शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
3
शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
4
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
5
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
8
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
9
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
10
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
11
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार
12
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
13
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
14
Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
17
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
18
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
20
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...

स्वरांसोबत जगू इच्छिणारी एक मुलखावेगळी स्त्री - 'अन्नपूर्णादेवी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 6:03 PM

पद्मभूषणसारख्या नागरी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये येऊ शकत नाही असे नम्रपणे राष्ट्रपतींना पत्र लिहून जगाच्या

- वन्दना अत्रे

भारतीय शास्त्रीय संगीताच्या खोल डोहात बुडी मारून असलेली श्वासापुरशीसुद्धा कधी बाहेर न डोकावलेली अनासक्त योगिनी!

लोकमतच्या 'दीपोत्सव' या दिवाळी अंकात अन्नपूर्णा देवींवर प्रकाशित झालेला विशेष लेख

............................

‘सोमवारी आणि गुरूवारी घराचा दरवाजा उघडला जाणार नाही. इतर दिवशी फक्त तीनदा दारावरची बेल वाजवावी. दार उघडले न गेल्यास तुमचे कार्ड आणि भेटीचे कारण देणारा कागद अशा दोन गोष्टी आत सरकवाव्यात, धन्यवाद.’

- अशी पाटी घरावर लावून सगळ्या जगाला आपल्या भेटीचे दरवाजे ठामपणे बंद करणारी, पद्मभूषणसारख्या नागरी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये येऊ शकत नाही असे नम्रपणे राष्ट्रपतींना पत्र लिहून जगाच्या दृष्टीने सर्वोच्च वगैरे पुरस्कारांबद्दल (सुद्धा) मन:पूर्वक अनासक्ती प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आणि जगभरात होणारे तऱ्हेतऱ्हेेचे संगीत महोत्सव, मैफिली, रेकॉर्डिंग, मुलाखती अशा सगळ्या न थकता चालणाऱ्या वर्दळीकडे पाठ फिरवून शांतपणे फक्त आपल्या सूरबहार नावाच्या वाद्याच्या स्वरांसोबत जगू इच्छिणारी ती एक मुलखावेगळी स्त्री.

का लिहायचेय तिच्याबद्दल?आणि तेही तºहेतºहेच्या आतषबाजीने, झगमगत्या रोषणाईने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणाºया दिवाळी सारख्या उत्सवी वातावरणात?मिळेल त्या पुस्तकातून, तुरळक मुलाखतींमधून, कुण्या स्नेह्यांनी लिहिलेल्या क्वचितशा लेखांंचा हात धरून अन्नपूर्णादेवी यांच्या आयुष्याच्या डोहात उतरण्याची धडपड करताना मनात सारखा हा प्रश्न येत होता.आजघडीला नव्वदीचे वय.सर्वसामान्यांसाठी जणू कधीच नसलेले मूक अस्तित्व.अगदी शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाºया रसिकांसाठी सुद्धा त्यांची ओळख साधारण तीनेक संदर्भांनी संपणारी :भारतरत्न पंडित रवीशंकर यांची पहिली पत्नी... नामवंत सरोदवादक अली अकबर खान यांची बहिण... किंवा फार तर फार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची गुरु !थकलेल्या, जगाच्या नजरेपासून सतत स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या, आजच्या भाषेत बोलायचे तर, काहीही हॅपनिंग नसलेल्या या जगण्याबद्दल का लिहायचे आत्ता?- आणि सांगायचे तरी काय?तर, लिहित्या पत्रकारांचा शब्द आणि चॅनेलवाल्यांचा कॅमेरा याला कधीही नकार न देणार्या सदा माध्यमाभिमुखी जगात या बाईंनी मात्र त्यांच्या भेटीस जाऊ इच्छिणार्या प्रत्येक पत्रकाराला सहजपणे नकाराचा एक फटकारा दिला.नम्रतेने. पण ठामपणे.आणि फोटोग्राफर नावाच्या कुणा इसमाला तर आपल्या घराच्या आसपास सुद्धा कधी फिरकू दिले नाही...नम्र आणि ठाम नकार.

