जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया नेटवर्क समजल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केल्याचे वृत्त निश्चितच आशादायी मानायला हवे. विचारांची देवाण-घेवाण, घटना-घडामोडींचे अपडेट्स, यश-निवड-नियुक्ती, सुख-दु:खाच्या गोष्टी शेअर करण्यासोबतच जेथे शंका-समाधान होणे अपेक्षित होते, अशा फेसबुकला सध्या एखाद्या जनता गाडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चिमुकल्यांच्या वाढदिवसापासून लग्नाचा वाढदिवस ते वृद्धांच्या दशक्रिया विधीपर्यंतचा मजकूर, सहली, पार्ट्या आणि वेगवेगळ्या पोझेसमधील छायाचित्रे अपलोड करून हे नेटवर्क म्हणजे निव्वळ हौस भागविण्याचे साधन बनत चालल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यात भर म्हणून धार्मिक भावना भडकावणाऱ्या, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट याठिकाणी नोंदवून समाजमन दूषित करण्याचा प्रयत्नदेखील समाजकंटकांकडून होत होता. त्यात उणीव म्हणून की काय अश्लील छायाचित्रे आणि व्हिडीओ लोड करण्याचे लोणही आता पसरू लागले आहे. आंबटशौकिनांसाठी हे आवडीचे दालन ठरत असले तरी दिवसभरातून अनेकदा मोबाईल हाताळणारी हल्लीची चाणाक्ष पिढीसुद्धा नको ते पाहण्याच्या मोहात पडू लागली आहे. पॉर्न साईटवरील दृश्यांनीही बालकांसह युवावर्गाला आपल्या जाळ्यात ओढल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हाच सध्या तरी सुज्ञ पालकांसाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. या गोष्टींना चाप लावावा यासाठी लोकांच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्या लोकांपर्यंत पोहचण्याआधीच फेसबुकवरून डीलिट करण्यात येणार आहेत. काल-परवापर्यंत लोकांनी माहिती दिल्यावर आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवरून पुसला जायचा, आता फेसबुक व्यवस्थापनानेच सावधगिरी बाळगण्याची तयारी दर्शविली आहे. फेसबुकवर अपलोड होणारा मजकूर, छायाचित्रे व व्हिडीओ दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत की काय याची शहानिशा आता आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्राद्वारे केली जाणार आहे. असाच जर निर्धार फेसबुकने केला असेल तर तो खरा ठरो; पण केवळ दहशतवाद रोखण्यासोबतच लैंगिक भावना चाळवणाऱ्या पोस्टलादेखील आळा घालण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. फेसबुकचाच कित्ता गूगल, व्हॉट्सअॅप वा तत्सम सोशल मीडियानेही गिरवला तर समाजमन अधिक निरोगी राहण्यास निश्चितच हातभार लागू शकेल, यात शंका नाही.
हा निर्धार खरा ठरो ...
By admin | Published: June 21, 2017 1:14 AM