- सचिन जवळकोटे
अलीकडच्या काळात अनेक नवनवीन शब्द कानावर पडू लागल्यानं इंद्रदेव नारदमुनींना म्हणाले, ‘आज-काल मला दिल्लीतून दुटप्पीपणा तर मुंबईतून विश्वासघातकी असे शब्द वारंवार ऐकू येताहेत. हा काय प्रकार मुनी?’ हातातली वीणा झंकारत नारद उत्तरले, ‘सध्या भूतलावर दोन गट एकमेकांच्या जीवावर उठलेत, महाराज ! सारेच फिल्मी डायलॉगबाजी करण्यात रमलेत.’
‘अरे वा.. असं असेल तर सर्वांत भारी डायलॉग कुणाचा, शोध घ्या बघू.’ - महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून नारद भूतलावर पोहोचले. ‘गोकुळ’साठी पंचगंगेच्या किनारी कोल्हापुरी भाषेत भयंकर राडा सुरू असल्याचं त्यांना दिसलं. तिथल्या फ्लेक्सवरची अनोखी डायलॉगबाजीही भलताच टाइमपास करून गेली. बावड्यात बंटी भेटले. मुश्रीफांकडून येणारे तयार मेसेज वाचून ते मुन्नांवर टीकास्त्र सोडण्यात मग्न झालेले. म्हाडकांना संपविण्याच्या नादात बावडेकरांना कुणाकुणाशी जोडून घ्यावं लागतंय, हे पाहून मुनींनाही आश्चर्य वाटलं.
मात्र ‘बंटीं’नी डायलॉग टाकला, ‘जिनके अपने घर शीशों के होते है, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते.’ -त्यांना दाद देत मुनी साताऱ्याकडं सरकले. शशिकांत जावळीकरांकडं तिरका कटाक्ष टाकणाऱ्या धाकट्या राजेंचा आवाज कानी पडला, ‘मशवरा मत दो मुझे. मेरा वक्त खराब है.. दिमाग नही.’
दचकून मुनींनी ‘सुरुची’वरून ‘जलमंदिर’ गाठलं. तिथं थोरले राजे हातात ॲल्युमिनियम पात्र घेऊन नेहमीच्या स्टाईलमध्ये चुटकी वाजविण्यात रमलेले, ‘बर्तन खाली हो तो ये मत समझो, कि माँगने चला है. हो सकता है सब कुछ बांट के आया हो.’ त्यांच्या बोलण्यात रुबाब असला तरी खासदारकीच्या पोटनिवडणुकीचा सल होताच.
डोकं खाजवत मुनी बारामतीच्या बंगल्याजवळ पोहोचले. आतमधून जोरात आवाज येऊ लागलेला, ‘डोन्ट अँग्री मी. आता माझी सटकली.’ मुनींनी ओळखलं, नक्कीच अजित दादांचा आवाज. एवढ्यात अजून एक संवाद कानावर आदळला, ‘कितने आदमी थे? वो दो थे.. और तुम तीन. फिर भी खाली हाथ वापस आए?’
- डायलॉगबाजी संपल्यानंतर ते तिघे बाहेर आले. संजयभाऊ यवतमाळकर, अनिलभाऊ नागपूरकर अन् धनंजयभाऊ परळीकर यांना पाहून नारदांनी ओळखलं की ‘वो दो’ म्हणजे नक्कीच ‘देवेंद्र नागपूरकर’ अन् चंदूदादा कोथरूडकर.’ धनुभाऊ खूपच शांत-शांत दिसत होते. त्यांना याचं कारण विचारताच चॅनलचे कॅमेरे नाहीत नां, हे पाहात त्यांनी हळूच सांगितलं, ‘मेरी खामोशी को मेरी हार मत समझना. मै कुछ फैसले उपरवाले पर छोड देता हूँ.’
बाजूला उभे असलेले अनिलभाऊ कदाचित सीबीआय भेटीत काय-काय घडलं, हे सांगण्यासाठी आलेले. मात्र त्यांनी चेहऱ्यावर उसनं हसू आणत डायलॉग फेकला, ‘हम भी वही है जो किसी के पीछे नही खडे होते. जहां खडे हो जाते है, लाईन वहीं से शुरू हो जाती है.. हे ऐकून त्यांच्या पाठीमागं उभारलेले दोन-चार मिनिस्टर घाईघाईनं बाजूला सरकले. ‘आपल्याला नाही बुवा राजीनामा द्यायचा,’ असं पुटपुटत दोघं झटकन् निघूनही गेले.
पुढं एका लसीकरण केंद्रावर उद्धो अन् देवेंद्र आपापला स्वतंत्र फौजफाटा घेऊन लोकांसमोर उभारलेले. ‘आम्हीच कशी लसीची सोय केलीय,’ असं ठणकावून सांगू लागलेले. तेवढ्यात मलिकभाई मध्येच कॅमेऱ्यासमोर येऊन ‘ही लस मीच फुकटमध्ये दिली बरं का,’ याची आठवण करून देऊ लागले. तेवढ्यात देवेंद्रनी डायलॉग मारला, ‘मेरे पास सेंट्रल गव्हर्नमेंट है. सीबीआय है. आयपीएस लॉबी है. तुम्हारे पास क्या है?’ - तेव्हा शांतपणे ‘बारामती’कडे बघत ‘उद्धो’ एकच वाक्य बोलले, ‘मेरे पास थोरले काका है.. नारायणऽऽ नारायणऽऽ