- हे बाईंच्या आयुष्याचे जणू सारच!त्यांच्या या नकारांच्या किती कथा सांगीतल्या-ऐकल्या जातात.इलस्टेट्रेड वीकली नावाच्या एके काळच्या अत्यंत मातब्बर पाक्षिकाने 1980 साली भारतीय शास्त्रीय संगीतावर एक विशेषांक प्रसिध्द करायचा असे ठरवले. संगीत क्षेत्रातील त्या वेळचे सगळे नामवंत कलाकार, समीक्षक, अभ्यासक यांची यादी केली गेली. त्यात पहिल्या पाचात नाव होते ते अन्नपूर्णा देवी यांचे. संपादकांकडून अन्नपूर्णा देवी यांना पत्र गेले. सोबत प्रश्नावली आणि फोटोची विनंती.मुंबईतील ‘आकाश गंगा’ अपार्टमेंटच्या सहसा बंद असलेल्या घराच्या दरवाजातून पत्र आतपर्यंत तर पोचले पण प्रश्नावलीला उत्तर देण्यासाठी सुद्धा अगदी तत्परतेने आतून नम्र नकार आला. फोटो-बिटोचा तर सवालच नव्हता...!- हा नकार असा सहज स्वीकारण्याची वीकली ची अर्थातच तयारी नव्हती. मग त्या अंकासाठी काम करीत असलेले मोहन नाडकर्णी यांच्यासारखे जाणते अभ्यासू अन्नपूर्णा देवींच्या भेटीस गेले. पण नकाराची धार तेवढीच तीव्र. खूप आग्रह, मनधरणी यानंतर घडले ते एवढेच, ‘भारतीय शास्त्रीय संगीतातील बदलते प्रवाह’ या विषयावर बोलण्यास त्या राजी झाल्या.- पण त्यासाठी एकच अट होती.कोणती?- तर त्या जे बोलतील त्यातील एक शब्द सुद्धा छापून येणार नाही...!ओंजळीत असलेल्या टपोऱ्या मोगºयाच्या कळ्यांचा जीवघेणा घमघमता सुगंध लपवण्याचे हे विलक्षण आव्हान कसे पेलले असेल त्यांनी?असाच निग्रही नकार वाट्याला आला होता, इंदिरा गांधी यांच्या. त्यावेळी त्या पंतप्रधान होत्या, आणि कारभारावर मजबूत पकड असलेल्या एक अतिशय करारी नेत्या असा त्यांचा दरारा होता. त्यांच्या भेटीसाठी गेलेल्या यहुदी मेहुनीन नावाच्या जगप्रसिध्द व्हायोलीन वादकाला इंदिराजींनी विचारले,‘ तुमच्या या भारत भेटीत मी काय करू शकते तुमच्यासाठी?’तेव्हा हा कलाकार भारतात दोनच व्यक्तींच्या ओढीने आणि त्यांना भेटण्याची इच्छा मनात ठेवून आला होता. एक, योगगुरु बी के एस अय्यंगार आणि दुसºया, अन्नपूर्णादेवी.त्याने इंदिराजींना विनंतीवजा प्रश्न केला, अन्नपूर्णादेवी यांची एक मैफल आयोजित करू शकाल का?- मग वरिष्ठ स्तरावरून सूत्रे हलली. थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून विनंती गेली. त्या विनंतीलासुध्दा त्या बंद दाराआडून सुद्धा ठाम पण नम्र नकारच मिळाला.अन्नपूर्णा देवींनी इंदिराजींसाठी उलटा निरोप धाडला - बाबा (वडील आणि गुरु अल्लाउद्दिन खां) आणि शारदा मा यांच्या तसबिरीखेरीज अन्य कोणाच्याही समोर मी वादन करीत नाही. त्यामुळे खास मैफिलीचा प्रश्नच उद्भवत नाही!

-पंतप्रधानांच्या कार्यालयाकरवी पुन्हा थोडा आग्रह झाल्यावर काहीशा नाखुशीने घरी रात्री होणारा अन्नपूर्णा देवी यांचा रियाझ ऐकण्याची परवानगी यहुदी मेनुहीन यांना मिळाली, एका प्रमुख अटीसह.- रियाझाचे रेकॉर्डिंग करायचे नाही आणि फोटोग्राफ्र्र घराजवळ सुद्धा येणार नाही..!.येहुदी मेहुनीन यांना काही कारणाने ऐन वेळी मायदेशी परत जावे लागले पण त्यांच्या बरोबर आलेले बीटल्स कलाकार जॉर्ज हॅरीसन यांनी ही अट मान्य करीत अन्नपूर्णा देवींच्या दैनंदिन रियाझाला हजेरी लावली.- ही गोष्ट सत्तरच्या दशकातील.अन्नपूर्णादेवी यांच्या शिष्यांखेरीज ज्या बाहेरच्या व्यक्तीने त्यांचे वादन ऐकले त्यातील शेवटची व्यक्ती म्हणजे जॉर्ज हॅरीसन... याचा अर्थ त्यानंतर गेल्या जवळ-जवळ पन्नास वर्षात कोणीही त्यांचे वादन ऐकलेले नाही... ! आणि तरीही, अन्नपूर्णा देवी यांच्यावर लिहायचे आहे...हो, नक्कीच लिहायला हवे. यश, संपत्ती, देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील रसिकांची दाद, आपल्या वाद्याच्या माध्यमातून देशोदेशीच्या मातीतील कलेशी आणि ती जपणाऱ्या कलाकारांशी जोडले जाण्याचा आनंद हे सारेच कोणाही कलाकाराला सदैव खुणावणारे असते. हे सारे सुख दोन्ही मुठी ओसंडून मिळण्याची शक्यता असतांना अशा भरल्या ताटाला हातही न लावता निर्ममपणे नाही म्हणणारी जेव्हा एखादीच कुणी असते, तेव्हा अशा कलाकाराविषयी लिहायलाच हवे.भारतातील पहिली वाद्यवादक महिला अशी नोंद संगीताच्या इतिहासात होण्याचे दुर्मिळ भाग्य नाकारून फक्त शिष्य घडवण्याची कठोर साधना स्वेच्छेने स्वीकारणारा एखादा गुरु आढळतो तेव्हा त्या दुर्दम्य निष्ठेला सलाम करायलाच हवा.पंडित रविशंकर यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराशी झालेल्या विवाहानंतर ‘पती-पत्नीमध्ये श्रेष्ठ कलाकार कोण?’- असा वाद रिकामटेकड्या जगाच्या चव्हाट्यावर चवीने चघळला जाऊ लागल्याचे दिसताच जगासाठी आपल्या वाद्याला गवसणी घालून वानप्रस्थ स्वीकारणाºया , तो साधुत्वाने पाळणाºया या स्त्रीविषयी एक चकार शब्द न उच्चारून तिच्यावर अन्याय का करायचा?आणि, श्रेष्ठ कलाकार कोण या निरर्थक वादामुळे या लग्नाला पडलेल्या फासाने तिच्या संसाराचा, पती बरोबर असलेल्या नात्याचा आणि मुलाचा बळी घेऊनही त्याविषयी स्वीकारलेले मौन कधीच न सोडणाºया एका सुसंस्कृत, शहाण्या व्यक्तीविषयी सुद्धा आज लिहायलाच हवे.आपल्या फाटक्या नात्यांची लक्तरे भर चौकात धुण्याची आणि कमालीचे खासगीपणसुद्धा प्राईस टॅग लावून विकण्याची लाट आज समाजाला वेढून असतांना तशी आयती भरभक्कम संधी न साधणाºया या वेड्या स्त्रीचे वेडेपण आज नाही, तर कधी सांगायचे जगाला?

