महाडिक, प्रतापगडी अन् संजय पवार; या तिघांपैकी कोण दोघे निवडून येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 07:32 AM2022-06-03T07:32:57+5:302022-06-03T07:33:05+5:30

राज्यातल्या तीन सत्ताधारी पक्षांमध्ये अविश्वासाचं वातावरण आहे. एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यापेक्षा आपापले जिंकवा, असाच मूड दिसतो.

Dhananjay Mahadik, Imrhan Pratapgadi and Sanjay Pawar; Which two of these three will be elected? | महाडिक, प्रतापगडी अन् संजय पवार; या तिघांपैकी कोण दोघे निवडून येतील?

महाडिक, प्रतापगडी अन् संजय पवार; या तिघांपैकी कोण दोघे निवडून येतील?

googlenewsNext

- यदु जोशी

राज्यसभा निवडणुकीत पीयूष गोयल, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, डॉ. अनिल बोंडे नक्की निवडून येतील. धनंजय महाडिक, इम्रान प्रतापगडी आणि संजय पवार या तिघांपैकी कोणते दोघे निवडून येतील हा प्रश्न आहे. संजय पवार सोडले तर सगळेच नेते आहेत. नेते सीट काढतील आणि कार्यकर्त्यांना लंबे करतील अशी चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्याला उमेदवारी दिली खरी, पण तो  निवडून येईल का?  नेते आपापलं जमवून घेतात अन् कार्यकर्ते सतरंज्या उचलत राहतात.

चंद्रिका केनियांपासून उद्योगपती धूत यांच्यापर्यंत बाहेरच्यांचे लाड करणाऱ्या शिवसेनेनं कार्यकर्ता संजय पवार यांच्या गालावरून हात फिरवला आहे. राऊत पडले तरी चालतील, पण पवार जिंकलेच पाहिजेत, एवढा मनाचा मोठेपणा काही कोणी दाखवणार नाही. भाजपचे धनंजय महाडिक जिंकतील की शिवसेनेचे पवार? घोडेबाजार झाला तर महाडिकांच्या मागे त्यांचं स्वत:चं साम्राज्य आणि सर्वात श्रीमंत पक्ष आहे. भाजपसाठी पैसा अन् पाण्यात फारसा फरक नाही. संजय पवार त्या बाबतीत लंगडे आहेत. मातोश्री किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांकडून त्यांच्यासाठी काही ‘आऊटगोइंग’ झालं तर ते महाडिकांसमोर टिकतील.

अपक्ष आणि लहान पक्षांची मतं पवारांच्या पारड्यात टाकण्यासाठीचं ‘राजकीय व्यवस्थापन’ मंत्री एकनाथ शिंदे करू शकतात, पण तेवढा अधिकार त्यांना दिला जाईल का? यावर बरंच काही अवलंबून आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अपक्ष व लहान पक्षांच्या आमदारांशी असलेले वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध ही महाविकास आघाडीची डोकेदुखी आहे. अपक्ष आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीनं मतं द्यावीत, असं फडणवीसांनी म्हटलं अन् त्यानंतर काहीच तासांत शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेल्या एका अपक्ष आमदारानं, ‘आम्ही सद्सद्विवेकबुद्धीनंच मत देणार’ असा बाईट दिला. याचा अर्थ बरंच काही आतल्या आत ठरलंय असा होतो. संजय पवार हरले तर सत्तापक्षाचा आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उमेदवार हरला यामुळे अप्रतिष्ठा होईल.

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे, पण या निवडणुकीत तिघांमध्ये परस्पर अविश्वासाचं वातावरण दिसत आहे. एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यापेक्षा आपापले उमेदवार जिंकवा, असा मूड दिसतो.  राष्ट्रवादीत पहिल्या पसंतीची ४७ मतं प्रफुल्ल पटेलांना देऊन त्यांचा विजय एकदम नक्की करायचा, असा विचार चाललाय म्हणतात. काँग्रेसकडे दोनच मतं जास्त आहेत. एकदोन मतं अवैध ठरली तर? या विचारानं सर्व ४४ मतं इम्रान प्रतापगडींना टाका, शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारापेक्षा आपला एकमेव उमेदवार निवडून आणणं महत्त्वाचं आहे, असा काँग्रेसअंतर्गत आग्रह आहे. प्रतापगडी हे बाहेरचं पार्सल आहेत, त्यांना बाहेरच पाठवा,’ असं तर काही होणार नाही? 
संजय राऊत म्हणालेत, आयात उमेदवारामुळे काँग्रेसच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्य काँग्रेसनं चाणाक्षपणे पावलं उचलावीत... आता राऊतांचं म्हणणं ऐकून काँग्रेसनं स्वत:कडील अतिरिक्त मतंही आपल्याच उमेदवाराला दिली तर फटका शिवसेनेला बसेल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून आणूच, असा निर्धार अन् त्यासाठी आवश्यक असलेली रणनीती या दोन्हींचा अभाव दिसत आहे. उलट महाविकास आघाडीत परस्परांत अविश्वासाचं वातावरण कसं तयार होईल यासाठी भाजपनं रचलेल्या खेळीत ते अडकत चालले आहेत. भाजपनं राज्यसभेची तिसरी जागा जिंकली तर विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत मोठा उलटफेर नक्कीच होईल अन् भाजपला तेच हवं आहे.

राजकीय पक्षांच्या आमदारांना या निवडणुकीत पक्षाच्या व्हिपनुसार अन् तेही आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवूनच मत द्यावं लागतं, पण अपक्षांसाठी ही अट नाही आणि लहान लहान पक्ष त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. त्यांच्यावर जाळं टाकणं भाजपनं केव्हाच सुरू केलं आहे. निवडणुकीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी दोनचार आमदारांची तब्येत अचानक बिघडू शकते. दोनचार आमदारांनी त्यांचं मतदान अवैध ठरेल अशा पद्धतीनंच  करावं, असंही घाटत असल्याची चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निरोपानिरोपी सुरू झाली आहे.

एबी सेनेचा म्होरक्या मंत्रालयातील बरेच आयएएस अधिकारी ‘एबी’ सेनेचे सदस्य आहेत, असं एकदा याच ठिकाणी लिहिलं होतं. आता त्या एबी सेनेचा म्होरक्या सीबीआयच्या ताब्यात आहे. शान सिनेमात एक शाकाल दूर बेटावरून सगळी सूत्रं हलवत असतो. तो दुनियेसमोर येत नाही. हा तसाच एक शाकाल आहे जो मंत्रालय चालवत आलाय. सगळी प्यादी त्याचीच असतात. त्याचे काही बगलबच्चे ट्रायडंट वगैरे ठिकाणी बसून सगळे व्यवहार करत असतात.  सर्वपक्षीय नेते त्याचे लाभार्थी आहेत. बऱ्याच अधिकाऱ्यांना त्यानं मालामाल केलंय. गेल्या दहावीस वर्षांत मंत्रालयात ‘क्रीम पोस्टिंग’ करवून घेण्यात त्याचा रोल असायचा. आता तोच सीबीआयच्या कोठडीत आहे म्हटल्यावर अनेकांची ‘निंद हराम’ झाली असणार. राजकारणी, अधिकाऱ्यांची त्याच्या डायरीतली नावं समोर आली तर खळबळ माजेल... बात निकलेगी तो  दूर तलक जाएगी! 

Web Title: Dhananjay Mahadik, Imrhan Pratapgadi and Sanjay Pawar; Which two of these three will be elected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.