- संदीप प्रधान
डोंबिवली हे सुशिक्षितांचे शहर. येथे सातत्याने सांस्कृतिक सोहळे होत असतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेपासून अनेक उत्सवांत येथील मंडळी हिरिरीने सहभागी होतात. त्याच शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ४२ वर्षांच्या गृहिणीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने एका २७ वर्षांच्या तरुणाचे गुप्तांग कापले. हा तरुण या महिलेशी शरीरसंबंध ठेवण्यास उतावीळ झाला होता. तो तिला सतत मेसेज, फोन करून त्रास देत होता. पंधरा दिवसांपूर्वी त्या तरुणाने चक्क तिचे घर गाठले व तिच्या पतीला तुझी बायको मला आवडते, असे सांगून आला. या महिलेची मुलगी २० वर्षांची आहे. या सर्व घटनांमुळे या महिलेचे माथे भडकले. तिने तिच्या साथीदारांसह या तरुणाला निर्जनस्थळी भेटायला बोलावले. तेथे तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. इतकेच करून ते थांबले नाहीत, तर त्या तरुणाचे हातपाय पकडून या तिघांनी त्याचे गुप्तांग कापले. सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचा थरकाप उडवणारी ही घटना होती.
ख्यातनाम नाटककार, कथाकार, कादंबरीकार जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' या नाटकात अंबिका शिवराम आपटे ही तिच्यावर बलात्कार करणाऱ्या गुलाबराव जाधव या मस्तवाल पुढाºयाला हीच लिंगविच्छेदनाची शिक्षा देते, असे ऐंशीच्या दशकात दाखवले होते. दळवी यांनी एका इंग्रजी कादंबरीवरून ही कल्पना घेतली होती. मात्र, जेव्हा रंगभूमीवर हे नाटक आले, तेव्हा त्याने खळबळ तर उडवून दिलीच, पण लिंगविच्छेदनाने पुरुषी अहंकाराचा समूळ नाश होतो का, या विषयावरील चर्चेला तोंड फोडले होते.
दळवी यांच्या वेगवेगळ्या नाटकांमध्ये 'बंडा' हे अदृश्य पात्र वावरताना दिसत होते. लोकशाही व्यवस्थेत लढून जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा कायदा हातात घेऊन न्याय देणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतीक हा बंडा राहिला आहे. पुरुष या नाटकातही अंबिकाला जेव्हा न्यायालयात लढून न्याय मिळत नाही. उलटपक्षी, अपमान, अवहेलना तिच्या पदरी येते, तेव्हा हा बंडा आणि त्याचे साथीदार गुलाबरावचे गुप्तांग छाटून त्याला अद्दल घडवतात. डोंबिवलीतील त्या महिलेने दळवींच्या नाटकापासून प्रेरणा घेतली किंवा कसे, ते ठाऊक नाही. मात्र, लोकशाही व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळणार नाही, असे गृहीत धरून तिने कायदा हातात घेतला. अर्थात, सध्या ती व तिचे दोन साथीदार पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
दळवी यांचे पुरुष नाटक जेव्हा रंगभूमीवर आले, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना व दलित पँथर या दोन संघटनांचा दबदबा होता. शिवसेनेच्या शाखा ही न्यायदानाची स्वयंघोषित केंद्रे होती. त्याचबरोबर दलित, गोरगरीब स्त्रियांना उपभोग्य वस्तू मानून त्यांचे शोषण करणाºयांना अद्दल घडवणाऱ्या पँथरचाही हिंसक दबदबा होता. दळवींच्या पुरुष व वेगवेगळ्या नाटकांतील बंडा हा पँथरचा कार्यकर्ता किंवा खांडके बिल्डिंगमधील शिवसैनिक वाटावा, असाच होता. रंगभूमीवर तीन अंकी नाटकानंतर डोकं सुन्न करणारी कल्पना म्हणून लिंगविच्छेदनाची कल्पना ठीक आहे. परंतु, खरोखरच डोळ्याच्या बदल्यात डोळा किंवा जीवाच्या बदल्यात जीव, या टोळीयुगातील आदिमकाळातील न्यायाच्या कल्पना ना ऐंशीच्या दशकात स्वीकारार्ह होत्या, ना आता आहेत.