- म्हणून वाटले, संगीतातील जे चोख, अस्सल आणि आपल्या समृध्द परंपरेने दिलेले तेच प्राणपणाने जपत पुढच्या पिढीच्या हाती सोपवणाऱ्या या कलावतीच्या वतस्थ, अबोल आयुष्यावर दिवाळीच्या या झगमग उत्सवाच्या प्रकाशाचे थोडेसे कवडसे पडायलाच हवेत... दिवाळीच्या प्रकाशाची पूजा ज्या परंपरेने निर्माण केली त्याच परंपरेचा वारसा या स्वरांनासुद्धा आहे म्हणून...फक्त दुर्दैवाची बाब एवढीच की, ज्या व्यक्तीविषयी सांगायचे, लिहायचे, त्याआधी शोधायचे, जाणायचे, समजून घ्यायचे; तिच्यापर्यंत पोचण्याचे सगळे पूल, सगळे रस्ते त्या व्यक्तीनेच आपल्या हाताने तोडून टाकले आहेत...जन्माला येतांना एका मुठीत वाडवडिलार्जित गुणसूत्र आणि दुसºया मुठीत नशिबाचा नकाशा घेऊन येतो का आपण सगळे? आणि या नकाशात नसलेले एखादे अवचित वळण आयुष्यात समोर येते तेव्हा ते त्या नकाशातच असते की परिस्थिती नावाच्या चेटकिणीची लहर असते ती? नशिबाचे फासे आपल्या दोन्ही हाताच्या पोकळ ओंजळीत गदागदा हलवून दयामाया न दाखवता ही चेटकीण जेव्हा फेकते तेव्हा खूप काही उलथे-पालथे होत असते... अन्नपूर्णाच्या बाबतीत असेच काहीसे घडले.. संगीत नावाची अद्भुत गोष्ट तिच्या गुणसूत्रात होती पण या चेटकिणीने अकस्मात ती तिच्या आयुष्यात आणली.- आणि दुर्दैवाने, त्यासोबत एक शापही या संगीताला दिला. तो होता तिचे संगीत फक्त चार भिंतीपुरते राहण्याचा. जाणकारांपर्यंत, दर्दी रसिकांच्या कानापर्यंत न पोचण्याचा!!गळ्यातील स्वर आणि संगीताची दुर्मिळ, शहाणी समज पणाला लावणाºया या शापाचे निमित्तही तेवढेच जीवघेणे. चौदाव्या वर्षी ज्याच्याबरोबर जन्माची गाठ बांधली त्याच्याशी असलेले नाते मोडून-मुरगळून टाकणारे. जगणे एकाकी करणारे. एकीकडे, वडिलांकडून मिळालेले स्वरांचे लखलखीत वैभव कुलपात बंद ठेवण्याची घेतलेली शपथ आणि दुसरीकडे पती, मुलगा यांच्याशी तुटलेले नाते. आयुष्य सगळ्या बाजूंनी अशी घुसमट करीत असतांना त्यात ठाम उभे राहण्याचे बळ कुठून मिळाले असेल या स्त्रीला?- या प्रश्नाचे उत्तर फार अवघड आहे..

भारतीय शास्त्रीय संगीताला मैहर नावाच्या एका घराण्याची देणगी देणाऱ्या उस्ताद बाबा अल्लाउद्दिन खान यांची अन्नपूर्णा ही सगळ्यात धाकटी मुलगी. घरासाठी ती रोशन आरा होती पण मैहरचे महाराजा ब्रजनाथ सिंग यांनी चैत्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर जन्मलेल्या या मुलीचे नाव ठेवले अन्नपूर्णा...नशिबाचा नकाशा सांगतो की, अल्लाउद्दिन खान यांच्या सारख्या विलक्षण प्रतिभावान कलाकाराच्या घरात वहाणाºया संगीताच्या गंगेतील चार थेंबांवरसुद्धा रोशनआराचा हक्क नव्हता. त्याला कारण होते. रोशन आराची मोठी बहीण जहांआरा. निकाह होऊन ती सासरी गेल्यावर तिचा तानपुरा चुलीत भिरकावून देण्याच्या धमक्या तिला ऐकवल्या गेल्या. ते चटके इतके भयंकर होते, की तिच्या माहेरचे घरही त्यात होरपळत राहीले. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यात त्या मुलीच्या धक्कादायक अकाली मृत्यूचा चरचरीत चटका अल्लाउद्दिन खान यांच्या कुटुंबाला सोसावा लागला. हे सारे नशिबाचे भोग साहिलेल्या त्या घराने मग धाकट्या अन्नपूर्णाला अजिबात गाणेबिणे न शिकवण्याचा शहाणा निर्णय घेणे स्वाभाविकच होते. तिचीही त्याबद्दल काहीच तक्र ार नव्हती.- पण एक नक्की.

