- सविता देव हरकरेकोरोनाच्या महामारीनंतर जग पूर्ण बदललेले असेल. मानवी आयुष्याचा कायापालट होईल. नव्या युगास प्रारंभ होईल, असे तर्कवितर्क, अंदाज बांधले जात आहेत. कुणी म्हणतेय, जगातील अस्तित्वाची ही लढाई असणार आहे. कुणाला वाटतेय, भारत नव्या ताकदीने व विश्वासाने जगापुढे उभे राहणार असून, भविष्यात आपल्या देशाचे स्थान व भूमिकेला आंतरराष्टÑीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. हे ऐकत असताना एक प्रश्न राहून राहून मनात निर्माण होतोय की स्त्रियांच्या स्थानाचे काय? कुटुंबात, देशात आणि जगातही? तिच्या आयुष्यात काही चांगले बदल होणार आहेत की नाहीत? कारण, आजवरचा इतिहास बघता संकटे कुठलीही असोत त्याचा सर्वाधिक प्रभाव स्त्रीजीवनावर होताना दिसला. मग ते युद्ध असो वा धार्मिक हिंसाचार. प्रत्येक वेळी सोसत आली ती स्त्रीच. कोरोनाच्या संकटातही किंवा त्यानंतरच्या कथित नवयुगात या सर्वांपासून तिची सुटका कशी होणार?यासंदर्भात विद्यमान परिस्थितीचाच विचार करूया. जवळपास दीड महिन्यापासून लोक घरात कोंडले आहेत. त्यांच्या हालचालींवर प्रचंड नियंत्रण आलेय. बहुतांश घरांतील वातावरण बदलले आहे. घर व आॅफिसमधले अंतर संपले आहे. सर्वांचे लक्ष महामारीपासून बचाव आणि लॉकडाऊनचा काय परिणाम होतोय, यावर केंद्रित आहे; पण या नव्या कार्यपद्धतीत सर्वाधिक पोळली जातेय ती स्त्रीच. त्याचे पहिले व महत्त्वाचे कारण असे की, लॉकडाऊनच्या या काळात महिलांविरोधी कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे. खुद्द राष्टÑीय महिला आयोगाने हे निरीक्षण नोंदविले आहे. २० मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत आयोगाला देशभरातून ज्या ५८७ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यातील २३९ कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. विशेष म्हणजे २७ फेब्रुवारी ते २२ मार्चदरम्यान १२३ तक्रारी होत्या. याचा अर्थ नंतरच्या २५ दिवसांत शंभरावर प्रकरणे वाढली. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात शोषणकर्ता आणि शोषित दोघेही घरात बंदिस्त राहणार असल्याने कौटुंबिक हिंसा वाढू शकते, असा धोक्याचा इशारा आयोगाच्या अध्यक्षांनी आधीच दिला होता. तो खरा होताना दिसतोय. ही आकडेवारी प्रातिनिधिक समजायला हवी. कोरोनामुळे प्रदूषण जसे कमी झाले तसेच गुन्हेगारीलाही आळा बसल्याचा दावा केला जातो आहे; पण असा दावा करणाऱ्यांनी निश्चितच केवळ घराबाहेरील गुन्ह्यांचा विचार केला असणार, कुटुंबातील नव्हे असे दिसते. बराच काळ घरात राहिल्याने माणसाची मनोवस्था चलबिचल होते. सद्य:स्थितीत जवळपास सर्वांनाच या अनुभवातून जावे लागत आहे; पण लॉकडाऊन आहे, बाहेर जाता येत नाही म्हणून पुरुषांनी आपला राग घरातील महिलांवर काढणे योग्य नाही. अर्थात सरसकट सर्वच कुटुंबांमध्ये अशीच स्थिती आहे, असा अर्थ कुणी काढू नये. याला अपवादही आहेत. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये व्यसनाधीनांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे; कारण या काळात अडचण होतेय ती व्यसनाधीनांची. एखाद्याला व्यसन करायला मिळाले नाही की तो कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. त्याची मानसिक अवस्था सामान्य नसते. त्याची चिडचिड, संताप घरातील स्त्रीवर निघतो. खरे तर यानिमित्ताने व्यसनमुक्त होण्याची सुवर्णसंधी त्यांना प्राप्त झाली आहे; पण यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा लागेल. दुसरे असे की लॉकडाऊनमध्ये स्त्रियांचे ओझे दुप्पट झाले आहे. विशेषत: कामकाजी स्त्रियांचे. त्यांचे प्रोफेशन म्हणते की घरून काम करा आणि कुटुंबीय म्हणताहेत घरासाठी काम करा. घरकाम करणाºया महिलांचे येणे बंद आहे; त्यामुळे घरातील सर्व कामे व सोबत आॅफिसचे काम अशी तिची तारेवरची कसरत सुरू आहे. काही प्रगतशील पुरुष महिलांना घरकामात मदत करतात; पण त्यांची संख्या फार कमी आहे.आपल्या देशात महिलांवरील अत्याचार नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. ती शांततेत जगू शकणार नाही का? असा उद्विग्न सवाल सर्वोच्च न्यायालयाला विचारावा लागतो, एवढी स्थिती गंभीर आहे. स्त्रियांवरील अत्याचारांवर नियंत्रणासाठी शासनाने कितीही कठोर कायदे केले असले, तरी अत्याचार मात्र कमी झाले नाहीत, उलट वाढलेच असल्याचे दिसून येते.त्यामुळेच कोरोनाचा हा दैत्य जाताना तिच्याही आयुष्यात काही उत्साहवर्धक, सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी आशा करायला हरकत नाही. कोरोनाने पर्यावरणातील प्रदूषण कमी झाले तसेच स्त्रियांबद्दल संकुचित भावना बाळगणाºया मनांमधील प्रदूषण कधी कमी होणार, याची प्रतीक्षा आहे.(उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)
‘लॉकडाऊन’मध्ये महिलांवरील कौटुंबिक अत्याचार वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 2:43 AM