- रविप्रकाश कुलकर्णीहजार वर्षांचा काळोख प्रकाशाच्या एका किरणाने नष्ट होतो. तो तेजोत्सव म्हणजेच दिवाळी असं परंपरा सांगते. गोडधोड, कपडेलत्ते, फटाके यांच्याबरोबरच मराठी वाचकांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय असूच शकत नाही. आता तर दिवाळी तोंडावर आली तेव्हा ‘कलाक्षरे’मध्ये दिवाळी अंकाची चाहूल अपरिहार्यच...काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ च्या दिवाळीला आपल्या मासिक दिवाळीला आपल्या मनोरंजनाच्या वाचकाला विशेष भेट म्हणून ‘दिवाळीचा अंक’ ही अभिनव कल्पना सादर केली आणि ही भेट वाचकांना इतकी आवडली की तेव्हापासून दिवाळी अंकाला दरवर्षी नवनवे धुमारे फुटायला लागले आहेत.याबाबत उत्तुंग झेप घेतली तो लोकमत दीपोत्सव अंकाने. दोन वर्षांपूर्वी हा अंक लाखाच्या वर खपला हा केवळ योगायोग नव्हता. तर विशेष आयोजन केले तर याच्याही पुढे जाता येते, हे गेल्या वर्षी दोन लाखांच्या वर हा अंक वाचकांनी विकत घेतला यावरून दिसलं. यंदा तर तीन लाखांच्या वर हा अंक संपेल असा संपादकांचा विश्वास आहे! थोडक्यात लोकमत दीपोत्सव हे जणू ब्रँड नेम झाले आहे.दूरदर्शनला मालिकांचे आगमन हे दिवाळी अंकाच्या मुळावर येऊ पाहते आहे. असा आरडाओरडा कालपरवा काही जणांनी केला. पण त्यात किती तथ्य होते, आहे? तर आता चक्क झी मराठी या वाहिनीतर्फे यंदा ‘उत्सव नात्यांचा’ हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे! प्रशांत दळवी संपादित या अंकाची सर्व निर्मितीची जबाबदारी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी घेतली. चॅनेलतर्फे दिवाळी अंक निघतोय असे कळल्याबरोबर या क्षेत्रात मरगळ आलेल्या धुरीणांनी नेहमीप्रमाणे असा अंक किती खपणार? वगैरे रडका सूर लावला. पण सुदेश हिंगलासपूरकर यांनी त्यांच्या स्वभावानुसार ‘करायचं तर ते दणक्यात’ या वृत्तीने ‘उत्सव नात्यांची’ आवृत्ती काढली. गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाने ‘विद्यावृत्ती’ दिवाळी अंक काढून दिवाळी अंकाचे महत्त्व अधोरेखित केले. आता ‘झी’सारख्या वाहिनीला प्रिंट मीडियाकडे वळावेसे वाटले हे वाचन संस्कृतीचे यश आहे.बदल हा करायला लागतो. केले म्हणजे होते हेच खरे. त्यामागे ऊर्मी लागते. मग ‘ब्रँड नेम’ आपोआप होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘ऋतूरंग’ दिवाळी अंक. एखाद्या विशिष्ट विषयालाच वाहिलेला अंक हा प्रकार या अंकाचे संपादक अरुण शेवते यांनी सुरू केला. तेव्हा असा अंक कुठे चालतो का वगैरे सूर उमटला. त्या ‘ऋतूरंग’ने पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत! त्याच्याही पुढची वेगळी गोष्ट म्हणजे दिवाळी अंक साहित्याचे पुस्तक काढायची कल्पना शेवते यांनी सुरू केली आणि ती यशस्वी झाली. ऋतूरंगच्या पंचवीस वर्षांतील साहित्याची पन्नास पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशकांतर्र्फे प्रकाशित झालेली आहेत.थोडक्यात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हेच खरे...दिवाळी अंकाची भेट योजना वीस वर्षांपूर्वी अनिल कोठावळे यांनी सुरू केली आणि हे लोण इतके काही पसरत गेले की एक वर्षी कुठल्या तरी अंकासोबत तेलाची बाटलीदेखील देण्यात आली. पण या थेट वस्तूतील झालेले साचलेपणा ओळखून किल्ला इतिहासातला, मनातला वास्तवातला या अंकाचे संपादक रामनाथ आंबेरकर यांनी आपल्या वाचकांची इतिहासाची ओढ ओळखून चक्र अंकासोबत शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं चलन शिवराई याची यथामूळ निर्मिती करून हे नाणं शिवप्रेमींना एक विशेष भेट म्हणून दिलेलं आहे.दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा हा एक नवा प्रकार आता रूढ होऊ पाहतो आहे. पुण्यात दिवाळी अंकाचे खूपच प्रकाशन सोहळे होतात, हे विशेष. त्यातदेखील वेगळेपण दाखवले ते ‘मोहनगरी’ या नव्यानेच आलेल्या अंकाचे संपादक आनंद लाटकर यांनी. त्यांचा 'दिलीप राज देव' विशेषांक आहे. त्याकरिता त्यांनी या त्रिमूर्तीच्या गाड्यांचा आॅर्केस्ट्रा ठेवला. एरव्ही आॅर्केस्ट्रामध्ये गाण्यांचे किस्से, मिमिक्री असलं काही तरी असतं. पण! ‘मोहनगरी’च्या या आॅर्केस्ट्राच्या सुरेल गाण्यांच्या मध्ये अंकातील लेखाची माहिती त्या त्या लेखकांच्या नावासकट सांगितली गेली. कुठल्याही लेखकाला ही सुखावणारी गोष्ट. दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आॅर्केस्ट्रा प्रकारातले हे नवे वळण आहे.दिवाळी अंकाचे हे नवे वारे दिवाळी अंक परंपरा पुढे नेणारी आहे. तेव्हा आता येणाºया अंकाची वाट पाहूया. ‘कलाक्षरे’च्या रसिक वाचकांना ही दिवाळी वाचनानंदाने जावो हीच सदिच्छा!
दिवाळी अंकाचं बदलतं वारं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:26 AM