तऱ्हेतऱ्हेच्या वाद्यांचे नाद आणि त्यातून उमटणाऱ्या सुरांचे मृदू-करकरीत पोत हे ज्या घराचे श्वास-उच्छ्वास होते, छप्पर-भिंती होत्या त्या घराची माती पायाला लागलेल्या मुलीच्या कानावर गाण्याचे घट्ट संस्कार होत होते. सुरेल-बेसूर स्वरातील सूक्ष्म फरक त्या कानांना चांगलाच समजत होता. एक दिवस सरोदवर वाजत असलेली अशीच सपाट, बेसूर तान तिच्या कानावर पडली. तेव्हा दहा वर्षाची अन्नपूर्णा झटकन आपल्या भावासमोर जाऊन बसली आणि तीच तान कमालीच्या सफाईने गाऊन दाखवत आपल्या भावाला, अली अकबरला जाब विचारत म्हणाली, ‘ऐसे सिखाया है बाबाने...?’- दारात उभ्या असलेल्या बाबांच्या कानावर ती तान पडली.इतका नितळ स्वर आणि एवढी दाणेदार तान?कोण गातंय?- ते दारातून पुढे आले, आणि अली अकबर समोर बसलेली पाठमोरी अन्नपूर्णा बघून स्तब्ध झाले.एकीकडे रियाझाचा कंटाळा करणारा आणि संधी मिळताच त्यापासून सतत दूर पळू बघणारा मुलगा आणि दुसरीकडे फक्त कानाने टिपलेली तान चोखपणे गळ्यातून काढणारी दहा वर्षाची मुलगी...नेमका कोणावर अन्याय करतोय मी?- बाबांनी स्वत:लाच विचारले आणि काही क्षणातच पुढे होत अन्नपूर्णाची वेणी पकडून तिला ते आतल्या खोलीत घेऊन गेले.तिच्या हातात सतार ठेवत म्हणाले, ‘ मां, आजपासून मी तुम्हाला संगीत शिकवणार. मी तुम्हाला देवी सरस्वतीच्या हातात सोपवतोय. संगीतामुळे जहांआराच्या वाट्याला जे असह्य जिणे आले ते मी तुमच्या वाट्याला येऊ देणार नाही. आजपासून मी तुम्हाला देवाला अर्पण करतोय, तुम्ही आपल्या मर्जीने स्वतंत्रपणे जगाल. लक्षात ठेवा, तुमचे लग्न फक्त संगीताच्या स्वरांशी लागले आहे...’भेदरलेल्या दहा वर्षाच्या अन्नपूर्णाला बाबा आवेगाने सांगत होते... आणि ज्या गाण्याने मोठ्या मुलीचा बळी घेतला त्याच स्वरांशी दुसºया मुलीचे लग्न लावून देणाºया आपल्या शोहरकडे संतप्त मदिना बेगम हतबुद्ध होऊन बघत होत्या...आजारी असलेली आई झोपली आहे ही संधी दिसताच घराच्या कपाटात असलेल्या चार-पाच नोटा मुठीत घेऊन वयाच्या आठव्या वर्षी गाणे शिकण्याच्या ध्यासाने बाबा अल्लाउद्दिन खान घरातून पळून गेले होते. कलकत्त्यात भिकाºयांच्या रांगेत बसून मिळेल ते शिळेपाके अन्न चिवडत पोट जाळले होते. अशी तडफड करीत गुरूचा शोध घेणाºया बाबांनी जवळ-जवळ दोन दशके उपाशी वणवण करीत, जिव्हारी झोंबणारे अपमान मूकपणे सहन करीत गोळीबंद धृपद अंगाची गायकी आत्मसात केली होती. व्हायोलीन ते पियानो अशा तºहेतºहेच्या वाद्यांवर प्रभुत्व मिळवले होते.... स्वर आणि त्याच्या आधारे उभ्या राहणाऱ्या रागाचे सौंदर्य अतिशय तरलपणे तपशीलवार, टप्प्याटप्प्याने मांडू बघणºया बाबांच्या गाण्याला श्रोत्यांचा अनुनय साफ नामंजूर होता. या गाण्यासाठी तरूण वयातील हवीहवीशी चैन आणि सुख यावर बाबांनी स्वत:च्या हातांनी तुळशीपत्र ठेवले होते.किती निग्रह असावा या माणसाकडे?संगीताच्या वेडापायी वाट चुकलेल्या या पोराला वाटेवर आणण्यासाठी घरच्या मोठ्यांनी त्याच्या पायात लग्नाची बेडी अडकवली. नाईलाजाने ते निकाहाला उभे राहीले खरे, पण त्यांचे मन नव्हतेच त्यात. लग्नाच्या पहिल्या रात्रीच या जगावेगळ्या नवरदेवाने आपल्या बायकोच्या अंगावरचे दागिने, तिने काढून ठेवलेले दागिने आणि भेट म्हणून मिळालेली रोख रक्कम असा सगळा ऐवज गुंडाळून घेऊन पुन्हा आपल्या गुरूकडे पलायन केले...!या अशा वेडाने भरारून जाऊन बाबांनी अक्षरश: एखाद्या मधमाशीप्रमाणे जमा केलेला हा अस्सल गोडवा, तो समजून-उमजून ओंजळीत घेणाºया शिष्याचा बाबांना शोध होता. आणि त्यासाठी ते उदयशंकर यांच्याबरोबर सुरु असलेला युरोप दौरा अर्धवट सोडून घरी परतले होते.- पण हा त्यांचा ध्यास समजण्याचे अली अकबर यांचे वय नव्हते. रियाझात टंगळमंगळ करणारे अली अकबर (किंवा अनेकदा पुढे रविशंकर) यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या बाबांचा उग्र संताप हा याच नैराश्यापोटी होता.अन्नपूर्णाची ती तान ऐकता-ऐकता बाबांचाशोध संपला. अतिशय चोखंदळपणे, निरखून-पारखून जमा केलेले आयुष्यभराच्या स्वरांचे वैभव बाबा त्यानंतर पुढची चार वर्षे अन्नपूर्णाच्या पदरात ओतत राहीले.कारण एकच-संगीत शिकण्यासाठी लागणारा अथांग संयम, आणि कोणत्याही भौतिक वखवखीपासून दूर असलेले स्वस्थ, शांत मन आपल्या या मुलीत आहे हे त्यांना दिसत होते!अन्नपूर्णाच्या हाती आधी सतार आणि त्यानंतर सूरबहार नावाचे अनवट, फक्त चोखंदळ रसिकांनाच भावेल असे वाद्य बाबांनी ठेवले ते याच विश्वासापोटी.‘तुम्ही वाजवलेल्या प्रत्येक सुराला तुमच्या आत्म्याचा स्पर्श हवा’ असे वारंवार सांगणाºया बाबानी मोठ्या विश्वासाने ओंजळीत दिलेल्या या लखलखीत स्वरांचा सांभाळ हेच मग अन्नपूर्णा यांचे जगण्याचे उद्दिष्ट्य होत गेले...

