- धर्मराज हल्लाळेमुलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे हे सर्वजण सांगतात. परंतु अनेकदा मुलांना काय कळते, असा समज असलेले पालकच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. अशा परिस्थितीत शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेऊन मुलांना पुढील दिशा ठरविण्याचा हक्क दिला, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु, निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, याची स्पष्टता नसल्याने थेट विद्यार्थ्यांना लाभ कसा मिळेल हा प्रश्न आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो़ज्याद्वारे विद्यार्थ्यांची अभिरूची शोधली जाते. परिणामी विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणते करिअर निवडावे याची दिशा मिळते, अशी अपेक्षा असते. मात्र शिक्षण मंडळाकडे स्पष्टतेचा अभाव असल्याने कलमापनाचा कल शिक्षण खात्यालाच कळेना की काय असे वाटते.आज पालक जागरूक आहेत. मुलेही हुशार आहेत. मात्र शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये अजूनही दहावीनंतर पुढे काय करावे, या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी व पालकांना सापडत नाही. पारंपरिक शिक्षण घ्यावे की व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा हा प्रश्न असतो. शिक्षणाचे माध्यम, पद्धती, अभ्यासक्रमातील फरक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषम शिक्षण व्यवस्था पेरलेली आहे. केवळ वर्गनिहाय विचार करून सर्वांना दहावीनंतर एका रांगेत उभे करून त्यांची तुलना करणे अन्यायकारक आहे. जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, इंग्रजी शाळा हा फरक शालेय शिक्षणात आहे. सीबीएसई तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या शाळांमधील पालक नानाविध प्रकारे मुलांच्या कलमापन चाचण्या करून घेतात. मुलेही तितकीच हुशार असतात, त्यांचे कुठल्या दिशेने जायचे ठरलेले असते. प्रश्न ग्रामीण भागातील शाळांचा आहे. निश्चितच तेथील मुलांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. मुलाची आवड पाहून त्याच्या अभ्यासक्रमाची निवड झाली पाहिजे. त्याचसाठी शिक्षण मंडळ, विद्या प्राधिकरण व श्यामची आई फाऊंडेशन कलमापन चाचण्या घेते. जे विद्यार्थी दहावीला आहेत त्यांच्यासाठीची ही चाचणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही चाचणी घेतली गेली. आता ही चाचणी मोबाईल अॅपद्वारे होणार आहे. परंतु, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना मोबाईल कोठून मिळणार हा विषय आहे. शाळांनी टप्प्याटप्प्यांनी विद्यार्थ्यांकडून ही चाचणी पूर्ण करून घ्यायची आहे. यापूर्वी संगणकाद्वारे ही चाचणी झाली. परंतु, त्यातील अडचणी समोर ठेवून मोबाईल अॅपचा निर्णय घेतला. त्याचे स्वागतही होत आहे. मात्र मोबाईल शिक्षकांनी उपलब्ध करून द्यायचा की शिक्षण विभागाकडून मिळेल, हा सवाल आहे.शासन अडचणी दूर करेल. शिक्षकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देईल. चाचणीसाठी योग्य प्रशिक्षण होईल. ज्यामुळे कलमापन चाचणी योग्यरीत्या पूर्ण होईल. हे सर्व गृहित धरले तरी कलमापन चाचणीतून येणाऱ्या निष्कर्षावर पुढे कसे काम होते, यावरच निर्णयाचे फलित अवलंबून आहे. विद्यार्थ्यांचा कल आणि त्यांचा निर्णय अंतिम असला पाहिजे. तरच शिक्षणाचा मूलभूत हेतू सफल होईल आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणही दूर होईल.
दहावीतील विद्यार्थ्यांच्या कलमापनाचा कल शिक्षण खात्याला कळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 9:17 PM