अंजली जमदग्नी,(लेखिका लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीच्या सहायक संपादक आहेत.)देवयानी खोब्रागडे, भारतीय परराष्ट्र सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी. सर्वसामान्य मुलींसाठी जे जीवनाचे स्वप्न असते, तिथे पोहोचलेली एक भारतीय युवती! मुंबईतील कॉन्व्हेन्ट शाळेत प्राथमिक शिक्षण, केईएममध्ये वैद्यकीय पदवी, एमएस करताना नागरी सेवेत जाण्याचा निर्णय. सारेच अभिमानास्पद, आदर्श! मग असे काय झाले? गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये झालेली वादग्रस्त अटक आणि अमेरिकेतील खटला अजूनही संपला नाही. अशा परिस्थितीत आणखी एक वादळ देवयानीभोवती घोंघावू लागले आहे. गेल्या वेळी झालेल्या वादाची परिणती भारत- अमेरिका संबंधात वितुष्ट निर्माण होण्यात झाली. भारताने अनेकवार विनंती केल्यानंतरही अमेरिकेने खटला मागे घेतला नाही, तर या वर्षीचे वादळ भारत सरकारने केलेल्या आरोपांचे आहे. अमेरिकेतील खटल्यात देवयानीला पाठिंबा देणारे भारत सरकार आज देवयानीवर स्वत:च आरोप करण्यास उभे राहिले. असे का व्हावे? या दोन्ही घटना परस्परविरोधी असल्याचे दिसत आहे. पण, खरे जाणून घ्यायचे, तर देवयानीची भूमिकाही समजून घेतली पाहिजे. देवयानी ही माजी आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांची कन्या. १९९९च्या तुकडीची आयएफएस अधिकारी. इंग्रजी, मराठी, हिंदी व जर्मन भाषांवर प्रभुत्व. इटली, जर्मनी आणि पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासात काम केले. २०१२मध्ये अमेरिकेत भारताच्या उपमहावाणिज्यदूत म्हणून नियुक्ती. जर्मनीत काम करत असताना पती आकाशसिंग राठोड यांची भेट झाली. आकाशसिंग राठोड हे प्राध्यापक आहेत. त्याच दरम्यान विवाह झाला. पती आकाशसिंग अमेरिकन नागरिक. देवयानी व आकाशसिंग यांना ७ व ४ वर्षांच्या दोन मुली. त्यांच्याच दुहेरी पासपोर्टचे प्रकरण देवयानी यांना सध्या भोवते आहे. देवयानी अमेरिकेत असताना, मोलकरीण संगीता रिचर्डला व्हिसा मिळवून देण्यासाठी केलेल्या अर्जात चुकीची माहिती भरल्याचा आरोप देवयानी यांच्यावर होता. संगीता रिचर्डनेही आपल्याला कमी पगार देऊ न राबवून घेत असल्याची तक्रार केली. अमेरिकेत घरेलू कामगार संघटना या नावाने मोलकरणींच्या हक्कासाठी न्यूयॉर्कमध्ये लढणाऱ्या अनन्या भट्टाचारजी यांच्याकडे संगीताने तक्रार केली. या तक्रारीमुळे देवयानी गोत्यात आल्या. देवयानी आपल्या मुलीला शाळेत पोहोचवण्यासाठी गेल्या असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना अंगझडतीला तोंड द्यावे लागले. आपला अपमान झाला, ही देवयानी यांची भावना होती. एक तर आयएफएस अधिकारी म्हणून आपल्याला राजनैतिक संरक्षण असताना अटक केलीच कशी? असा देवयानी यांचा प्रश्न होता. त्यानंतरही अंगझडती घेण्याचा अधिकार अमेरिकी अधिकाऱ्यांना कसा? असाही प्रश्न त्यांनी विचारला. हे प्रकरण भारत सरकारनेही लावून धरले. एवढे की, भारत आणि अमेरिका या जगातील दोन मोठ्या लोकशाही सरकारच्या संबंधात तणाव आला. पण, देवयानीवरील खटला आणि अमेरिकन वॉरंट कायम राहिले. २० जानेवारी २०१४ रोजी देवयानी यांना भारतात परतावे लागले. सरकारने त्यांना परराष्ट्र मंत्रालयातील डेव्हलपमेंट पार्टनरशिप खात्याच्या संचालिका पदावर नियुक्त केले. आता तरी सारे काही सुरळीत चालेल, असे अपेक्षित होते. पण, देवयानी यांनी आपल्या ७ व ४ वर्षांच्या मुलींचे अमेरिकन पासपोर्ट काढले आणि त्यासाठी परराष्ट्र खात्याची पूर्वपरवानगी घेतली नाही. तसेच, आजपर्यंत आपण बोललो नाही म्हणून आपले खूप नुकसान झाले, असा दावा करत जाहीर मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीही अशा वेळी प्रसिद्ध झाल्या, की भारताचे पंतप्रधान अमेरिकेत होते व देवयानी प्रकरणात भारत-अमेरिका संबंधात आलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत होते. या मनमोकळ्या मुलाखतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अडचण नक्कीच झाली असणार. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियमानुसार, मंत्रालयाची संमती न घेता मुलाखती देणे ही चूक आहे, तर मंत्रालयाच्या संमतीखेरीज दुहेरी पासपोर्ट काढणे हा गंभीर गुन्हा आहे. देवयानी यांच्यावर त्यासाठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. भारत व अमेरिका वाटाघाटीत देवयानी यांचे प्रकरण राजकीय मुद्दा म्हणून समाविष्ट केले जावे, म्हणून त्यानी आयएफएस सेवेतील अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवला होता, असाही आरोप आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्यातही देवयानी यांचे नाव असल्याची चर्चा आहे. देवयानी म्हणतात, परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याला मुलाखत देण्यास मनाई नाही. फक्त त्याने ती मते स्वत:ची असल्याचे स्पष्ट केले पाहिजे. मी दिलेल्या मुलाखती हे माझे वैयक्तिक मत आहे. तसेच, माझ्या मुलींचा जन्म अमेरिकेत झाला आहे. जन्माने त्या अमेरिकन आहेतच. त्यांच्यासाठी अमेरिकन पासपोर्ट घेण्याआधी परराष्ट्र मंत्रालयाला कळविले पाहिजे, असा नियम कोठे आहे? मुलींचा जन्म अमेरिकेत असूनही, मी आजपर्यंत त्यांचा अमेरिकन पासपोर्ट काढला नव्हता. अमेरिकन कायद्यानुसार आता मला पासपोर्ट काढावे लागले आणि ई-मेलचे म्हणत असाल, तर तो मी पाठवला किंवा नाही याबद्दल खात्रीलायक असे मी काहीच सांगणार नाही. असे सारे असले, तरीही देवयानी यांची राजीनामा देण्याची तयारी नाही. खरे काय आणि खोटे काय? सारेच संभ्रमात टाकणारे.
देवयानी खोब्रागडे अजूनही वादात का?
By admin | Published: December 23, 2014 1:06 AM