आणि तेच रविशंकर यांच्याबरोबरच्या मतभेदाचे कारण सुद्धा...!

उदयशंकर यांनी आपल्या भावासाठी बाबांकडे अन्नपूर्णाचा हात मागितला तेव्हा या आंतरधर्मीय विवाहाबद्दल बाबांच्या मनात खूप प्रश्न होते. बाबा जरी धर्माचे अवडंबर करणारे नसले तरी त्यांचे कुटुंब पारंपरिक मुस्लीम धर्म मानणारे होते.शिवाय, ‘नाचनेवाले लोग है, संभालके रहना...’ असा इशारा मैहरचे नबाब त्यांना वारंवार देत होते. पण तरी हे लग्न झाले...‘मी ज्या घरात राहतोय तिथे मोठी-मोठी भूते राहतात, डोके नसलेली.. ’ असे सांगून कोवळ्या अन्नपूर्णाचा थरकाप उडवून देणाऱ्या रवीला तिचे काजळ घातलेले मोठ्ठे डोळे आणि त्यातील निरागसपणा फार आवडत होता.आणि अन्नपूर्णा?मैहर नावाचे छोटे गाव, नितांत आदरणीय बाबा आणि सुचित्रा नावाची एकमेव मैत्रीण या पलीकडे काही जग असते हेच ठाऊक नसलेल्या या मुलीसाठी हा सात समुद्रापार असलेले जग सुद्धा फिरून आलेला रवी जणू स्वप्नातील राजकुमार होता.हिमालयाच्या कुशीत असलेल्या अल्मोरा गावात हा देखणा विवाह सोहळा पार पडला. आणि त्यानंतर अवघ्या दोन अडीच वर्षातच गोष्टी बिनसत गेल्या.कारणे?खूप...!घटनांचे अर्थ लावत-लावत लोकांनी खणून काढलेली..!असे म्हणतात, की रविशंकर आणि अन्नपूर्णा या दोघांनी एकत्र कार्यक्र म सुरु केल्यावर त्या जुगलबंदीत रसिकांचे लक्ष असायचे ते अन्नपूर्णा काय मांडतात याच्याकडे. रागाच्या भल्या मोठ्या अवकाशात त्यांच्या वाद्यातून उमटणारी स्वरांची रेखीव नक्षी रसिकांना गुंगवून टाकणारी असायची. रविशंकर यांची तबल्याबरोबर होणारी फडफडती जुगलबंदी आणि अन्नपूर्णा यांचे अभिजात वादन याची सततची तुलना म्हणे रविशंकर यांना झोंबायची.असेही म्हणतात, की सहवासातील स्त्रियांबद्दल रविशंकर यांना वाटणारे प्रेम (!) ‘मोठ्या मनाने समजून घेण्यास’ त्यांची पत्नी अन्नपूर्णा तयार नव्हती.‘ मी कमला लक्ष्मीच्या प्रेमात पडलोय’अशी प्रामाणिक कबुली रविशंकर यांनी अन्नपूर्णा यांच्यापुढे दिली तेव्हा ‘ मग माझ्याशी लग्न का केलेत? बाबांकडून चांगली तालीम मिळावी म्हणून?’ असा टोकदार प्रश्न त्यांनी आपल्या पतीला थेट विचारला.जन्मत:च काही शारीरिक समस्या बरोबर घेऊन जन्माला आलेला मुलगा शुभो आणि त्याच वेळी तापाने फणफणलेले, त्यामुळे रियाझाची वाटच विसरलेले,स्वरांचे भान गमावलेले रविशंकर या दोघांची सेवा करायची वेळ आली तेव्हा ती तर अन्नपूर्णाने केलीच पण मग एखाद्या गुरूप्रमाणे रविशंकर यांचे बोट धरून त्यांना रियाझाच्या वाटेवर पुन्हा आणले...- आणि हा माणूस मात्र खुशाल ‘मी कमलाच्या प्रेमात पडलोय’ असे आता सांगत होता!

