- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंडसंपूर्ण जगात १० जानेवारी २०२२ पर्यंत ४७० कोटी लोकांना कोविड-१९ लसीचा एक डोस, तर ३९० कोटी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. बूस्टर डोसची संख्या धरून जगभरात ९०० कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४० % नागरिकांना दोन डोस मिळाले आहेत. दुर्दैवाने आफ्रिकन देश यामध्ये खूप मागे असून, तेथील १० % लोकसंख्येलासुद्धा अजूनही दोन डोस मिळालेले नाहीत. कदाचित आफ्रिकेतील लसीकरण इतर देशांसारखेच वेगाने झाले असते तर ओमायक्रॉनचा उद्रेक थांबविता आला असता.मात्र, ज्या वेगाने जगभरात लसीकरणाला प्रतिसाद मिळाला, त्याच वेगाने कोविडच्या लसीकरणाला विरोधही झाला आहे. याची सुरुवातच जगातील सर्वांत प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतून झाली. डिसेंबर २०२० पासूनच अमेरिकेत आणि नंतर युरोपमध्ये लसीकरणाला विरोध करणारे समूह तयार झाले. त्यांनी लसीबद्दलची चुकीची माहिती आणि गैरसमज लोकांच्यात पसरवायला सुरुवात केली. हळूहळू याचा प्रसार भारतामध्येसुद्धा झाला आणि त्यामुळेच मार्च २०२१ ते मे २०२१ आणि पुन्हा नोव्हेंबर २०२१ पासून भारतामधील लसीकरणाचा वेग कमी झाला.आता हा मुद्दा पुन्हा चर्चेला यायचे कारण म्हणजे युरोपमधील फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि जर्मनी या देशांनी कोविड लसीकरण सक्तीचे केले, तर भारत सरकारने लसीकरण सक्तीचे असणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने टेनिस खेळण्यासाठी कोणतीही लस न घेतल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने त्याची परतपाठवणी केल्याने लस-विरोधाचा हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.लसीकरण- सक्तीच्या विरोधात युरोपात मोर्चे निघताहेत. फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रियातले हे लोण आता इटली, स्पेन आणि इतर देशांत पसरले आहे. अमेरिकेत अनेक लसीकरणविरोधी समूह आहेतच. जानेवारी २०२१ पासून जगात लसीकरण सुरू झाले नसते, तर जगभरातील कोविडमुळे आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत, ते पाचपटीने वाढले असते. दुसऱ्या लाटेत ब्रिटनमध्ये एकेदिवशी सर्वोच्च म्हणजे ४० हजार कोविड रुग्णांची नोंद झाली होती आणि त्याच दिवशी मृत्यू होते १८०० आणि यातील ९५ % मृत्यू हे वृद्ध लोकांचे होते. त्यानंतर ब्रिटनमध्ये वेगाने लसीकरण झाले. जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा रुग्णसंख्या २,३०,००० पर्यंत पोहोचली. मात्र, त्यावेळी मृत्यू फक्त २०० नोंदवले गेले. म्हणजेच रुग्णसंख्या सहापटीने वाढूनही मृत्यू मात्र नऊ पटीने कमी झाले. हे शक्य झाले फक्त लसीकरणामुळे.भारतात दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या ४ लाख एवढी नोंदवली होती आणि सर्वोच्च मृत्यू ४००० होते. सध्याच्या तिसऱ्या लाटेत वेगाने रुग्णसंख्या वाढत असूनही मृत्यू मात्र दुसऱ्या लाटेच्या दहापट कमी नोंद होत आहेत. हासुद्धा लसीकरणाचाच फायदा आहे. याच वेगाने जर लसीकरण होत राहिले तर इथून पुढे येणाऱ्या सर्व लाटांमध्ये मृत्यूदर नगण्य राहील किंवा तीव्रतेची लाट येणारच नाही. त्याचबरोबर सर्वच लोकसंख्येला लसीच्या बूस्टर डोसची गरज लागणार नाही. अर्थात, लस घेतली तरी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो; पण तो सौम्य प्रकारचा संसर्ग असेल आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणार नाही. साधारणपणे सध्या जगभर हेच चित्र दिसत आहे. भारतात दोन वर्षांपासून सर्वच प्रकारची शैक्षणिक आस्थापने कमी-अधिक प्रमाणात बंद आहेत. याउलट सर्व युरोपियन देश, ब्रिटन, जपान, अमेरिका, कॅनडा या देशांत वेगाने लसीकरण करून लहान आणि मोठ्या मुलांच्या शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठे सुरळीत चालू ठेवून मुलांचे आणि तरुणांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले गेलेले नाही. त्यामुळे भारतीयांनी मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून स्वतःबरोबरच सरकारी नियमाप्रमाणे मुलांचेही लसीकरण करून घ्यावे.
जोकोविचच्या नादी लागू नका, लस घ्या, मुलांनाही द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 5:23 AM