- विजय दर्डाकामाच्या व्यापामुळे मला वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम पाहण्यास तसा फारसा वेळ मिळत नाही. तरीही जे पाहणे शक्य होते त्यावरून हे जाणवते की, हिंदी वृत्तवाहिन्यांची भाषा खूपच खालच्या दर्जाची होत चालली आहे. खासकरून भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले असण्याच्या सध्याच्या दिवसांत दोन्ही देशांतील वृत्तवाहिन्या चिंता वाटावी एवढ्या बेलगाम झाल्याचे दिसते. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली या वाहिन्यांवर वापरल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषेचे पत्रकारितेच्या मापदंडाने कधीही समर्थन होऊ शकत नाही.मी गेली कित्येक वर्षे पत्रकारिता जगत आलो आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाच्या अनिष्ट गोष्टी शिरल्याचे पाहतो तेव्हा खूप वाईट वाटते. काही भारतीय वृत्तवाहिन्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी व काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरत असतील तर ते योग्य आहे का? मला वाटते की, हे कदापि योग्य नाही. काही झाले तरी इम्रान खान व मोदी दोघेही आपापल्या देशांचे विधिवत पंतप्रधान आहेत. पंतप्रधान या पदाला स्वत:ची अशी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तीविषयी भाष्य करताना त्या पदाची शालीनता मलिन होणार नाही, याचे भान माध्यमांनी ठेवायलाच हवे! हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये शालीनता तर संपल्यातच जमा आहे, ही मोठी दुर्दैवी बाब आहे. भाषेच्या बाबतीत ज्यांनी अजून ताळतंत्र सोडलेले नाही, अशा अपवादाने एखाद-दोन वृत्तवाहिन्या दिसतात. बाकी बहुतांश वाहिन्यांची भाषा शिवराळच असते. जणू काही जास्तीत जास्त अपशब्द वापरण्याची स्पर्धाच सुरू आहे!पाकिस्तानात काय चाललंय याची मला फारशी चिंता नाही. मात्र हिंदुस्थानात जे काही दिसते आहे त्याने मात्र मी नक्कीच चिंतित आहे. जे काही चालले आहे ते आपल्या संस्कृतीला धरून तर नाहीच नाही. आपली संस्कृती शत्रूलाही सभ्यतेने वागणूक देण्याची आहे. त्यामुळे आपल्या वृत्तवाहिन्यांनी निदान या संस्कृतीचे तरी भान ठेवायला हवे. भारतात टीव्हीच्या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या तेव्हा छापील वृत्तपत्रांमधील पत्रकारच सुरुवातीस तेथे गेले होते. एखादा विषय घेऊन त्यावर गांभीर्याने चर्चा कशी करावी, याची त्यांना जाण होती. त्या चर्चा खºया अर्थाने विचार-विनिमय असायच्या. एखाद्या विषयावरील विविध पैलू श्रोत्यांपुढे आणता यावेत यासाठी विविध तज्ज्ञ आणि अभ्यासकांना एका मंचावर त्यासाठी आणले जायचे. सुमारे १० वर्षांपूर्वीपर्यंत परिस्थिती ठीकठाक होती. पण त्यानंतर दर्जाची घसरण सुरू झाली. हळूहळू अशा चर्चांमध्ये राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांचा वरचश्मा दिसू लागला. कार्यक्रमाचे ‘अँकर’ पक्षपाती होऊ लागले व विचारमंथन पार हद्दपार झाले.काही दिवसांपूर्वी मी एक वृत्तवाहिनी पाहत होतो. त्या कार्यक्रमात पाकिस्तानमधील दोन पाहुणेही सामील होते. दोन्ही बाजूंचे साधक-बाधक म्हणणे ऐकायला मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. पण थोड्या वेळातच त्या कार्यक्रमाचा ‘अँकर’ एकेरी भाषेवर आला. त्याने त्या पाकिस्तानी पाहुण्याला घरात घुसून मारण्याचीही धमकी दिली! मी अगदी अवाक् झालो! याला कोणती पत्रकारिता म्हणावी हे मला कळेना. तुम्ही एखाद्याला पाहुणा म्हणून बोलावले तर त्याचा आदर करणे ही तुमची जबाबदारी ठरते. त्या पाहुण्याचे बोलणे कितीही अप्रिय वाटले तरी त्याला चांगल्या शब्दांत उत्तर देता येते. चर्चेच्या कार्यक्रमात मारहाणीची भाषा करणे याला बेमुर्वतपणा नाही तर काय म्हणावे?दुर्दैवाने वृत्तवाहिन्यांनी टीव्हीच्या पडद्याला युद्धभूमीचे स्वरूप आणले आहे. असे वाटावे की, जणू या टीव्हीच्या पडद्यावर भारत व पाकिस्तान यांचे युद्ध सुरू आहे व जम्मू-काश्मीरचा फैसलाही याच पडद्यावर होणार आहे! किती विचित्र गोष्ट आहे नाही? खरे तर टीव्ही माध्यम उद्योगाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सर्व वाहिन्यांच्या संचालकांनी एकत्र बसून आपला चेहरा पत्रकारितेच्या निकषांच्या आरशात पाहायला हवा! वाहिन्यांची भाषा बेलगाम होत चालली असली तरी मी पूर्णपणे निराश नाही. भाषेची लाज राखणारे अनेक पत्रकार अजूनही आहेत. आपल्या देशात तर असे पत्रकार आहेतच, पण या संदर्भात मी पाकिस्तानच्या नज्म सेठी यांचा आवर्जून उल्लेख करीन. सेठी भारतीय नेत्यांचा उल्लेख त्यांच्या नावाला ‘जी’ किंवा ‘साहेब’ असे आदरवाचक संबोधन जोडल्याशिवाय कधीही उच्चारत नाहीत. सेठी नेहमी सत्याची कास धरतात, त्यामुळे त्यांचा ‘सेठी से सवाल’ हा टीव्हीवरील कार्यक्रम तेथील सरकारने बंद करायला लावला आहे. मला असे ठामपणे वाटते की, सत्य आणि शालीनता हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे. बीबीसी, सीएनएन, अल जजीरास, रशियन टीव्ही, टीव्ही फ्रान्स यासारख्या जगातील ख्यातनाम वृत्तवाहिन्या पाहा, त्यांचे ‘अँकर’ बेंबीच्या देठापासून ओरडताना तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. कितीही गरमागरम विषय असला तरी ते शालीनता कधी सोडत नाहीत.(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)
शत्रुत्व असले तरी सभ्यता सोडून चालणार नाही!
By विजय दर्डा | Published: September 16, 2019 4:55 AM