असेही म्हणतात, की, बाबा अल्लाउद्दिन यांचा नातू, आणि अन्नपूर्णा- रविशंकर यांचा मुलगा असा वारसा सर्वार्थाने घेऊन जन्मलेल्या शुभोला तालीम द्यायची कोणी यावरून आई आणि वडील यांच्यात झालेल्या वादामुळे हा संसार मोडला.त्यावेळी, कलाकार म्हणून रविशंकर यांनी जगभरात मिळवलेला झगमग लौकिक आणि आई, अन्नपूर्णा यांची तालमीची अतिशय कठोर शिस्त या कुतरओढीत शुभो कोणताच एक किनारा धरू शकला नाही. त्याच्या आयुष्याचे गणित जे विस्कटले ते त्याच्या अकाली दुर्दैवी मृत्युपर्यंत सावरलेच नाही!- अशी कितीतरी कारणे. रंगवून, तिखट-मीठ लावून चघळली गेलेली... किती खरी-खोटी ठाऊक नाही, पण ठिणगीचा वणवा झाला हे नक्की आणि त्यात या नात्यांचे तारू खडकावर आपटून फुटले. त्यात बळी मात्र गेला तो फक्त अन्नपूर्णा नावाच्या कलाकाराचा....किंबहुना असे बळीच्या वेदीवर चढणे त्यांनी पुढे होऊन स्वीकारले.हा स्वीकार करता-करता मैहर नावाच्या छोट्या गावात वाढलेली ती तरु ण स्त्री आरपार बदलत गेली...ही बदललेली स्त्री म्हणजे, स्वत:च्या निर्णयावर ठाम राहणाºया , आयुष्यात येणाºया कोणत्याही वादळाला दगडी थंडपणे तोंड देणाºया आणि स्वत:ला जगापासून दूर, एकाकीपणाकडे ढकलणाºया आजच्या अन्नपूर्णादेवी.रविशंकर आणि अन्नपूर्णा यांच्या सहजीवनात तीन वेगवेगळे टप्पे दिसतात.पहिला अर्थात रविशंकर यांच्या मैहरमधील बाबांकडील मुक्कामाचा आणि मग त्या दोघांच्या स्वप्नवत लग्नाचा, शुभेन्द्रच्या जन्माचा आणि आकाराला येणाºया निर्मळ सहजीवनाचा.भाऊ उदयशंकर यांच्याबरोबर होणारे युरोपचे दौरे सोडून, विलासी जीवनाचा त्याग करीत, डोक्याचे पूर्ण मुंडण करून आणि अंगावर साधी खादी चढवून तरूण रवी फक्त सतारीच्या ओढीने मैहरला बाबांकडे शिक्षण घेण्यासाठी आला... आणि अतिशय साध्या, निरागस अन्नपूर्णाबरोबर भावाने ठरवलेल्या विवाहाला नकार नाही देऊ शकला. पण अगदी कोवळ्या वयात अनुभवलेले पॅरिसचे रंगतदार, झुळझुळीत जग आणि बाबा-अन्नपूर्णा यांच्या निमित्ताने दिसलेले फक्त संगीताला वाहिलेले साधे, ध्यासाचे जग यात लवकरच संघर्ष सुरु झाला आणि त्याचे धक्के या संसाराला बसू लागले. मुंबईच्या मुक्कामात लक्ष्मी शंकर आणि त्यांची बहिण कमला यांचा मिळालेला सहवास आणि त्यातून रविशंकर यांच्या कमलावरील जुन्या प्रेमाला नव्याने फुटलेला अंकुर हा अन्नपूर्णासाठी पहिला धक्का होता. इतका अनपेक्षित आणि म्हणून इतका तीव्र की गुमसुम झालेल्या अन्नपूर्णा बाबांच्या आश्रयाला मैहरला निघून गेल्या.एकावेळी एकापेक्षा अधिक स्त्रियांवर प्रेम करणे ही गोष्ट शक्य आहे, हे लोक का स्वीकारत नाहीत?- या रविशंकर यांच्या प्रश्नाने दोघांच्या सहजीवनातील आव्हाने वाढतच गेली. मुंबई, लखनौ, दिल्ली, मैहर आणि कलकत्ता या सगळ्या ठिकाणच्या सहजीवनात दिसतात ते संसार सावरण्यासाठी केलेले विफल प्रयत्न. एकीकडे रविशंकर यांची कलाकार म्हणून वाढत चाललेली लोकप्रियता आणि अतिशय शांतपणे सामाजिक आयुष्यातून अन्नपूर्णा यांनी घेतलेली माघार.

जेमतेम पाच-सहा मैफली या दोघांनी एकत्र केल्या असतील पण ‘एकत्र कार्यक्र मात जमवून घेणे जरा अडचणीचे होत चालले आहे’ असे रविशंकर यांनी अन्नपूर्णा देवींना अगदी एकाएकी सुचवले.‘ही ‘नेमकी अडचण’ काय?’- असा प्रश्न अन्नपूर्णा देवींनी विचारला.त्या प्रश्नाचे रविशंकर यांनी दिलेले उत्तर पार घसरत घसरत भलतीकडेच गेले. ‘तू काळाबरोबर बदलत नाहीस’ असा त्यांचा मुख्य आरोप होता. त्यामागोमाग तिच्या जुनाट पद्धतीच्या साड्या-दागिने यावर ताशेरे मारले गेले आणि मग अन्नपूर्णा देवींच्या साड्यांइतक्याच जुन्या पद्धतीच्या त्यांच्या ‘कालबाह्य’ संगीतावर संभाषण घसरले...तो क्षण अन्नपूर्णा यांच्यासाठी अंतिम निर्णयाचा होता. कारण या नात्यात आता त्यांना त्यांच्या संगीताशी तडजोड करावी लागणार होती. त्या संगीताला ‘आधुनिक’वगैरे काळाशी जमवून घ्यावे लागणार होते.... पण हे आधुनिकतेशी जमवून घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? तबल्याशी जुगाड करीत तानांची भेंडोळी फेकायची? की वेगवेगळ्या वाद्यांबरोबर जमवून घेत फ्युजन नावाचे रसायन उकळायचे?- शास्त्राचा काटा तोलत स्वरांचा आणि त्याच्या निमित्ताने संगीतातील अव्यक्त सौंदर्याचा शोध घेऊ बघणाऱ्या, तो ध्यास असलेल्या बाबांना आणि त्यांच्या शिष्येला ही तडजोड मान्य नव्हती.कधीच मान्य नव्हती.तेव्हापासून अन्नपूर्णा यांचे दुहेरी जगणे सुरु झाले. एकीकडे, बाबा, कुटुंब आणि शुभोसाठी सुखी संसाराचे नाटक पण दुसरीकडे अत्यंत एकाकी, दु:खी होत जाणारे मन. अबोलपणाच्या गर्तेत खोल निघालेल्या अन्नपूर्णाला एपिलेप्टिक फिट्स येऊ लागल्या... पण या वेदनाच तिला सशक्त होण्याचे बळ देत होत्या. या नित्शेच्या म्हणण्याप्रमाणे..!एकाकीपणाच्या त्या काळात स्वत:ला अधिकाधिक शहाणे करण्यासाठी तिने वाचण्यासाठी निवड केली ती टागोरांच्या गीतांजलीची आणि मानसशास्त्रावरील काही पुस्तकांची.

