शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नाईटलाईफच्या 'अंदर की बात' तुम्हाला माहित्येय का?

By संदीप प्रधान | Published: January 23, 2020 9:17 PM

सर्वप्रथम मुंबईत एक नाइटलाइफ वर्षानुवर्षे सुरू होते व आहे

संदीप प्रधान

मुंबई - आदित्य ठाकरे हे धाडसी नेते आहेत. ठाकरे कुटुंबात निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्वप्रथम त्यांनी घेतला. तरुणांच्या हिताचा ते विचार करतात. त्याच हेतूने त्यांनी नाइटलाइफचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात मंजूर करवून घेतला. बृहन्मुंबईत साधारणपणे पाच लाख युवक-युवती हे शिफ्टमध्ये काम करतात. त्यांच्या सोयीकरिता २४ तास मुंबई सक्रिय हवी, असे आदित्य म्हणाले. मुंबई अहोरात्र सुरू राहिली तर वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी किमान १० लाख लोकांना रोजगार मिळेल, असा त्यांचा होरा आहे. आदित्य यांचा हेतू चांगला आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, ही योजना अमलात आणण्यात काही अडचणी निश्चित दिसतात. त्यांचा विचार वेळीच केला, तर नंतर तोंडघशी पडण्याची वेळ येणार नाही.

सर्वप्रथम मुंबईत एक नाइटलाइफ वर्षानुवर्षे सुरू होते व आहे. त्यामध्ये सहभागी निशाचरांनी आपापली व्यवस्था करून घेतलेली आहे. कुलाब्यात एकेकाळी ब्ल्यू नाइल नावाचा कॅब्रे सुरू असायचा व रात्री उशिरापर्यंत स्त्री-पुरुष त्याचा आनंद घ्यायचे. काही वर्षांपूर्वी तो बंद झाला. तेथेच लिओपोल्ड हे विदेशी नागरिकांचे फेव्हरेट डेस्टीनेशन आहे. त्यावर २६/११ ला हल्ला झाला होता. ताजमहाल हॉटेलच्या मागे एक हॉटेल गेली कित्येक वर्षे सुरू असून त्याला पिकअप जॉइंट म्हणून ओळखले जाते. मुंबई सेंट्रल व आॅपेरा हाउस परिसरातील ‘टोपाझ’ हा डान्स बार नाइटलाइफ शौकिनांमध्ये सुपरिचित होता. तेथे पहाटेपर्यंत बड्या असामींचा वावर असायचा. ‘काँग्रेस हाउस’मधील मुजराही विशिष्ट शौकिनांमध्ये पसंत होता. फोरास रोडवर रात्रभर ‘बाजार’ भरलेला असायचा व त्या परिसरातील पानवाल्यांपासून बारपर्यंत सारेच एकेकाळी पहाटेपर्यंत सुरू असायचे. पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले या सांस्कृतिक नगरीत एकेकाळी ‘दीपा’ बारमधील तरन्नुम या बार गर्लने बॉलिवूडच्या स्टार्सनाही खुळं केलं होत. तिला त्या काळात महागड्या मोटारी व फ्लॅट बक्षीस देणारे आशिक लाभले होते. मुंबईत एकेकाळी डान्स बारमुळे कुलाबा, मुंबई सेंट्रल, चेंबूर, मुलुंड, अंधेरी, मालाड वगैरे भागांत नाइटलाइफ फेसाळून वाहत होते. भेंडीबाजार, डोंगरी, भायखळा वगैरे काही मोहल्ल्यांत रात्री उशिरापर्यंत कबाब, बिर्यानी खायला गर्दी असते. ‘बडे मियाँ’सारखे स्पॉट खवय्यांना रात्री उशिरा तिकडे खेचून नेतात. हाजी अलीच्या कोपऱ्यावरील ज्युस सेंटर रात्री उशिरापर्यंत गर्दीने खचाखच असायचे. घाटकोपरच्या गारोडियानगरमध्ये पानाचे शौकीन रात्री पिचकाºया मारत गप्पांचे अड्डे जमवतात. सायकलवर चहा-कॉफी व सिगारेट-गुटखा किंवा इडली घेऊन फिरणारे दाक्षिणात्य मुंबईतील शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांचा मोठा आधार आहेत. याखेरीज, मुंबईतील अनेक अधिकृत, अनधिकृत क्लबमध्ये रात्रभर जुगार चालतो. येथेही धनिकांची ऊठबस असते.

