क्रिकेटचा मोसम सुरू झालेला आहे, ऑस्ट्रेलियात पहिला सामना झाला त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सुरेश रैनाचा वाढदिवस. रैनाने धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र तो मूळचा फायटर आणि आशावादी. कितीही रफ पॅच आला तरी त्यानं उमेद सोडली नाही की रडगाणी गायली नाहीत.
मुरादनगरचा हा मुलगा. पाच भावंडं. वडील फॅक्टरी कामगार.. तिथून सुरू झालेला त्याचा प्रवास. त्या संघर्षाविषयी तो बोलतो तेव्हा सिनेमाची गोष्ट सांगतोय असंच वाटतं. अलीकडेच निलेश मिश्रा यांनी घेतलेली त्याची मुलाखत फार गाजली. त्या मुलाखतीचा प्रकारच भन्नाट आहे. त्याला म्हणतात स्लो इंटरव्ह्यू, गप्पा मारल्यासारखे निवांत दोन दोस्त बोलतात. ना कॅमेऱ्याचे कट, ना ओढूनताणून आणलेलं उसनं अवसान. या मुलाखतीत रैना सांगतो, ‘एकदा धोनी म्हणाला, तू झोप जमिनीवर! तर मी म्हणालो, त्यात काय?- मला सवय आहे आणि होतीच, अजूनही मी हातानेच जेवतो. काट्याचमच्यानं जेवता येत नव्हतंच. मला अजून कळत नाही की भात कालवून खाल्ला नाही तर तो नीट शिजलाय की नाही हे कसं कळणार? अन्न हाताला लागलं तर पाहिजे..’ हे असं अनुभवणं आणि त्यासोबत स्वत:त बदल करणं हेच रैनाच्या यशाचं रहस्य असावं. आजवरच्या विविध मुलाखतीत त्यानं स्वत:ची प्रोसेस सांगितली आहे.तो म्हणतो, ‘कभी कभी लगता है की ये मुझसे नहीं होगा.. तो एक क्षण, तिथंच स्वत:ला बजावायचं, की मी हे सोडून पळणार नाही. करून पाहणार. खडतर वाटेवरचे प्रश्न आपल्याला घडवतात, नवीन संधी देतात.
आपण फक्त तिथं पाय रोवून उभं राहायचं. कधीकधी तर अशीही परिस्थिती येते की आपणच आपल्या क्षमतांवर शंका घ्यायला लागतो. असं ज्या ज्यावेळी वाटलं त्या त्या वेळी मी स्वत:ला बजावलं की, स्वत:च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायची हीच वेळ आहे. पड बाहेर. अर्थात पड बाहेर म्हणून पडता येत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जोवर आपण एखादी गोष्ट करून पाहत नाही तोवर ती अशक्यच वाटते. अनेकदा जीवतोड मेहनत करूनही फळ मिळत नाहीच; पण म्हणून ती मेहनत वाया नाही जात. त्यातून आपण जे शिकलो, जे बदलत गेलो, ते तर कायम आपल्यासोबत राहातंच, त्याचा नंतर कधीतरी फायदा होतो..’ रैना बोलतो क्रिकेटविषयी, पण ते जगण्यालाही लागू होतंच, नाही का?