- इथून पुढे सुरु होतो अन्नपूर्णा देवी यांच्या आयुष्यातील तिसरा टप्पा. एकटीने, गुरु म्हणून जगण्याचा. यासाठी तिला जसे बाबांनी शिकवलेल्या गाण्याने आत्मबळ दिले तसे या पुस्तकांनी शहाणे केले.आधुनिक नावाच्या जगाशी आणि बदलत्या काळाशी जमवून घेणारे असे काही संगीत असते असे म्हणणारे अनेक कलाकार तोपर्यंत रंगमंचावर दिसू लागले होते. या कलाकारांच्या संघर्षाने त्यांना शिकवले, अभिजाततेशी तडजोड का करायची नाही ते..!गाणे शिकवतांना बाबा आपल्या शिष्यांना नेहेमी म्हणत, माझे संगीत हे लोकांच्या मनोरंजनासाठी निर्माण केलेले एखादे उत्पादन नाही, स्वत:चे समाधान, माणूस म्हणून उन्नयन होण्यासाठी असलेले ते दैवी साधन आहे.रविशंकर यांच्याबरोबर केलेले जाहीर मैफलीतील वादन हे सांसारिक जीवनात सतत संघर्ष निर्माण करत असतांना, तो संघर्ष चव्हाट्यावर येत असतांना बाबांच्या या एका तत्वाने अन्नपूर्णा देवींना जाहीर मैफलींकडे पाठ फिरवण्याची आंतरिक ताकद दिली असावी.अर्थात, अन्नपूर्णा आणि रविशंकर यांच्या नात्याचा तुकडा असा एका घावात पडला नाही. अन्नपूर्णा किंवा रविशंकर यांच्या आयुष्यातील कोणती ना कोणती गरज त्यांना पुन्हा-पुन्हा या नात्याकडे घेऊन येत होती. पण त्यात सहजीवनात असायला हवा तो ठेहेराव नाही याची जाणीव कदाचित त्या दोघांना मनोमन होत होती.आपल्या पहिल्या मुलीचा, जहाँआराचा, संगीताने अकाली बळी घेतला याचे झणझणते दु:ख उरात घेऊन जगणाºया बाबांना आणि मदिना बेगम यांना अन्नपूर्णा यांच्या वैवाहिक आयुष्याला हेलकावे देणारी वादळे जाणवत होती. पण त्या वादळांची धग त्या दोघांना होता होईतो पोचू नये यासाठी अन्नपूर्णा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. तर रविशंकर यांना कात्रीत पकडणारी परिस्थिती अधिकच अवघड होती.

जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी आॅफ इंडिया या पुस्तकावर अतिशय भव्य असा दृक-श्राव्य कार्यक्र म करण्याच्या रविशंकर यांच्या खर्र्चिक प्रयोगाने खाल्लेली आपटी आणि त्यामुळे चर्चेत आलेले अपयश रविशंकर यांना अगदी जिव्हारी झोंबले होतेच पण या अपयशाने त्यांना कर्जाच्या एका अक्र ाळ-विक्र ाळ अशा खाईत लोटले होते.... त्यातून बाहेर पडण्यासाठी या दाम्पत्याची जाहीर जुगलबंदी हा हमखास चालणारा इलाज होता. पण, अर्थातच जेव्हा हा इलाज केला गेला तेव्हा त्याच्या परिणामांना त्यांना पुन्हा सामोरे जावे लागलेच.दोघांच्या वादनाची तुलना आणि त्यात अन्नपूर्णा यांना वारंवार मिळणारी पसंतीची पावती...!

!1944-47 हा काळ रविशंकर यांच्यासाठी अतिशय खडतर आणि परीक्षेचा होता. एकीकडे कलाकार म्हणून नक्की काय हवे आहे याबाबत कमालीचा गोंधळ मनात होता. बाबांनी हातावर ठेवलेले चोख अभिजात संगीत की बदलत्या काळाच्या अपेक्षांची भूक भागवणारे संगीत? ही ओढाताण फार-फार जीवघेणी होती. पण ही पुरेशी नाही म्हणून की काय, फारसे कार्यक्र म मिळत नसल्याने बसत असलेला आर्थिक चिमटा सारखा वेदना देत होता आणि या अंधाऱ्या कोंडीतून वाट काढण्यासाठी जिव्हाळ्याचा असा कोणताच हात हातात नव्हता.दुखावलेल्या अन्नपूर्णा शुभोसह मैहरला निघून गेल्या होत्या. आणि ज्या कमलामुळे अन्नपूर्णा दुखावल्या होत्या त्या कमलाला रविशंकर यांच्या कुटुंबातून या संबंधाना असलेली विरोधाची धार घायाळ करीत होती... अन्नपूर्णा यांच्याबरोबरचा संसार सावरावा असे कोणतेही आश्वासन परिस्थिती देत नसल्याने हा संसार अधिक अधिक उसवतच गेला...ही कोंडी अन्नपूर्णा यांना जाणवली असती आणि पत्नीच्या मायेने त्यांनी ती समजून घेतली असती तर हे नाते पुन्हा उभे राहिले असते का? कदाचित...

