- प्रभात झाया लोकसभा निवडणुकीतून जो जनादेश मिळालेला आहे त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी अभ्यास करण्याची गरज आहे. तसा अभ्यास करणे राजकीय पक्षांनी सुरूदेखील केले असेल. या जनादेशाचे जे विश्लेषण आम्ही केले आहे, त्यातून जे निष्कर्ष निघाले ते येथे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. इतिहास घडत असतो, तो घडविता येत नाही. त्याप्रमाणे या निकालांनी इतिहास घडविला आहे असे म्हणता येईल. या वेळी अनेक राजकीय पक्षांना आणि पक्षातील नेत्यांना संधी मिळाली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी परस्पर सहमती आणि समन्वय यांचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. आधुनिक राजकारणातील ही अद्वितीय घटना होती. निवडणुकीच्या निर्णयातून जो संदेश मिळाला त्यात या दोघांतील समन्वयाने फार मोठी भूमिका बजावली होती.या नेत्याने जे विचार व्यक्त केले त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न पक्षाने केला तर संघटनेच्या विचारांची पूर्तता करण्याचा प्रयत्न नेत्याने केला. अशा तºहेचे कार्य देशातील अन्य राजकीय पक्षांना करता आले नाही. राष्ट्रीय पातळीवर ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने शक्य करून दाखवल्या. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की नेत्याचा आपल्या अध्यक्षावर विश्वास असायला हवा आणि संघटनेला आपल्या नेत्याविषयी अढळ विश्वास वाटायला हवा. आज मात्र असे आढळून येते की नेता हा सरकारच नाही, तर पक्षाची संघटनादेखील चालवू पाहतो; आणि संघटना आपल्या नेत्याला हटविण्याचा प्रयत्न करू लागते! आज भारताच्या राजकारणात उच्च स्तरावर जे नेतृत्व आहे त्यांच्यात परस्पर सात्त्विक विश्वास असण्याची गरज आहे. त्या पातळीवर विरोधी पक्षांकडे बघितले तर ते कमजोर असल्याचे दिसून येते.या निकालातून आणखीही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. आपल्या भारतीय प्रजासत्ताकाला ७३ वर्षे झाली आहेत. या ७३ वर्षांत देशातील जनतेने अनेक सरकारे निवडून दिली आहेत. त्यामुळे या देशातील जनता त्यादृष्टीने परिपक्व झाली आहे. या जनतेला त्यांच्या जातीशी जखडून ठेवणे हा मूर्खपणाच म्हणावा लागेल. त्यात कोणतेही शहाणपण नाही. वास्तविक जातीच्या बंधनातून समाजाची मुक्तता करण्याचे प्रयत्न सतत व्हायला हवेत. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन चालण्याची भूमिका प्रत्यक्षात उतरविली पाहिजे.या निवडणूक निकालाने स्पष्ट संकेत दिला आहे की पक्षापेक्षा राष्ट्र मोठे आहे. प्रत्यक्षात राजकीय पक्षात अशी स्थिती आहे की सर्वांत पहिले स्वत: नेते, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर देशाला स्थान दिले जाते. काही काही राजकीय पक्ष तर कुटुंबाचे पोषण करण्याकरताच पक्ष चालवीत असतात. या निवडणुकीच्या निकालाने हे स्पष्ट केले आहे की परिवारवाद किंवा वंशवाद हा अपवादात्मक स्थितीत योग्य आहे. या भावनेवर जे पक्ष आधारित होते त्यांना या निवडणूक निकालांनी स्पष्टपणे नाकारले आहे, असे अनेक ठिकाणी बघायला मिळाले. तसेच तुम्ही स्वत:ला जर लोकांचे प्रतिनिधी समजत असाल तर तुमच्यावर जनतेचा अधिकार आहे ही गोष्ट तुम्ही स्वीकारायला हवी. न्यूज चॅनेल जशी चोवीस तास कार्यरत असतात त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी सतत लोकांच्या नजरेत राहिले पाहिजे आणि लोकांसाठी काम करीत राहायला हवे. विरोधासाठी विरोध करण्याची बाब या निवडणुकीच्या निकालाने नाकारली आहे. तुमचा विरोध हा समर्थ असला पाहिजे. आणि लोकांच्या विवेकाने तो विरोध मान्य करायला हवा.या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली की धर्मनिरपेक्षतेच्या नावाने मतदारांना भ्रमित करणे यापुढे शक्य होणार नाही. नव्या पिढीचे विचार याबाबतीत वेगळे आहेत ही बाब विरोधकांनी लक्षात घ्यायला हवी. लोकांच्या मनातील प्रतिमांचे रक्षण केले पाहिजे. हे करण्याचे साहस भाजपला दाखवता आले ते अन्य पक्षांना दाखवता आले नाही. आणखी एक गोष्ट निकालाने स्पष्ट केली ती ही की जे लोक पक्षहिताचा विचार न करता साहसी निर्णय घेतात, ते लोकांना आवडतात. मोदी सरकारने जे साहसी निर्णय घेतले होते, ते निर्णय घेताना त्यांचा आपल्या मतांवर काय परिणाम होईल याचा विचार केला नव्हता. पण विरोधकांनी मात्र त्या निर्णयांकडे मतपेटीचा विचार करूनच बघितले. लोकांनी जे निर्णय स्वीकारले त्याविरुद्ध मतप्रदर्शन करून विरोधकांनी लोकांना दुखावले होते.आपल्या देशाचे संविधान, संसद, सरहद्द आणि सुरक्षा कुणाच्या हातात सुरक्षित आहे हे जनतेच्या लक्षात आले होते. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना विश्वास वाटेल या तºहेचे कामही करायला हवे. त्यादृष्टीने नरेंद्र मोदी हे सर्वांपेक्षा वेगळे दिसले. त्याचे बक्षीस लोकांनी त्यांच्या बाजूने मतदान करून दिले. नरेंद्र मोदींविषयी लोकांना वाटणारा विश्वास घराघरांत पोचविण्याचे काम अमित शहा यांनी केले. या निकालांनी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे जे कार्य झाले ते मला महत्त्वाचे वाटते. ज्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांविषयी विश्वास वाटत नाही तो पक्ष लोकांचा विश्वास कसा संपादन करू शकेल? कार्यकर्ता हा राजकीय पक्ष आणि जनता यांना जोडणारा सेतू असतो हे ज्यांना समजले होते, त्यांनाच या निवडणुकीत यश मिळाले असे म्हणता येईल.
(भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष)