सचिन जवळकोटे
सोलापूरचा हा महिना दोन ‘मामां’नी गाजविला. सोलापूरचं पाणी इंदापुरात पेटवून विनाकारण ‘बारामतीकरां’च्या बंगल्याभोवती बंदोबस्त लावण्याचा चमत्कार ‘पालकमामां’नी केला. खरं तर ‘अचाट प्रयोगाचे मानकरी’ हीच उपाधी त्यांना द्यायला हवी. त्यानंतर ‘अजितदादां’च्या केबिनचे उंबरठे झिजवून-झिजवून बंधू ‘बबनदादां’ची आमदारकी वाचविण्याची यशस्वी खेळी ‘संजयमामांं’नी केली. मात्र, या दोन मामांनी जे काही ‘गनिमी कावे’ रचले, ते एकट्यानंच. या कानाचं त्या कानाला कळू न देता.. म्हणूनच इथले कार्यकर्ते कुजबुजले,‘मामा म्हणू नये आपुला !’ लगाव बत्ती...
२२ एप्रिल -बारशात लगीन उरकण्याचा डाव !
ज्या पत्रामुळं अख्ख्या जिल्ह्यात हलकल्लोळ माजला, ते टाइप झालं बावीस एप्रिलला. अशा पद्धतीनं पत्र टाइप करून घेण्याचा अधिकार ‘पालकमामां’ना आमदार म्हणून तर नव्हताच. ते त्या खात्याचे मंत्रीही नव्हते. विशेष म्हणजे पाण्याचं सर्वेक्षण करण्यासाठी ना मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, ना कोण्या मंत्र्याला याची खबरबात. ‘जिल्ह्याचे पालक’ म्हणून ‘मामां’नी ‘पाटबंधारे’वाल्यांची तातडीनं बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना वाटलं, सोलापूरचा विषय असेल. पाणी सोलापूरचं होतं, विषय मात्र त्यांच्या मतदार संघाचा होता.
केवळ ‘उजनी’ धरण असलेल्या ‘जिल्ह्याचे पालक’ या अधिकारानं त्यांनी पूर्वेला जाणारं पाणी दक्षिणेला नेण्याचा घाट घातला. बारशात लगीन उरकण्याचा प्लॅन आखला. ‘वन-डे पिकनिक टूर’मधल्या आढावा बैठकीत सोलापुरी भल्याच्या केवळ बाता मारणाऱ्या या ‘पालकमामां’नी शेवटपर्यंत आपल्याला अंधारात ठेवलं, याचं शल्य सोलापूरकरांना आयुष्यभरासाठी लागून राहिलं. म्हणूनच अवघ्या सव्वा वर्षात जिल्ह्याला कळून चुकलं, ‘मामा म्हणू नये आपुला !’ लगाव बत्ती..
१८ मे -दिवसा ‘स्वाक्षरी’ दिसेना....स्वप्नात ‘राजीनामा’ हटेना !
‘पालकमामां’ची स्टोरी इंटरव्हलपर्यंत जोरात चालली. त्यानंतर ‘संजयमामां’ची हळूच एन्ट्री झाली. अख्ख्या जिल्ह्यात पाण्यावरून गदारोळ निर्माण झाला असला तरी बहुतांश नेते केवळ पत्रकं काढण्यात मश्गुल होते. ‘कमळ’वाले बोटं मोडत होते. ‘हात’वाले गुरगुरत होते तर ‘धनुष्य’वाले नुसतीच डरकाळी फोडत होते. ‘मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?’ असा प्रश्नार्थक सवाल करत ‘घड्याळ’वाले ‘बारामती’कडं दचकून पाहत होते.
ही नामी संधी ‘संजयमामां’नी अचूक ओळखली. तसं पाहायला गेलं तर संधी हुडकण्यात ‘मामा’ लय माहीर. म्हणूनच सध्या अपक्ष आमदार असूनही जिल्ह्यातल्या इतर आमदारांपेक्षा त्यांचा रुबाब जास्त. मात्र लोकसभेला घोडं कुठं पेंड खायला गेलं होतं कुणास ठाऊक. असो. पाणी प्रकरणात ‘मामां’नी सर्वप्रथम ‘अजितदादां’ची भेट घेतली. अगोदर ‘दादां’नी हा विषय खूप सिरीअस घेतला नाही. ‘बघूऽऽ करूऽऽ’ची भाषा झाली. मात्र, वातावरणातला तणाव त्यांना जाणवून दिला. एका तालुक्यापायी सारा जिल्हा विरोधात चाललाय, हे लक्षात आणून दिलं. तेव्हा मात्र ‘दादा’ गंभीर झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा बसण्याचं ठरलं. ‘मामां’नी संध्याकाळी ‘जयंतरावां’ची भेट घेतली. ‘सोलापूर-इंदापूरच्या वादात आपण कशाला उगाच पडा ?’ असाच तटस्थ आविर्भाव सुरुवातीला दिसला.. कारण काहीही निर्णय घेतला तरी कोणत्यातरी एका जिल्ह्यासाठी तेच ‘व्हिलन’ ठरणार होते. मात्र, त्याचवेळी तिकडून ‘दादां’चा कॉल आला. मूड बदलला. दुसऱ्या दिवशी ‘मामा’ थेट ‘थोरल्या काकां’नाही भेटले. विषय जास्त ताणायला नको, हे अनुभवी ‘काकां’च्या दूरदृष्टीनं अन् मनचक्षूनं केव्हाच ओळखलेलं. मात्र, तरीही त्यांनी ‘दादांशी बोलणं झालं का?’ एवढं विचारून खात्री करून घेतली. ‘मामां’नी होकार देताच ‘काकां’कडून ग्रीन सिग्नल मिळाला. तोपर्यंत ‘अजितदादा-जयंतराव’ यांच्यातही चर्चा झाली. ‘प्लस-मायनस’ची गणितं मांडली गेली. पाण्याची नव्हे.. मतदारसंघांची. अखेर ठरलं.तो आदेश आता रद्द होऊ शकतो, याची खात्री पटल्यावरच ‘मामां’नी मग ‘दीपकआबां’सह इतर स्थानिक नेत्यांना मंत्रालयात बोलावून घेतलं. पिक्चरच्या क्लायमॅक्समध्ये सारे कलाकार कसं हसत-खेळत एकत्र येतात, तसं. तिसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. सारे ‘जयंतरावां’च्या दालनात जमले. तिथं अखेर त्यांनी कॅमेऱ्यासमोर ‘रद्द’ची घोषणा करताच साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे एवढं सारं होईपर्यंत ‘पालकमामां’ना म्हणे यातलं काहीच नव्हतं ठाऊक.खूप मोठं मैदान मारल्याच्या आविर्भावात ‘संजयमामा’ आपल्या फार्महाऊसवर पोहोचले. परंतु, सोलापूरकरांचा या नेत्यांवरील विश्वास पूर्णपणे उडालेला. ‘तोंडी घोषणा नको.. हातात लेखी आदेश पाहिजे’चा नारा गावोगावी घुमू लागलेला. याचवेळी ‘बबनदादां’नाही कुठून हुरूप आला कुणास ठाऊक, त्यांनीही ‘राजीनाम्या’ची आवई दिली उठवून. त्यांच्या कार्यकर्त्यांना अप्रुप वाटलं,‘बाबोऽऽ किती हा त्याग!’ .. तर विरोधकांना संशय आला, ‘लेकराला आमदार करत्याती की काय’. यातच पाच-सहा दिवस गेले. तिकडं मंत्रालयात कागद सापडेना. अधिकाऱ्यांनाही पेन गवसेना. लेखी आदेश काही निघता निघेना. आता मात्र ‘निमगावा’त घालमेल वाढली. सकाळ, दुपार अन् संध्याकाळ ‘मामां’ना कॉल जाऊ लागले. ‘काय झालं पत्राचं ?’ असं खुद्द ‘बबनदादा’च ‘संजयमामां’ना विचारू लागले. कट्टर कार्यकर्त्यांना दिवसा ‘स्वाक्षरी’ दिसेना, तर रात्री स्वप्नातून ‘राजीनामा’ हटेना.
२७ मे सही करण्यापूर्वी ‘भरणेमामां’शी चर्चा..
‘दादा’ घायकुतीला आले. ‘मामा’ही फुल्ल टेन्शनमध्ये आले. शेवटी त्यांनी पुन्हा एकट्यानंच गुपचूप मुंबई गाठली. ‘अजितदादां’च्या दालनातच ‘जयंतरावां’ची भेट घेतली. मात्र, ते तर वेगळ्याच मूडमध्ये. ‘आपण अगोदर भरणेमामांना इथं बोलावून घेऊ. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू. मगच पत्राचं बघूऽऽ’ अशी नवीनच भाषा कानी पडताच ‘संजयमामा’ दचकले. ‘आम्हाला विचारून त्यांनी पूर्वी पत्र काढलं होतं का ? मग आताच त्यांना विचारायची काय गरज ?’ असा पॉइंट टू पॉइंट सवाल करताच विषय क्लोज झाला. हो-ना करता-करता पत्र तयार झालं. ज्यानं पूर्वी पत्रावर गुपचूप सही केली होती, त्याच अधिकाऱ्याची स्वाक्षरी सर्वांसमक्ष ‘रद्द’च्या आदेशावर चमकली. पत्र घेऊन ‘संजयमामा’ मोठ्या ऐटीत बाहेर आले. पीएनं फोटोसेशन सुरू केलं. सोबत उभारलेले ‘भीमा’चे मुन्ना, ‘चंद्रभागा’चे कल्याणराव अन् ‘विठ्ठल’चे भगीरथही फ्लॅशसमोर चमकले. फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटोतली मंडळी बघून अनेकांना वाटलं,‘वॉवऽऽ आपल्या पाण्यासाठी नेत्यांची किती पळापळ!’ पण यातली खरी मेख फक्त त्या तिघांनाच ठाऊक होती. ते तिथं जमले होते, केवळ त्यांच्या साखर कारखान्यांचे प्रॉब्लेम दूर करायला. थकीत कर्जाला मुदत मागायला. चुकून तिथं त्यांना ‘मामा’ भेटले. या लेखी पत्राच्या पाठशिवणीचा खेळ इथंच त्यांना कळालेला. खरंतर यात या बिच्चाऱ्या नेत्यांचा तरी काय दोष?.. कारण ‘संजयमामां’नी शेवटपर्यंत कुणालाच या गोष्टी कळू न दिलेल्या. पहिल्या ‘मामां’चा गनिमी कावा दुसऱ्या ‘मामां’नी गनिमी काव्यानंच हाणून पाडलेला. दोन्हीही ‘मामा’ त्यांच्याच कार्यकर्त्यांना न उमजलेले. म्हणूनच ‘मामा म्हणू नये आपुला’. लगाव बत्ती...
( लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)