- किरण अग्रवाल
यंदा नेहमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा अधिकचा पाऊस वादळी वाऱ्यासह झाला, तर मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागू शकेल. त्यापासून बचावायचे, तर नियत साफ ठेवून, म्हणजे संबंधित कामांमधून ‘काही’ हाती लागेल, याची अपेक्षा न बाळगता ती तातडीने उरकायला हवीत.
नियतीचा फेरा चुकत नाही, असे म्हणतात. यातील अंधश्रद्धा घडीभर बाजूस ठेवून ते एकवेळ खरेही मानूया; पण नियत साफ असली, तर अनेक फेरे टाळता येतात, हेही तितकेच खरे. आपल्याकडे सरकारी यंत्रणेमार्फत होणाऱ्या कामांमध्ये तेच दिसत नाही, म्हणून अस्मानी संकटाला सुलतानी बेफिकिरीची जोड लाभून जाते. उन्हाळे-पावसाळे तोंडावर येतात व प्रसंगी सरूनही जातात, तरी त्यासंबंधी उपाय योजनांची कामे सरत नाहीत, यामागेही संबंधितांची नियत साफ नसल्याचेच कारण देता यावे.
यंदा कडाक्याच्या उन्हात सारेजण भाजून निघत असताना, जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत पहिल्याच फटक्यात एक बळी घेतला आहे. बार्शी-टाकळीचा एक तरुण सतीश भाऊराव शिरसाट हा त्याच्या दुचाकीने अकोला येथे खासगी नोकरीच्या कामावर येत असताना, वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून त्याचा मृत्यू झाला. पित्याच्या पश्चात आपल्या आईचा एकुलता एक आधार असलेला हा तरुण नियतीने हिरावून घेतला. या दुर्दैवी घटनेबद्दल समाज मनात हळहळ असणे स्वाभाविक आहे. अखेर निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही, हे खरेच, पण अशा घटना घडून जातात तेव्हा त्यातून संकेत वा बोध घेऊन यापुढे तसे काही होणार नाही, याची काळजी घ्यायची असते. तेच होताना दिसत नाही.
मान्सून व मान्सून पूर्व पावसात वादळी वाऱ्यामुळे शहरात वृक्ष उन्मळून दुर्घटना घडत असतात. हा नेहमीचाच अनुभव आहे. यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावून गेला, तरी स्थानिक प्रशासनातर्फे शहरातील धोकादायक वृक्ष छाटणी केली गेलेली दिसत नाही. इतकेच कशाला, विविध भागातील पावसाळी नाले माती व कचऱ्याने बुजले गेलेले आहेत; पण त्यांची सफाई अजून झालेली नाही. ग्रामीण भागात शेत शिवारातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न याच स्तंभात गेल्या आठवड्यात मांडला होता. त्यासाठी चक्क आमदारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसण्याची वेळ आलेली अकोलेकरांनी पाहिली.
विशेष म्हणजे, अकोला जिल्हा परिषदेच्या १५९ शाळांमधील सुमारे सव्वातीनशेपेक्षा अधिक वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे पुढे आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील २८५ शाळांमधील ६०८, तर वाशिम जिल्ह्यातील २२९ शाळांमधील ४२९ वर्गखोल्या शिकस्त आहेत. काही ठिकाणी या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर आहे, पण काम हाती घेतले गेलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात या धोकादायक खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवून शिकवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळ खेळण्यासारखेच ठरेल. सद्यस्थितीत काही खोल्यांमध्ये विद्यार्थी बसतही नाहीत, परंतु या खोल्या शाळेच्या आवारातच असल्याने वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसात काय आपत्ती कोसळेल, हे सांगता येऊ नये. संबंधित मुख्याध्यापक याबाबत तणावात आहेत, पण यंत्रणा मठ्ठ.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष असतो. जिल्ह्यात पूरग्रस्त होणारी गावे कोणती अगर कोणत्या गावांना पुराचा फटका बसतो, याची माहिती असते, यादृष्टीने या कक्षामधील जुळवाजुळव सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब; परंतु इतर कामांच्या बाबतीतली उदासीनता पाहता, संबंधितांची नियत साफ नसल्यामुळेच ही कामे रेंगाळल्याचे म्हणता यावे. कारण निधी मंजूर असूनही कामे केली जात नसतील, तर संबंधितांची कर्तव्यपूर्तीची नियत नसावी, असाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल. विशेष म्हणजे कोरोना काळात सुमारे दोन वर्षे शाळा बंद पडून होत्या, तेव्हा शिकस्त वर्गखोल्यांची कामे करून घेता आली असती, पण तेवढे शहाणपण दाखविले गेले नाही, हे दुर्दैव.
सारांशात, मान्सूनपूर्व पावसाने घेतलेला बळी लक्षात घेता, संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच संबंधित यंत्रणांनी गतिमान होणे गरजेचे आहे. वेळच्यावेळी संबंधित कामे केली गेली नाहीत, तर नियतीला दोष देण्याखेरीज आपल्या हाती काही उरणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.