सारासार विवेकबुद्धी असा एक शब्द मी मागचा लेख संपवताना वापरला होता. मोबाइल नि इंटरनेटच्या आपल्या वापराबद्दल आपल्याला तीच बुद्धी वापरून बघायची आहे. शब्द जरा जड आहे खरा, पण म्हणजे कृती पण तशीच कठीण असं नाही... करायचं असं की आपल्याला फोन नेमका कशासाठी लागतो त्याचा विचार प्रत्येकानं करायचा. आत्ता आपण मोठ्या माणसांविषयी बोलतोय. त्यामुळं ‘मुक्तांगण’मध्ये येणाऱ्या पालकांविषयी मी सांगणार आहे.
बरेचदा मला येणारे फोन हे पालकांचे असतात. आपल्या मुलांबाबतीत त्यांची अस्वस्थता ते शेअर करत असतात. साहजिक आहे, तुम्ही जर पालक असाल तर तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक काळजी असते की माझी मुलं मोबाइल, इंटरनेट खूप जास्त वापरताहेत. मलाही माझ्या मुलांबाबतीत काळजी वाटते. पण आपल्या मुलांना आपल्याला समजावून सांगायचं असेल तर स्वत:पासून सुरूवात करावी लागेल.
लहान मुलांच्या मोबाईल वापराबाबतीत चौकशा वाढायला लागल्यात हे दिसतंय, पण होतं काय की मुलांना सांगणारे पालक सतत त्यांच्या भवती असतात. पालकांना, मोठ्या माणसांना सांगणारं कुणी नसतंच बहुदा. त्यामुळं मुलांमध्ये बदल हवा असेल तर पहिली पायरी आपण चढायला हवी. आपल्या मोबाईल वापरण्यावर जरा बंधनं घालायला हवीत.
जो नियम पाळतो त्याचंच ऐकलं जाईल, ही अगदी साधी गोष्ट नाही का? आम्ही लहान मुलामुलींचं समुपदेशन करत असतो तेव्हा नव्वद टक्के उदाहरणांमध्ये मुलं आम्हाला सांगतात, आधी आमच्या आई, बाबा किंवा आजी, आजोबांना सांगा. तुम्ही त्यांना का नाही बोलत? आम्हाला का समजावता?
मुलं काही सांगण्यासाठी उत्सुक असतात, पण बिचाऱ्या आईबाबांकडं स्टॅमिनाच नसतो त्यावेळी ऐकायचा. मग ते आपला फोन मुलांच्या हातात देतात नि म्हणतात, “बघत बस. खेळ, पण शांत राहा जरा.” - अशा कशातूनही ‘स्क्रिन टाइम’ वाढत जातो. पहिली पायरी म्हणून आम्ही काय सुचवतो अशावेळी? अख्ख्या घरानं एकत्र यावं आणि ‘स्क्रिन’ वापराबाबतीत काही नियम बनवावेत. किती वेळ, कशासाठी, कुणी वापरायचा फोन? कुठल्या वेळी कुणीच नाही वापरायचा वगैरे. एकदा ही सुरूवात केली की हळूहळू रिझल्ट दिसायला लागतात. करून बघा हा प्रयोग !
- डॉ मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे.