बारामती म्हणजे केवळ बारामती नाही तर अनेकांची मती गुंग करण्याचा गुणधर्म या मातीचा आहे. म्हणूनच विधानसभेत अजितदादा पवारांनी केवळ खुळखुळ्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची शक्कल लढवली नसती. हा खुळखुळा कधी काळी आपल्या पश्चात शस्त्र बनू शकतो, असा अंधूक अंदाज गोविंदभाई श्राॅफ यांना आला असता तर पार दिल्लीपर्यंत खस्ता खात शंकरराव चव्हाणांसारख्या जुन्या सहकाऱ्याचा विरोध सहन करत मराठवाड्यासाठी वैधानिक विकास मंडळ मंजूर करून आणले नसते. त्यांना काय माहीत हे विकास मंडळ म्हणजे वेताळाने विक्रमास दिलेला वर असेल की, जो पुढे जाऊन त्याच्यावरच उलटतो. तर, ३७१ (२) कलमान्वये मागास भागाच्या विकासासाठी मराठवाड्यासोबत विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली आणि पुढे राजकारणात जे होते तेच झाले. कालांतराने याचा राजकीय मंडळींनी खुळखुळाच करून टाकला आणि रिकामटेकड्यांची सोय लावण्याची ती हक्काची जागा बनली. गोविंदभाई गेले आणि नंतर काही वर्षांत विकास मंडळाचा खुळखुळाच झाला. त्याचा विसरही पडला.
परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला. सरकारने सुचवलेल्या राज्यपालांच्या अधिकारातील विधान परिषदेवरील १२ जणांची नियुक्ती राज्यपाल करत नाही तोपर्यंत या विकास मंडळावरील नियुक्त्या सरकार करणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. तू आम्हाला पेपरमिंटची गोळी देत नाही तर आम्ही तुला होमवर्कची वही देणार नाही. इयत्ता ५ वीत असताना आम्ही केलेली प्रतिज्ञा आठवली. त्यावेळी याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात, एवढे आम्ही जाणते नव्हतो.
ज्या आवेशाने दादांनी सभागृह गदागदा हादरवून टाकले त्यावेळी ‘मेरी झांशी नही दुंगी’ असे म्हणणाऱ्या चित्रपटातील कंगनाचा आवेश डोळ्यांसमोर तरळून गेेला. कंगना म्हणताच ऊर्मिला आठवली. या दोघींमधून विस्तव जात नाही. हे दादांना माहीत असावे म्हणून दादा १२ जागांच्या नियुक्त्यांचा आग्रह तर धरत नसावे, असेही क्षणभर वाटले; पण हा विचार झटकला तसा आम्हास मराठी बाणा आठवला.
वैधानिक विकास मंडळाचा खुळखुळा केल्याबद्दल आम्हा मराठवाड्यातील लोकांची अजिबात नाराजी नाही. ते मिळेल यातच आम्ही भरून पावलो होतो. काहीही मिळाले की, आम्हाला तृप्तीची ढेकर येते आणि डोळे आपोआप मिटले जातात, असेच आम्ही यशाच्या गुंगीत असताना विकास मंडळाचा खुळखुळा केव्हा झाला हेच आम्हाला समजले नाही. अगदी परवा परवा देवेंद्र भाऊंनी मराठवाड्यासाठी ‘वाॅटरग्रीड’ची घोषणा केली आणि बसल्या बसल्या डोळे मिटत पाण्यात डुंबायला लागले. कधी काळी नितीन गडकरींनी केलेली गोदावरीतून जलवाहतुकीची घोषणाही मिटत्या डोळ्यांवरून तरळून गेली; पण या डुलकीने घात केला आणि आमचे आयआयएम फडणवीसांनी नागपूरला पळवून नेले. आमचे रस्ते, आमच्या रेल्वेगाड्या, आमच्याकडे येणारे कारखाने पळवले जातात. तिकडे अहमदनगर, नाशिककर दिवसाढवळ्या आमचे पाणी पळवतात. यावर्षी तर कमालच झाली तुमच्याकडे पाऊस जास्त झाल्याने आम्ही पाणी सोडणार नाही, अशी घोषणाच नाशिककरांनी केली. पूर्वी म्हणे दरोडेखोर जाहीरपणे घरावर चिठ्ठी चिकटवून पूर्व सूचना देऊन दरोडा टाकायचे, तशी ही नाशिककरांनी काढलेली खोडी. आता हा विकास मंडळांचा खुळखुळा तरी आमच्या हाती होता, म्हटले याचा कोणास काय उपयोग हा तरी कोण पळवणार नाही; पण अजितदादांनी तोही पळवला. पाहू आता किती वाजवता ते?-सुधीर महाजन