- किरण अग्रवाल
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रतिस्पर्ध्याचा प्रचारही सुरू होऊन गेला असताना काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ संपता संपेना, त्यामुळे महाआघाडीला येथे जिंकण्यासाठी लढायचे नाय की काय? अशी शंका घेतली जाणे रास्त ठरावे.
पक्षांतर्गत उमेदवारी मिळवण्याच्याच पातळीवर जेथे स्पर्धेला सामोरे जाण्यात शक्तिपात घडून येतो, तेथे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणात दमछाक होणे स्वाभाविक ठरते हा नेहमीचा अनुभव आहे, पण महाविकास आघाडी यातून बोध घेताना दिसत नाही. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील आघाडीच्या उमेदवारी घोषणेबाबत सुरू असलेला घोळही याबाबतच्या शंका उत्पन्न करून देणाराच म्हणता यावा.
राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघातील अनुक्रमे तीन व दोन अशा एकूण पाच जागांसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी भाजपची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांना घोषित झाली असून त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाआघाडीचा उमेदवार मात्र अद्याप ठरलेला नाही; त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या प्रारंभालाच अडथळ्याची शर्यत दिसून येणे क्रमप्राप्त ठरले आहे.
विधान परिषदेचा पदवीधर असो की शिक्षक मतदार संघ; यातील निवडणुकीसाठीचा प्रचार हा खूप नियोजनबद्ध पद्धतीने व निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्याही अगोदरपासून सुरू करावा लागत असतो. एकतर मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठे असतात व दुसरे म्हणजे मतदार विखुरलेले असतात, त्यामुळे जाहीर सभा लावली व वातावरण फिरले, असे अपवादाने होते. यात व्यक्तिगत गाठीभेटी व प्रचारावरच अधिक भिस्त असते, त्यामुळे त्यासाठी उमेदवाराला पुरेसा वेळ मिळणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते. भाजपने तेच लक्षात घेऊन व पूर्वानुभव पाहता प्रचारही सुरू करून दिला आहे. इतकेच कशाला, आम आदमी पार्टीच्या उमेदवारानेही आपला प्रचार आरंभला आहे; परंतु नामांकन दाखल करणे सुरू झाले तरी महाआघाडीचा उमेदवारच ठरायचा अजून पत्ता नाही.
तसे पाहता आघाडी अंतर्गत काँग्रेसने या मतदार संघावर दावा कायम ठेवला असला तरी यंदा शिवसेनाही लढण्याच्या तयारीत आहे, पण उमेदवारीचाच निर्णय झालेला नसल्याने संभ्रमावस्था आहे. अंतिमत: काँग्रेसच्याच वाट्याला लढणे येईल म्हणून अकोल्यातील इच्छुक डॉ. सुधीर ढोणे यांनी कधीपासूनच तयारी चालविली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. पाटील यांच्यावर शरसंधान करीत अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे श्रेय त्यांचे नसून आपले व काँग्रेसचे असल्याचा मुद्दा त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पुढे आणला. अमरावती विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत भाजप संबंधित पॅनलची झालेली पीछेहाट पाहता ती डॉ. पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचेही म्हटले गेले. थोडक्यात व्यक्तिगत पातळीवर ढोणे यांनी निवडणुकीच्या किल्ल्यावरून गोळाफेक चालविली आहे खरी, पण काँग्रेसकडून अजून उमेदवारीचाच निर्णय घेतला गेलेला नसल्याने त्यांनाही आता अगोदर उमेदवारीसाठी लढणेच गरजेचे होऊन बसले आहे. अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे उमेदवारीसाठी स्पर्धेत असल्याने व त्यांनीही मतदार नोंदणीत बऱ्यापैकी परिश्रम घेतलेले असल्याने निर्णयाकडे लक्ष लागून आहे.
तब्बल पाच टर्म हा मतदार संघ बी. टी. देशमुख यांनी सांभाळाला. त्यानंतर डॉ. पाटील यांनी दोन्ही निवडणुकीत विजय मिळवला. मितभाषी स्वभाव, दांडगा लोकसंपर्क व गतकाळात मंत्रिपदाच्या माध्यमातून केलेली कामे या पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. तसे भाजपात त्यांना सर्वमान्य स्वीकारार्हता नसली तरी देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार म्हणून व पक्षीय बांधिलकीच्या नात्याने अखेर सारे एकवटतात. त्यांच्या समोर तीन - तीन पक्षांचे एकत्रित बळ लाभलेला उमेदवार राहणार असल्याने यंदा लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मुंबईत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ''अगोदर सर्वांना अर्ज दाखल करू द्या, नंतर माघारीच्या वेळी बघू'' असे म्हटले; पण मतदार संघाची रचना व व्यापकता पाहता असा इतर निवडणुकांप्रमाणे ऐनवेळी उमेदवारीचा निर्णय घेतला जाणे हे त्या उमेदवाराची व एकूणच महाआघाडीचीही कसोटी पाहण्यासारखेच ठरणार आहे, हे पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ व जाणकार नेत्यास माहीत नसेल यावर विश्वास ठेवता येऊ नये. अर्थात काँग्रेसला ही जागा लढाईची आहे तर या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले का निर्णय घेऊन उमेदवार निश्चितीसाठी सहयोगी पक्षांकडे पाठपुरावा करताना दिसत नाहीत, हे अनाकलनीय आहे.
सारांशात, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा निर्णय तातडीने झाल्याखेरीज या संदर्भातील संभ्रमावस्था दूर होऊन प्रचारात गती येणार नाही. याबाबत कालापव्यय करणे हे प्रतिस्पर्ध्याच्या अनुकूलतेला हातभार लावणारेच ठरले तर गैर म्हणता येऊ नये.