- अतुल कुलकर्णी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकलेला लेटरबॉम्ब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी केलेले भाषण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा आणि “काँग्रेस सोबत येणार नसेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल”, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले विधान... या सगळ्यावरून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या सगळ्या घटनांवर आता राजकीय चर्चा झडत आहेत. सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेले पत्र माध्यमांपर्यंत कसे गेले? सरनाईक यांनी ते पत्र मुख्यमंत्री कार्यालयात आवक जावक विभागात दिले. त्यावर “रिसीव्हड” म्हणून सही-शिक्का घेतला आणि पक्षाच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर हे पत्र त्यांनी माध्यमांकडे पोहोचते केले, हे विशेष!
ईडीच्या माध्यमातून सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. सहा-सात महिन्यापूर्वीचा त्यांचा जोश आणि आजच्या पत्रातली भाषा यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. या प्रकरणात आपल्याला पक्षीय मदत होत नाही, हे लक्षात आल्याने त्या अस्वस्थतेतून त्यांनी ते पत्र दिले, असे त्यांच्या जवळचे लोक म्हणतात. शिवसेना पक्षप्रमुखांना एखादे पत्र देणे आणि ते माध्यमांमधून व्हायरल करणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सरनाईक थेट ठाकरेंना पत्र देऊ शकले असते. तसे त्यांनी केले नाही. शिवाय या पत्रात मातोश्रीच्या जवळ असणारे परिवहन मंत्री अनिल परब, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर या दोन नेत्यांची नावे घालून त्यांचीही बाजू आपण मांडत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेत अशा खुल्या पत्रांना किंमत नसते. ईडीच्या चौकशीत आपण फसत चाललो आहोत, हे लक्षात आल्यामुळेच या विषयाला राजकीय रंग दिला तर त्याची तीव्रता कमी होईल या विचाराने आपण भाजपच्या बाजूचे आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न सरनाईक यांनी केला. यात त्यांचेच नुकसान झाले आहे. या पत्राची दखल पक्ष प्रमुख वर्धापन दिनाच्या भाषणात घेतील, असा भोळा आशावाद त्यांना असावा, मात्र ठाकरे यांनी दखलच घेतली नाही, त्यामुळे हे पत्र नंतर व्हायरल केले अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत या पद्धतीने पक्षात काम चालणार नाही असेही सांगितल्याचे वृत्त आहे.
राज्य संकटात असताना, कोणत्याही निवडणुका समोर नसताना, स्वबळाची भाषा केल्यास लोक जोडे मारतील, अशा शेलक्या शब्दात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे यांनी काँग्रेसचे नाव न घेता सुनावले. त्यानंतर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. मात्र दिल्लीने मुख्यमंत्र्यांचे भाषण गंभीरतेने घेतले. महाराष्ट्रातल्या नेत्यांना संदेश दिले गेले. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणाविरुद्ध प्रतिक्रिया दिली नाही. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या स्वबळाच्या भूमिकेला विरोध दर्शवत “ महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. जो काही निर्णय घ्यायचा तो दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतील”, असे सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “आम्ही सगळे एकत्र निवडणूक लढवण्याच्या विचाराचे आहोत. पण काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल, तर शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवतील!”
काही दिवसापूर्वी रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीतही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याविषयी चर्चा झाली होती. तीच भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. राष्ट्रवादी मध्ये शरद पवार, अजित पवार व शिवसेनेत उद्धव ठाकरे म्हणतील तेच होते. हे तिन्ही नेते पक्ष आणि सरकारच्या पातळीवर सातत्याने आढावा घेत असतात. पक्षांतर्गत सूचना करतात. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पक्षीय पातळीवर राज्याचा आढावा घेणारा एकही नेता नाही. सगळेच ज्येष्ठ नेते झाल्यामुळे कोणी कोणाला सांगायचे, आणि कोणी कोणाचे ऐकायचे, हा प्रश्न आहे. त्यातही जे नेते सत्तेत थेट सहभागी आहेत, त्यांना हे सरकार पाच वर्षे टिकावे असे वाटते. नाना पटोले मंत्री झाल्यास ते सुद्धा सरकार पूर्ण काळ टिकेल असेच सांगतील. ज्यांना कोणतेही पद मिळालेले नाही, त्यांना पक्षाच्या सगळ्या अडचणी अचानक दिसू लागल्या आहेत.
काँग्रेसच्या अशा नेत्यांमध्ये अस्वस्थता पेरण्याचे काम भाजपने केले नाही तर नवल. काँग्रेसने स्वबळावर काही निवडणुका लढवाव्यात. त्यातून शिवसेना, राष्ट्रवादीला फायदा झाल्यास काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करेल. एक प्रकारे ही लिटमस टेस्ट आहे. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मॅजिक फिगर आणा, आणि जरूर मुख्यमंत्री बना”, असा उपरोधिक सल्ला दिला होता. भाई जगताप मुंबईचे अध्यक्ष झाल्यानंतर चरणजित सिंग सप्रा यांच्यासह शरद पवार यांना भेटायला गेले. पवार यांनी त्यांच्या हातातील फुले न घेताच, “ आपण स्वबळावर लढण्याची भाषा करत आहात, चांगले आहे “, अशा शब्दात दोघांचे स्वागत केले होते. पडद्याआडच्या गोष्टी समजून घेऊन त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम काँग्रेसमधून होताना दिसत नाही.
महाराष्ट्रात भाजपसोबत गेल्यास आपल्याला दुय्यम भूमिका घ्यावी लागेल, यावर राष्ट्रवादी, शिवसेनेचे एकमत आहे. त्यामुळे भविष्यात दोघांना एकत्र यायचे आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर ठाकरे यांनी ज्या स्पष्ट शब्दात पक्षाच्या नेत्यांसमोर भावना व्यक्त केल्या, त्यावरुन नेत्यांनाही पुढची दिशा कळलेली आहे. प्रशांत किशोर शिवसेना, राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्रात आखणी करत आहेत. दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत त्यांची वेगळी मोहीम सुरू आहे. यात काँग्रेस सोबत आली तर ठीक, न आल्यास ती जेवढी अस्थिर होईल तेवढी करायची, त्यातून काँग्रेसचे नेते सोयीनुसार शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये आल्यास त्यांचे स्वागत करायचे, भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुद्धा करायची... असे डावपेच पडद्याआड आखले जात आहेत. हे लक्षात न घेता काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची विधाने पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी बनली आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांचा लेटरबॉम्ब, काँग्रेसचे स्वबळ आणि ठाकरेंचे जोडे याचा एकत्रित विचार करावा लागेल.