इस्रायल-हमास युद्धाने अद्याप तरी प्रादेशिक संघर्षाचे स्वरूप धारण केलेले नाही; परंतु ताज्या घटनाक्रमामुळे तशी चिंता नक्कीच वाटू लागली आहे. पॅलेस्टिनींच्या ताब्यातील दोन भूभागांपैकी वेस्ट बँकने आतापर्यंत युद्धापासून अंतर राखले होते. गुरुवारी इस्रायली सैन्याने इस्रायलव्याप्त वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवायांमध्ये तीन पॅलेस्टिनी ठार झाले. हे प्रकार वाढल्यास वेस्ट बँकमध्ये उद्रेक वाढून, तेथील फतह सरकारवर युद्धात उतरण्यासाठी दबाव वाढू शकतो. आधीच गाजा पट्टीतील एका रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात तब्बल ५०० जण ठार झाल्याने इस्रायलच्या विरोधात जगभर विशेषतः मुस्लीम देशांमध्ये, रोष वाढू लागला आहे. हमासने केलेल्या नृशंस हल्ल्याचा बहुतांश देशांनी निषेध केला होता आणि इस्रायलप्रती सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर इस्रायलने हमासच्या निर्दालनाचा प्रण केला, तेव्हाही इस्रायलच्या विरोधात फार तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. हमासने सर्वसामान्य इस्रायली नागरिकांसोबत जे केले ते अत्यंत निंदनीय असल्याची जाणीव असल्यामुळे काही अपवाद वगळता, मुस्लीम देशांमधूनही फारसा इस्रायलविरोधी सूर उमटला नाही; परंतु रुग्णालयावरील हल्ला आणि वेस्ट बँकमधील कारवायांमुळे मुस्लीम देशामध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. जगभरातील इतर देशामधील मुस्लीम समुदायदेखील इस्रायलच्या आक्रमक भूमिकेच्या विरोधात रस्त्यांवर उतरून निदर्शने करू लागले आहेत. उच्च तंत्रज्ञान व आर्थिक ताकदीच्या बळावर इस्रायलने एक शक्तिशाली देश म्हणून ओळख निर्माण केली असली तरी, अमेरिकेचे संपूर्ण पाठवळ असल्यामुळेच इस्रायलची मध्य-पूर्व आशियात दादागिरी चालते, ही वस्तुस्थिती आहे.
आताही इस्रायल-हमास संघर्षास प्रारंभ होताच, अमेरिकेने आपल्या अजस्त्र विमानवाहू नौकांपैकी एक तातडीने भूमध्य समुद्रात तैनात केली. त्यानंतर दुसरी विमानवाहू नौकाही त्या दिशेने रवाना केली आहे. अमेरिका संपूर्ण ताकदीनिशी इस्रायलच्या पाठीशी उभी असल्याचा संदेशच अमेरिकेने त्या माध्यमातून पॅलेस्टिनविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या देशांना दिला आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः इस्रायल आणि पॅलेस्टिनला भेट देऊन गेले. ते इस्रायलचा शेजारी देश आणि अगदी प्रारंभापासून इस्रायल पॅलेस्टिन संघर्षातील एक प्रमुख खेळाडू •असलेल्या जॉर्डनलाही भेट देणार होते; परंतु जॉर्डनने त्यांचे आदरतिथ्य करण्यास नकार देऊन, मुस्लीम जगतातील अस्वस्थतेसंदर्भात एक प्रकारचा कठोर संदेशच दिला. बायडेन परतत नाहीत तोच, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेदेखील इसायलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनीही इस्रायलला निःसंदिग्ध समर्थन जाहीर केले आहे. इस्रायलच्या पाठीशी उभे राहणे ही अमेरिका, ब्रिटन आणि त्यांच्या मित्र देशांची मजबुरी आहे; परंतु त्यामुळे तणाव निवळण्याऐवजी जागतिक शांततेला धोका निर्माण होऊ बघत आहे, हे ते विसरत आहेत. हमासने प्रारंभी कितीही वल्गना केल्या असल्या तरी, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये झालेला काही प्रमुख कमांडरचा मृत्यू आणि समोर दिसत असलेल्या सर्वनाशामुळे ती संघटना आता बरीच नरमली असून, इस्रायलने हल्ले थांबविल्यास ताब्यात असलेल्या सर्व इस्रायली नागरिकांची सुटका करण्यास राजी झाली आहे. युद्ध संपवून शांतता निर्माण करण्याची एक चांगली संधी त्यामुळे निर्माण झाली आहे. अर्थात दहशतवाद्यांसोबत चर्चा नाही हे इस्रायलचे धोरण असल्याने आणि तो देश हमासला दहशतवादी संघटना संबोधत असल्याने, इस्रायल व हमासदरम्यान थेट चर्चा शक्यच नाही; पण वेस्ट बँकमधील पॅलेस्टिन सरकार, तसेच इस्रायलसोबत राजनैतिक संबंध असलेले इजिप्त, संयुक्त अरब अमिरातीसारखे अरब देश यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
कालपरवाच इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी भारताने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भारताचे इस्रायल आणि पॅलेस्टिन या दोघांसोबतही उत्तम संबंध आहेत. त्यामुळे भारतही यात योगदान देऊ शकतो. हमासच्या नरमाईमुळे निर्माण झालेली चांगली संधी हातची जाऊ नये, यासाठी आता इस्रायलवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. सोबतच पॅलेस्टिनची भूमी ही पॅलेस्टिनी आणि ज्यू या दोन्ही वंशांची मायभूमी असल्याची वस्तुस्थिती त्या दोन्ही समुदायांनी मान्य करावी, यासाठीही प्रयत्नांची गरज आहे. त्यातूनच इस्रायल व पॅलेस्टिन या दोन राष्ट्रांच्या निर्मितीसंदर्भातील संयुक्त राष्ट्रांचा ठराव आणि ओस्लो कराराची अंमलबजावणी होऊन, मध्यपूर्वेतील कायमस्वरूपी शांततेचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.