराजीचा सामना करीत असताना अजितदादांना नेमका डेंग्यू झाला होता,’ असा निशाणा त्यांनी साधला. शिंदेंना भेटून आल्याबरोबर रामदासभाई बोलल्याने वेगळा अर्थही काढला गेला.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात खूप चांगलं ट्युनिंग दिसतं; पण एकनाथ शिंदे-अजित पवार संबंधांमध्ये जरा गडबड दिसते. शिंदेंना ते घुसखोर वाटत असावेत. अजितदादांच्या फायलींचा प्रवास सीएमओमध्ये अडतो; ताटकळतो असं म्हणतात. तर शिंदेंकडून सुचविलेल्या कामांची म्हणावी तशी दखल अजित पवारांकडून घेतली जात नाही अशीही चर्चा आहे. काळ बदलला की संदर्भही बदलत जातात. महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्त खातं अजित पवारांकडे होतं तेव्हा निधीबाबत ते काँग्रेस, शिवसेनेच्या आमदारांवर मोठा अन्याय करतात, अशा तक्रारी व्हायच्या. आताही ते वित्त मंत्री आहेत; पण निधीवाटपात त्यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांवरच अन्याय होत असल्याच्या बातम्या येताहेत. अजितदादा वित्त मंत्री आहेत अन् त्यांच्याच पक्षाचे आमदार नाराज असल्याच्या बातम्या याआधी कधीही आल्या नव्हत्या. महाविकास आघाडीत असलेलं स्वातंत्र्य महायुतीत मिळत नाही असं तर त्यांचं झालेलं नाही ना?
या सरकारमध्ये अजित पवार अजूनही पूर्णत: मिसळल्यासारखे वाटत नाहीत. फारसे बोलत नाहीत, अबोलीच्या झाडाला मग शंकेची फळं येत राहतात. ते सरकारमध्ये आहेत; पण कधीकधी सरकारसोबत दिसत नाहीत. सरकारवरील आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेचे मंत्री, आमदार पुढे दिसतात. राष्ट्रवादीतून असा पुढाकार फारसा घेतला जात नाही. शिंदेंनी ‘मातोश्री’शी नाळ तोडली; पण अजित पवारांनी गोविंदबाग, मोदीबागेशी पूर्ण नाळ तोडलेली नाही, हे परवा दिवाळीत दिसलंच. शिंदे-अजित पवारांमध्ये हाच फरक आहे! राज्यात सध्या जी राजकीय कटुता आहे ती लोकसभा निवडणुकीनंतर संपेल असं भाकित देवेंद्र फडणवीसांनी परवा पत्रकारांशी अनाैपचारिक चर्चेत वर्तवलं; कटुता संपणार म्हणजे आणखी काही धक्के, नवं मनोमिलन तर फडणवीसांच्या दृष्टिपथात नाही ना?
हेच ते सहा मतदारसंघ
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार आम्ही सामान्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली, असा बाईट उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अलीकडेच दिला होता. ‘पत्रकारांना ढाब्यावर जेवायला न्या,’ हा बावनकुळेंचा आदेश मात्र त्यांनी मानला नाही. दिवाळीनिमित्त फडणवीसांनी पत्रकारांना त्यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर जेवण दिलं. गप्पाटप्पा झाल्या. भाजप ४२ जागा जिंकणार म्हणतो तेव्हा प्रश्न पडतो की, सहा जागा उरतील; त्या कोणत्या? तर बावनकुळेंनी त्याचं अनाैपचारिक उत्तर देऊन टाकलं. ‘बारामती, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य, धाराशिव, चंद्रपूर आणि नांदेड हे ते सहा मतदारसंघ आहेत. आम्ही तिथेही ऑन फिल्ड जोरदार तयारी करीत आहोत; सगळी ताकद लावू,’ असं बावनकुळे सांगत होते. या सहा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमधील दोन तगडे काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये नेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात असल्याची माहिती आहे. आता ते मतदारसंघ कोणते अन् त्यातले दोन तगडे नेते कोणते, हे तुम्हीच सांगा?
आयपीएस दिल्लीत का जातात?
महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी हे गेल्या काही वर्षांत दिल्लीत प्रतिनियुक्तीवर मोठ्या प्रमाणात का जात आहेत? एकतर केंद्रातील प्रतिनियुक्ती अनिवार्य आहे, हे एक कारण! दुसरं हे की निवृत्तीच्या काही वर्षे आधी पुन्हा केंद्रात जाऊन उच्च पद मिळणं सोपं जातं. राज्यातील गेल्या चार वर्षांतील टोकाच्या राजकीय संघर्षात आपला बळी जाईल, या भीतीनेही काहींनी केंद्रात प्रतिनियुक्ती घेतली. वर्षानुवर्षे साइड पोस्टिंग मिळालेल्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकारी महिलेनेही दिल्लीत पोस्टिंग मागितलं आहे.