पंचतारांकित व सप्ततारांकित हॉटेलांमधील पब, लाउंज किंवा जुन्या गिरण्यांच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या पब्जमध्येही रात्री उशिरापर्यंत फॅशन शो, पार्ट्या, प्रायव्हेट गेट टुगेदर सुरु असतात. पहाटेच्या सुमारास मुंबईत चोरबाजारात वस्तूंची खरेदी करायला हौशे-नवशे गर्दी करतात. त्यावेळी पार्ट्यांमध्ये झिंगलेले निशाचर नुकतेच पांघरुणात शिरलेले असतात. बुटांच्या ढिगाºयातून पसंतीचा जोड शोधून काढण्याकरिता किंवा मोटारींचे चोरीचे एम्ब्लेम, पार्ट खरेदी करण्याकरिता लोक चोरबाजारात गर्दी करतात. तेथे सर्वकाही मिळते. पहाटे तेथे तोबा गर्दी असते. याखेरीज, बाहेरगावच्या गाड्या येणाºया व जाणाºया दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस वगैरे रेल्वेस्थानकांबाहेर रात्रभर वाफाळलेला चहा आणि गरमागरम वडापाव उपलब्ध असतो. भुर्जीपावच्या गाडीवर ‘चपटी’ची सोय असल्याने अनेकदा तरुणाई बारमधून बळेबळे बाहेर काढल्यावर याच गाड्यांवर पहाटे क्षुधाशांती करते. मुंबईतील हे नाइटलाइफ निर्बंधाविना वर्षानुवर्षे सुरू होते. प्रमोद नवलकर यांच्यासारख्या सव्यसाची पत्रकाराने त्यावर विपुल लेखन केले आहे.

मुंबईतील नाइटलाइफला पहिला धक्का पोहोचला, तो अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर मुंबईत घडवलेल्या ना भुतो ना भविष्यती अशा दंगलींमुळे. शिवसैनिक त्या दंगलीत सक्रिय होते. दंगलीनंतर जे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे अनेकांनी कबाब खायला डोंगरी-भायखळ्यात जायचे सोडले, तर डान्स बारमध्ये धनाढ्यांचे मन रिझवणाºया अनेक मुली त्यांच्या मूळ राज्यात पळून गेल्या. पाच-सात वर्षांनंतर नाइटलाइफ पुन्हा सुरू झाले, तोच डान्स बारबंदी लागू झाली व अनेक निर्बंध लागू झाले. मुंबई विस्तारल्यामुळे आता पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या मुंबईच्या पलीकडच्या उपनगरांत नाइटलाइफ जोरात सुरू आहे. नाइटलाइफचा आनंद घेणारा एक वर्ग असून तो त्यांच्या गरजा भागवतो. सरकारने त्यामध्ये संस्कृतीरक्षकाच्या आविर्भावात ढवळाढवळ केली तर डान्स बारबंदीच्या निर्णयाचे अखेर न्यायालयात काय झाले, ते आपण अनुभवले आहे. सध्या निर्बंध धाब्यावर बसवून सर्वकाही सुरू आहे.

अर्थात, आदित्य यांना नाइटलाइफमध्ये वरील बाबी अभिप्रेत नाहीत. आदित्य यांना बीपीओ, आयटी, मीडिया, मनोरंजन क्षेत्रांत काम करणाºया तरुणांकरिता पोटापाण्याची व मनोरंजनाची व्यवस्था करायची आहे. सध्या जेथे बीपीओ अथवा आयटी क्षेत्रातील तरुणवर्ग काम करतो, तेथे रात्रीच्या वेळी पावभाजी, पिझ्झा, ज्युस यांची अगदी उशिरापर्यंत विक्री होते. त्यांची सिगारेटची तल्लफ भागवण्याकरिता दुकाने सुरू असतात. अर्थात, त्यांना परवानगी नसल्याने पोलिसांना खाद्यपदार्थांचे पार्सल व पैसे मोजावे लागतात. मात्र, ही मालाड, अंधेरी, लोअर परळ वगैरे काही मोजकी ठिकाणे आहेत. त्यामुळे या तरुण नोकरदारवर्गाकरिता संपूर्ण मुंबईभर नाइटलाइफ सुरू राहील, ही अपेक्षा चुकीची आहे. त्यातही सध्या आर्थिक मंदीमुळे आयटी क्षेत्रापासून आॅटोमोबाइलपर्यंत सर्व क्षेत्रांतील हजारो लोकांनी नोकºया गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत हॉटेल किंवा इंटिंग जॉइंट्समध्ये जर रात्री दीड-दोन वाजल्यानंतर गर्दी नसेल, तर पहाटेपर्यंत हॉटेल खुले ठेवून कर्मचाºयांचे वेतन, वीजबिल, सुरक्षाव्यवस्था वगैरेंवर खर्च करणे हॉटेल इंडस्ट्रीतील लोकांना परवडणार नाही. आदित्य म्हणतात तसे हा जर पाच लाख तरुण नोकरदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असेल, तर मुंबईच्या एक कोटी ४० लाख लोकसंख्येपैकी केवळ ३ ते ३.५ टक्के लोकसंख्येच्या गरजा भागवण्याचा विषय आहे. मग त्याकरिता पोलीस, अग्निशमन दल व तत्सम सर्व यंत्रणांवरील ताण वाढवायचा का, याचा विचार करायला हवा. अहोरात्र हॉटेल, मॉल खुले राहिले तर पोलीस त्यांचे मूळ सुरक्षेचे काम करतील व सध्या ते बंद करण्याकरिता पोलिसांना जे हेलपाटे मारावे लागतात ते मारावे लागणार नाहीत, असे आदित्य म्हणतात. मात्र, ग्राहक नसतानाही हॉटेल सुरू ठेवणे मालकांना अशक्य आहे. अनेक व्यावसायिक नोटाबंदी व जीएसटीमुळे आर्थिक संकटात असताना हॉटेल व्यावसायिकांना तुलनेने कमी झळ बसली आहे, याचे कारण हॉटेलिंग ही आजही मोठ्या वर्गाची गरज आहे. नाइटलाइफमुळे त्यांच्यावरील आर्थिक बोजा वाढला, तर या व्यावसायिकांचेही कंबरडे मोडेल व लोकांना रोजगार मिळणे दूरच, उलट काहींना रोजगार गमवावा लागेल.

