इंडस्ट्री ४.०, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स व डेटा अनॅलिटीक्स हे उद्याच्या तंत्रजीवन पद्धतीचे अविभाज्य घटक असतील. ह्या क्षेत्रातील सतत बदलणारे तंत्रज्ञान आपल्या जगण्याच्या कल्पनाच बदलेल. बदलांचा हा वेग येत्या पाच-दहा वर्षांत अधिकच वाढणार आहे. तो अधिक सर्वव्यापी तर होईलच पण ज्या पैलूंमध्ये बदल दिसण्याची आपण कल्पनाही केली नव्हती, अशा ठिकाणीही तो आढळेल. आपले वैयक्तिक जीवन, व्यवसाय, व्यवहार, सामाजिक संपर्क ह्या सर्व बाबी आमूलाग्र बदलणार आहेत. अगदी सरकार दरबारी ह्याची नोंद होऊन अनेक विभाग कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायच्या योजना आखत आहेत.‘फॉरेस्टर’ ह्या प्रथितयश तंत्रवेत्त्या उद्योगाने सर्वेक्षणानंतर असे भविष्य वर्तविले आहे की, २०२५ नंतर बुद्धिमान संगणक व रोबोटिक्समुळे किमान ६ टक्के रोजगार नष्ट होणार आहेत. अमेरिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना आणि नव्यानेच वकिली करू लागलेल्यांनाही दिवस बरे नाहीत. कारण ‘आयबीएम’ने सादर केलेले ‘वॅटसन’ हे सॉफ्टवेअर कायदेविषयक शंका आणि प्रश्नांना ९० टक्के अचूकतेने उत्तर देऊ शकते, तेही तत्काळ! कोणत्याही वकिलाला ह्या कामासाठी ह्यापेक्षा जास्त वेळ लागतोच, शिवाय त्यांच्या उत्तराची अचूकता ७० टक्केच असते हे लक्षात घेता कालांतराने विशेषज्ञ वगळता इतर सामान्य वकिलांना कामच मिळणार नाही. वॅटसनसारखीच सॉफ्टवेअर वैद्यकीय क्षेत्रातही वापरली जात आहेत. रोगनिदानाची त्यांची क्षमता व अचूकता माणसांच्या तुलनेत चौपट आहे, असे दिसले आहे. आत्तापर्यंत शास्त्रीय व तांत्रिक बाबींमध्ये ह्या तंत्राचा वापर झाला होता. कलाक्षेत्र ह्यापासून दूर कसे राहील? कलाकार मूळ कलाकृतीचा निर्माता. त्यामध्ये संगीत, शिल्प, चित्रे, रेखाचित्रे, मातीची भांडी, प्रदर्शन, छायाचित्रे, व्हिडीओ किंवा इतर कोणतेही माध्यम समाविष्ट असू शकते. डिजिटल आर्ट पॅकेजमधील एआय आणि मशीन लर्निंग (एमएल) घटक अधिक जटील होत असल्याने कलाकारांना सर्जनशील आणि अनपेक्षित पद्धतीने प्रयोग करण्यासाठी नवीन साधने उपलब्ध होतात. एआय आधारित सोल्युशन्सचा वापर अशा गोष्टी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याची कल्पना कलाकाराने यापूर्वी कधीही केली नसेल. एखाद्या कलाकाराचे काम जर संगणकाला पृथ:करण करायला दिले तर त्यामधून नमुना वा कल तयार करता येऊ शकतो. संगीतकाराच्या पूर्वीच्या कामावर आधारित संगीताची धून तयार करणे शक्य आहे. ह्या तंत्रामुळे प्रसिद्ध कलाकाराच्या आवाजात आपण संयोजित केलेले गाणे संगीतबद्ध करता येऊ शकते . ‘वीरझारा’ ह्या चित्रपटासाठी यश चोप्रा ह्यांनी ओ. पी. नय्यर ह्या अनेक वर्षांपूर्वी निर्वतलेल्या संगीतकाराच्या चाली वापरल्या होत्या. त्यांचेच नाव संगीतकार म्हणून श्रेयनामावलीत होते.- कल्पना करा, एका नवीन चित्रपटात अनेक वर्षांपूर्वी निवर्तलेले गायक वा संगीतकार आहेत. त्यांच्या जुन्या कलाकृतींवर पृथ:करण करून नमुने केले जातील. संगणकीय गायक जुन्या गायकांचे नमुने वापरून ते गाणे पेश करतील. आगामी काळात दिलीपकुमार - मधुबालाही पडद्यावर जिवंत करता येतील. तो दिवस फार दूर नाही. नवोदित दिग्दर्शक ह्याच तंत्राचा वापर करून संगणकीय ई- कलाकारांकडून (आवाजासकट) क्लाऊडवर साठविलेल्या नमुन्याबरहुकूम अभिनय करून घेतील. ह्या सर्व बाबींमुळे सृजनशीलता, मूळ कला कुणाची, कॉपीराईट असे अनेक नवे प्रश्नही निर्माण होतील.- दीपक शिकारपूर, संगणक साक्षरता प्रसारक deepak@deepakshikarpur.com
दिलीपकुमार-मधुबाला पडद्यावर पुन्हा ‘जिवंत’ होतील... तो दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 9:04 AM