‘अभिमान ’ या चित्रपटाचे बीज हृषीकेश मुखर्जी यांच्या हाती लागले, ते पंदित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्या सहजीवनातल्या वादळातून! हा चित्रपट काढण्यापूर्वी ते अन्नपूर्णा देवी यांना भेटले होते असे म्हटले जाते. अन्नपूर्णा-रविशंकर यांचा तुटत-तुटत गेलेला संसार आणि त्याबरोबर संगीताच्या जगातून एकेक पाऊल मागे जात स्वत:ला घट्ट बंद केलेल्या दाराआड कोंडून घेणार्या अन्नपूर्णा यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकार या कहाणीचा पडद्यावर भले सुखांत झाला असेल, पण आयुष्य अशी सिनेमासारखी सोपी उत्तरे देत नाही ना...! माणसांचे अहंकार, भूतकाळ कधीच मागे न टाकण्याचा हट्टीपणा, माणसाचे दुबळेपण समजून न घेणारे खुजेपण अशा कितीतरी गोष्टी त्या सुखाच्या वाटेत आडव्या येतात. आणि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होत नाही.

...या कहाणीत असेच काही घडत गेले. आणि ते तसे घडत जावे यासाठी प्रत्येक घटकाने आपला-आपला पुरेसा वाटा उचलला. बाबांची विद्या आपल्या मुलाला देण्याची अन्नपूर्णा देवी यांची इच्छा या परिस्थिती नावाच्या चकव्याने हातातून हिरावून घेतली तेव्हा कदाचित गुरु म्हणून सुद्धा संगीताकडे पाठ फिरवणे हा पर्याय अन्नपूर्णा यांनी स्वीकारला असता. पण तोपर्यंत माणूस म्हणून एक प्रौढ अशी शहाणीव त्यांच्यात उमलून आली होती, आणि म्हणून जे प्रेम, वात्सल्य, काळजी शुभोच्या वाट्याला आली असती ती त्यांच्या शिष्यांच्या वाट्याला आली. हरीजींसारखा एखादा शिष्य शिकण्यासाठी रात्री बेरात्री जरी आला तरी आधी मांच्या हातचे चवदार, गरम जेवण आणि मग रियाझ असा मांच्या घराचा रिवाज होता.अन्नपूर्णा देवी यांच्या संगीताविषयी आणि सांगीतिक प्रतिभेविषयी बोलतांना पद्मभूषण अमीरखान यांनी एकदा म्हटले होते, ‘ बाबांच्या गायकीतील 80 टक्के अन्नपूर्णादेवी यांच्यात, 70 टक्के अली अकबर खान यांच्यात तर 40 टक्के रविशंकर यांच्यात आली आहे’बाबांच्या गायकीतील अन्नपूर्णादेवी यांच्याकडे आलेली ही 80 टक्के गायकी ऐकण्याची संधी दुर्दैवाने फारच भाग्यवान, मुठभर रसिकांना मिळाली.रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीने एका कवितेत म्हटले आहे, ...एक कलाकार म्हणून अन्नपूर्णा देवी यांचे जगणे शोधत जाताना हे सत्य वारंवार जाणवत राहते...मग उरते काय?...थेट त्या व्यक्तीला भेटण्याचे सुख हाती येत नाही तेव्हा उरते ते त्याच्या प्रतिमेवर समाधान मानणे...पंडित निखील बॅनर्जी, हरिप्रसाद चौरसिया, नित्यानंद हळदीपूर, वसंत काबरा अशा शिष्यांना ऐकताना म्हणुनच आठवण येत राहते ती त्या 80 टक्के कडे गाण्याची आणि रसिक म्हणून समाधान करून घ्यावे लागते...दक्षिण मुंबईतल्या आकाशगंगा इमारतीतल्या त्या एकाकी घराची, तिथल्या दिवस-रात्रींची वर्णने अन्नपूर्णादेवींच्या शिष्यांनी, त्यांच्या मोजक्या स्नेह्यांनी, त्यांच्या घराचा दरवाजा थोडासा सरकवून जरासे आत डोकावण्याची संधी मिळालेल्या पत्रकारांनी लिहून ठेवली आहेत!... ती वाचताना दिवसभर कामात गर्क असलेल्या अन्नपूर्णादेवी नजरेसमोर उभ्या राहातात.सकाळी दाराला लावलेली दुधाची पिशवी आत घेण्यापासून दिवसभराचा स्वयंपाक, केरवारे, भांडीकुंडी हे सारे स्वत: आवरणार्या आणि एका बसक्या मोड्यावर बसून शिष्यांना शिकवणार्या अन्नपूर्णादेवींची मूक प्रतिमा या सार्या आठवणींमध्ये भरून राहीलेली आहे.स्वत:चा रियाझ...?- तो रात्री!!!आणि हो!!!कबुतरे!!!अन्नपूर्णादेवींच्या गच्चीत येणारी कबुतरे या सार्या आठवणींभर उडत असलेली दिसतात. या कबूतरांना दाणे घालणे, हा त्यांच्या दिवसभरातला मोठा विरंगुळा असतो. गच्चीत येणाºया प्रत्येक कबुतराला त्या ओळखतात , त्याच्याशी बोलतात ...‘कबुतरे उडतात तेव्हा आकाशात उडणाºया त्यांच्या पंखाना पण एक लय असते, ती कधी ऐकली आहेस का? निसर्गातील प्रत्येक गोष्टीत देवाने संगीत निर्माण केले आहे. फक्त ते आपल्याला दिसत नाही, ऐकू येत नाही...’ असे लहानग्या अन्नपूर्णाचे बाबा तिला एकदा म्हणाले होते.....दाणे टिपून उडून जाणाऱ्या कबुतरांना बघतांना रोज तिला तिच्या बाबांची आठवण येत असेल...?

टॅग्स :Annapurna Deviअन्नपूर्णा देवीmusicसंगीतPresidentराष्ट्राध्यक्ष