सध्या तरुण पिढीत अनेक गोष्टी आॅनलाइन खरेदी करण्याचे फॅड आहे. त्यावर मोठा डिस्काउंट मिळतो. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू तरुणवर्ग आॅनलाइन खरेदी करतो. त्यामुळे रात्रपाळीत काम करणाºया या वर्गाकरिता मॉल खुले ठेवले तरी ते तेथे खरेदीला येतील, याची खात्री नाही. जिओ फोनमुळे समाजातील खालच्या स्तरातील लोकांनाही या आॅनलाइन खरेदीचे वेड लागले आहे. त्यामुळे तो ग्राहकही आता काही प्रमाणात कमी झाला आहे. खाद्यपदार्थ झोमॅटो वा तत्सम अ‍ॅपवरून आॅर्डर करण्याकडेच मोठा कल वाढला आहे. कारण, माझ्या घराखाली किंवा कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये सर्व खाद्यपदार्थ मिळत असले, तरी अमुक एका ठिकाणी मिळणारी इडली किंवा मिसळ हीच खायची इच्छा असल्याने व त्याकरिता अ‍ॅपवरून आॅर्डर दिल्यास मोठी सूट मिळत असल्याने अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थ मागवण्याकडे कल वाढला आहे. अशा परिस्थितीत कार्यालयाखालील हॉटेलवाला पहाटेपर्यंत माश्या मारत कशाला बसेल? राहता राहिला करमणुकीचा विषय, तर आजच्या तरुण पिढीच्या मोबाइलमध्ये त्यांची करमणूक आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम किंवा नेटफ्लिक्सवर लक्षावधी वेबसिरीज, फिल्म, डॉक्युमेंटरी उपलब्ध असताना रात्री मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये मध्यरात्री अडीच वाजताचा शो पाहायला कितीजण जातील, याबाबत साशंकता आहे. राज्य सरकारने नाइटलाइफ सुरू केले तर त्याला पूरक अशा पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध हवी. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १२ वाजून ४५ मिनिटांनी शेवटची लोकल सोडली जात होती. आज ती २० ते २५ मिनिटे अगोदर सोडली जाते. केंद्रातील सरकार रात्रभर रेल्वेसेवा सुरू करेल, असे वाटत नाही. बेस्टच्या बसगाड्या रात्री सुरू असायला हव्या. अन्यथा, महागड्या प्रायव्हेट कॅबसेवेवर साऱ्यांना अवलंबून राहावे लागेल व नाइटलाइफ ही मर्यादित लोकांचीच मिरासदारी ठरेल.

त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवर नाइटलाइफचा लाभ किती मोठ्या वर्गाला होणार आहे व खरोखरच त्यांची ती मागणी आहे का, हा प्रश्न मनात येतो. शेजारील गोव्यात क्रूझ कॅसिनो आहेत. मुंबईतील नाइटलाइफला विरोध करणाºया भाजपचे तेथे सरकार असूनही त्यांनी ते बंद केलेले नाहीत. क्रूझ कॅसिनोत मुंबई, गुजरात व पंजाबमधून लोक जातात. तेथे वास्तव्याची सोय असते, तशीच मसाजपासून अनेक मौजमजेची सोय केलेली असते. खेळण्याकरिता उधारीवर पैसे दिले जातात व ते वसूल केले जातात. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मुंबईलगच्या समुद्रात तसे क्रूझ कॅसिनो किंवा वांद्रे-कुर्ला संकुलात कॅसिनो सुरू करण्याकरिता तर नाइटलाइफची टूम काढलेली नाही ना? अशी शंका घ्यायला वाव निर्माण होतो. अर्थात, नाइटलाइफच्या निर्णयातील ‘अंदर की बात’ लवकरच उजेडात येईल.

टॅग्स :MumbaiमुंबईNightlifeनाईटलाईफAditya Thackreyआदित्य ठाकरे