- बिल्वदा काळे-बक्षीविज्ञान, धर्म आणि पर्यावरण, बघायला गेलं तर काय फरक आणि काय नाही... वेगळे आहेत खरंच की सारे एकच? विज्ञान म्हणतं कणाकणात ऊर्जा आहे तर धर्म म्हणतो कणाकणात देव आहे, ऊर्जा किंवा शक्तीचा उगम म्हणजे देव, हो ना? म्हणून तर आपण प्रत्येक शुभ कार्य गणपती बाप्पाचं पूजन करून आरंभ करतो.खरेतर पर्यावरण आणि धर्म यातील काही सारखे तर काही वेगळे पैलू आहेत. गेल्या कित्येक वर्षांत आपला देश खूप विकसित झाला. आर्थिक, सामाजिक, तंत्रशास्त्र असा सर्वंकष विकास झाला. पण या विकासात एक अगदी महत्त्वाची बाजू कुठेतरी हरवली, ती म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. प्रगती तर झाली पण ती कायमस्वरूपी राखणंदेखील तितकंच आवश्यक आहे. या प्रगतीच्या मार्गावर पर्यावरण मागे सुटत गेलं. पर्यावरणाची होणारी हानी वाढू लागली. आपल्या भोवतीची जंगलं, झाडं, नद्या, काहीच प्रतिक्रिया न देता त्यांना होणारं प्रत्येक दु:ख आजवर सहन करत गेले पण गेल्या काही वर्षांत परिणाम दिसू लागले. नद्या सुकू लागल्या, ग्लोबल वॉर्मिंग वाढले, अॅसिड रेनचे प्रमाण वाढले. प्रदूषण तर सर्वांगीच पसरले. आता झालेल्या हानीची नोंद घेणं अनिवार्य झालं. आणि त्याचे परिणाम किती सुखद!पर्यावरणाबाबतची जागरूकता नक्कीच वाढत चालली आहे. आज फक्त काही पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर कंपनी, खास संघटना, एनजीओ, शैक्षणिक संस्था तसेच सरकारसुद्धा पर्यावरणासाठी कार्यरत होत आहे. अगदी सामान्य माणूससुद्धा दैनंदिन जीवनात पर्यावरणस्नेही कार्य करत असतो. हे अतिशय उठून दिसतं ते म्हणजे आपल्या सणावाराच्या दिवशी. गणेशोत्सवाचं बघा ना! पारंपरिक शाडूची मूर्ती परत स्वीकारली जातेय. त्याचसोबत आजकाल वेगवेगळे सर्जनशील पर्यावरणप्रेमी विविध नवीन प्रयोग करत असतात, जसे लाल मातीची मूर्ती ज्यात बिया पेरलेल्या असतात म्हणजे गणेश विसर्जन कुंडीत करा आणि त्याचे झाड जोपासता येईल! कागदाच्या लगद्याची मूर्तीसुद्धा तितकीच प्रसिद्धी मिळवतेय. आजकाल प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती कमी होऊन शाडूच्या मूर्ती जास्त दिसतात.बाप्पांभोवतीची आरास हल्ली बदलू लागली आहे. थर्मोकोलच्या जागी कागद, पुठ्ठा, कागदी फुले, खरी फुले, लाकडी देव्हारा जास्त बघायला मिळतो. हादेखील आशावादी संदेश म्हणू शकतो. थर्माकोल खूप काळ कचऱ्यात जसाच्या तसा राहतो आणि आपला परिसर अस्वच्छ करतो. याउलट कागदाचं विघटन लवकर होऊन हानी कमी होते. इतकंच नव्हेतर, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता बदल होतोय. आपण निर्माल्य मातीत मिसळून त्याचं छान खत करू नये?आता तर सरकार नियम बदलतंय, सार्वजनिक गणेशोत्सवाचे मांडव कमी करणं, मिरवणुकीत आवाज नियंत्रित असावा, विसर्जनासाठी कृत्रिम स्रोत, तलाव बनवणं असे विविध उपक्रम राबवले जातात. लहान लहान मुलं पर्यावरणाची काळजी घेऊ लागलीत. अशीच वाटचाल करत निश्चितच पर्यावरणासोबत माणसाची प्रगती नुसती कायम नव्हे, तर अखंड होत राहील. मग पर्यावरण, विज्ञान आणि श्रद्धा व आपला धर्म हे एकत्र येऊन होणारा संगम अद्भुत होईल.(साहाय्यक प्राध्यापक, पारुल विद्यापीठ, बडोदा)
ही तर ‘पर्यावरणप्रेमी श्रीं’ची इच्छा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:38 AM