- डॉ. प्रज्ञावंत देवळेकरशाहरुखच्या मुलाचं सोडा, जे झालं ते, कदाचित त्याच्या करिअरसाठी लाँचपॅड ठरेल.. पण, तुम्ही तुमच्या घरातल्या-आजूबाजूच्या मुलांशी यावर बोला आणि त्यांची प्रतिक्रिया बघा..‘लिया माल,व्हाट्स दी बिग डिल?, क्रूझपे वो क्या चाय पिने जायेंगा क्या?’ असं मध्यमवर्गीय घरातली मुलंही पटकन बोलतात किंवा फक्त सूचक हसतात.. हे सगळं “आपण नक्की कुठे चाललो आहोत?” असा प्रश्न नक्की निर्माण करतं.. आर्यनची ‘बातमी’ झाली पण, हल्ली अगदी शाळकरी मुलंही कोणकोणत्या व्यसनात अडकली नाहीयेत हे विचारा.
माझ्या एका शाळकरी पेशंटनं गावाहून येताना बस डोक्यावर घेतली कारण काय तर, त्याला पेट्रोल हुंगायचं व्यसन होतं. ड्रायव्हरला विनंती करत कशीबशी पेट्रोलपंपावर गाडी थांबवली, त्याच्या पालकांनी वीस रुपयात रुमाल पेट्रोलनं भिजवून घेतला आणि कसेबसे पुण्यापर्यंत आले.
मुळात संप्रेरकांमुळं या वयात व्यसनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीला सहज गंमत म्हणून मुलं या व्यसनांकडे वळतात आणि नंतर ते व्यसन त्यांची गरज होतं. मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एकदा का, व्यसन लागलं की, ७० ते ९० टक्के व्यक्ती ते सोडण्यास तयार नसतात.निकोटिनशिवाय एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थाच्याही विळख्यात तरुणाई सोबत आता शाळकरी विद्यार्थीही अडकलेत.
जेलच्या ‘आत-बाहेर’ होणारे काही पेडलर्स माझे पेशंट आहेत. ‘बुक’ या नावानं विद्यार्थ्यांमध्ये एक पावडर प्रसिद्ध आहे आणि याच वयोगटात केटामाईन, मॅजिक मशरूम यासारख्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ग्लू-पेंट-ड्रायक्लिनिंगचं केमिकल-बॉण्ड-आयोडेक्स-स्टिकफास्ट-फेविक्विक-गॅसोलिन-हेअरस्प्रे-डिओड्रंट-थिनर-नेलपेन्ट रिमूव्हर-आयोडेक्स-पर्मनंट मार्कर आणि काय नाही?, - यात आता मुलीही मागं नाहीत.
बरं हे पदार्थ घेण्याच्याही वेगवेगळ्या अभिनव पद्धती आहेत.. ‘बॅगिंग’ म्हणजे कागद किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तो पदार्थ उडवून त्यातून नाकाने आणि तोंडाने हवा आत घेणं. ‘हफिंग’ म्हणजे या पदार्थानं भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडात ठेवणं. ‘स्निफिंग’ म्हणजे तो पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याचा नाकानं वास घेणं.या पदार्थांमध्ये असणाऱ्या रसायनात ब्युटेन, क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो ज्यामुळं थेट मेंदूला ‘किक’ पोहोचते.
मुळात ‘व्यसन’ या गोष्टीला वैज्ञानिक चष्म्यातून आणि आजाराच्या अंगानंच बघितलं पाहिजे. कुतूहलानं व्यसन ‘ट्राय’ करणारी मुलं हळूहळू त्यात गुंतत जातात. काहीतरी घेतलं की, ‘छान वाटतं’ हे डोक्यात घट्ट होतं-मेंदूची संदेशवहन यंत्रणा कोलमडते-चांगलं वाईट यातला फरक लक्षात येईनासा होतो-डोळ्यांसमोर फक्त तो पदार्थ दिसू लागतो-आणि तो पदार्थ मिळाला की, डोपामाईन स्रवणं सुरू होतं-माणूस स्वत:ला जस्टिफाय करू लागतो आणि चक्र सुरू रहातं. हे चक्र वारंवार सुरू राहिलं की, तो पदार्थ मन-मेंदू-शरीर यांच्या स्वास्थ्यासाठी जरुरीचा होऊन बसतो आणि मिळाला नाही की, चिडचिड-अस्वस्थता-घबराट-थरथर सुरू होते अन् तो, पदार्थ जीवनावश्यक बनून जातो.प्रारंभी मौज वाटली तरी या, सगळ्याचा परिणाम प्रामुख्यानं हृदय-त्वचा-पचन संस्था-श्वसनसंस्था-किडनी यासोबतच मेंदूवरही होतो.
बाकी व्यसन म्हटलं तर, फक्त कुठल्या तरी अमली पदार्थाचं सेवन असं नाही अजून माणसाचा मेंदू बहकवणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत.सोशल मीडिया-नेटफ्लिक्स-गेम्स अलीकडंच आलं पण, अजूनही लोक ‘बम बोले’ म्हणत जळत्या निखाऱ्यावरून चालतात, हालेलुया म्हटलं की, देहभान हरवतात, मिरवणुकीत स्वत:च्या शरीरात सुया टोचून घेतात आणि तरीही त्यांना काहीच होत नाही ही, देखील एक सामुदायिक नशाच आहे.ब्रेकिंग न्यूजचं काय? - आज आहे उद्या दुसरी येईल पण, उद्याच्या पिढीचं काय? यावर साकल्यानं कुणी बोलणार नाही !!... हे सगळं जाणवलं म्हणून हा प्रपंच !