युनायटेड नेशन्सने १९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केल्यानंतर महाराष्ट्रात व विशेषकरून मुंबई-पुण्यात स्त्री संघटना सक्रिय झाल्या होत्या. त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्यात दोन प्रबळ मतप्रवाह होते. एक स्त्रीवादी, तर दुसरा स्त्री-पुरुष समानतेचा. स्त्रीवादी भूमिका घेणाºया महिलांच्या चळवळीत पुरुषांना स्थान नव्हते. किंबहुना, त्यांचा प्रमुख शत्रू हा पुरुष होता. त्या महिलांना स्त्री केंद्रित व्यवस्था उभी करायची होती. मात्र, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडणाºया चळवळी स्त्री व पुरुष हे दोघे समाजातील पूर्वापार रुढी-परंपरांचे शिकार असून दोघांनाही या मनुवादी व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त होऊन समानतेवर आधारित नवी व्यवस्था प्रस्थापित करायची आहे, अशी मांडणी करत होत्या. गुप्तांग कापून टाकण्याची बंडा व अंबिकाची कृती काही जहाल स्त्रीवादी संघटनांनी उचलून धरली. मात्र, समानतेचा आग्रह धरणाºया चळवळींनी दळवी यांच्या कल्पनेला विरोध केला. सत्तर-ऐंशीच्या दशकात स्त्रियांनी अर्थार्जन करण्याची कल्पना अत्यंत कमी प्रमाणात स्वीकारली जात होती. प्रेमविवाह व मुख्यत्वे आंतरजातीय विवाह सहज स्वीकारले जात नव्हते. हुंडा घेऊन लग्न करण्यात गैर मानले जात नव्हते. स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची मानसिकता प्रबळ होती व त्याचा सर्वार्थाने मुकाबला करण्यास ती सक्षम नव्हती.
जागतिकीकरणानंतर जेव्हा कुटुंबाच्या गरजा झपाट्याने वाढल्या, स्वप्न पाहणे व पूर्ण करणे सहज शक्य झाले, तेव्हा स्त्री अर्थार्जनाकरिता बाहेर पडली. किंबहुना, तिला बाहेर पडणे अपरिहार्य झाले. त्यामुळे तिच्या शिक्षणाकडे लक्ष दिले गेले. तिच्या शब्दांचे कुटुंबातील वजन आपोआप वाढले. तिला जोडीदार निवडण्याचा अधिकार शहरी भागातील सुशिक्षित घरांत आपसूक प्राप्त झाला. एकीकडे हे स्वातंत्र्य तिच्या पदरी पडले. मात्र, तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही. उलट शिक्षण, पैसा यामुळे बाळसं धरलेल्या, फॅशन करणाऱ्या, मॉडेलिंग करणाऱ्या, कार्यालयात उच्चपदांवर बसून अधिकार गाजवणाऱ्या स्त्रियांकडे वखवखलेल्या नजरेने पाहण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, अनेक कामुक स्पर्शांना, अतिप्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ अनेकींवर येऊ लागली. अगदी अलीकडेच गाजलेली व चळवळीचे वैचारिक पाठबळ नसल्याने बुडबुडा ठरलेली 'मीटू' मोहीम हे त्याच वखवखलेल्या अनुभवांचा परिपाक होता. सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या पोर्नमध्ये लेडिज हॉस्टेलमध्ये, हॉटेलच्या टॉयलेटमध्ये किंवा गेस्ट हाउसच्या खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे ठेवून तिचे उघडेनागडे शरीर कॅमेऱ्यात कैद करून पाहण्यात आबालवृद्ध रममाण झालेले आहेत. किंबहुना, पोरगी किंवा स्त्री पटल्यावर तिला गेस्ट हाउसला घेऊन जायचे व मोबाइलमध्ये तिच्यासोबत शरीरसुख घेतानाची दृश्ये चित्रित करायची व ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन:पुन्हा तिचा उपभोग घ्यायचा, ही अलीकडच्या कामातुर पुरुषांची कार्यपद्धती झाली आहे. त्यामुळे एखाद्या विवाहितेला ठाऊक नसतानाही ती अनेकांच्या स्वप्नातली 'सविताभाभी' किंवा 'यल्लमा' अथवा आणखी कुणी सोशल मीडियावरील कामुक स्त्री झालेली असते. त्यापैकी एखाद्याकडे जरी ती खऱ्याखुऱ्या आयुष्यात आकर्षित झाली, तर ती या जाळ्यात फसते. अशाच 'व्हर्च्युअल कामातुरते'तून डोंबिवलीतील तो तरुण त्या विवाहितेच्या पाठीमागे हात धुऊन लागला असावा. कदाचित, ही विवाहित स्त्री त्याच्या स्वप्नातील सविताभाभी असू शकते. व्हर्च्युअल जगातील सविताभाभी ज्या सहजतेने शरीरसंबंधांना तयार होते, त्याच त्वरेने या महिलेने शरीरसुखाकरिता झटपट मान्यता द्यायला हवी, अशी त्या तरुणाची इच्छा असू शकते. शरीरसंबंधात तिच्या मनाची राजीखुशी अभिप्रेत आहे, हेच तो विसरून गेला आणि संकटात सापडला.
सत्तर-ऐंशीच्या दशकातील स्त्री चळवळींना स्त्री-पुरुष समानता हवी होती. भौतिक सुखाच्या बाबतीत काही अंशी ती साध्य झाली असली, तरी परस्पर संबंधांच्या दृष्टीने ती अजून साध्य झालेली नाही. स्त्रिया जागरूक झाल्याने विनयभंगाच्या, बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. हक्काकरिता आवाज उठवण्याची व वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याची त्यांची हिंमत वाढली आहे. मात्र, कुणा एका युवकाचे गुप्तांग कापल्यामुळे तमाम पुरुष स्त्रियांकडे समानतेच्या, आदराच्या दृष्टीने पाहू लागतील, असे मानणे हे चूक आहे.