किरण अग्रवाल -राजकीय आंदोलनांकडे लक्ष वेधले जावे म्हणून त्यात अभिनवता आणली जाते; परंतु काही आंदोलनांमधील अभिनवता केवळ प्रदर्शन न राहू देता जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारली तर संबंधित समस्यांच्या निराकरणाचे मार्ग त्यातूनही प्रशस्त होऊ शकतात. दुर्दैवाने दिखाऊपणाच्या नादात व प्रसिद्धीच्या सोसात गरजेच्या बाबींचा अंगीकारही राहूनच जातो आणि मग असेच मुद्दे चर्चेत येऊन गेल्याखेरीज राहत नाही. इंधन दरवाढीच्या मुद्यावरून काँग्रेसने विविध ठिकाणी काढलेल्या सायकल मोर्चाकडेही याचदृष्टीने बघता यावे. (Don't protest, Cycling should be accept as a part of lifestyle)
इंधनाचे दर दिवसागणिक वाढत असून सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध पक्षांतर्फे आंदोलने केली जात आहेत, यात काँग्रेसतर्फे राज्यात जागोजागी सायकल रॅली काढण्यात आली. पेट्रोल, डिझेलचे दर इतके वाढले आहेत की सामान्यांना ते परवडेनासे झाले असून, आता सायकल वापरण्याची वेळ आली आहे, असे यातून सुचवायचे होते. सायकलच्या वापरामागील सदर कारण हे नाइलाजातून ओढवलेले व निषेधाच्या प्रदर्शनाचे आहे हे खरे, परंतु तसे जरी असले तरी आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगला व्यायाम म्हणवणारी सायकलिंग या निमित्ताने का होईना केली जाणार असेल तर ते लाभदायकच म्हणायला हवे. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या काही शहरांमध्ये ‘सायकल वापरा’बाबतची चळवळ मोठ्या प्रमाणात जोर धरताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात डॉक्टर्सचाही सहभाग आढळून येतो, त्यामुळे सामान्यांचाही त्यास प्रतिसाद वाढला आहे, तेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून सायकलचा वापर केला जाणार असेल तर ते अंतिमतः संबंधितांच्या हिताचेच ठरणार आहे. शिवाय आंदोलनाच्या निमित्ताने का होईना, चार चाकी वाहनाची व मोटारसायकलची सवय जडलेल्या राजकीय नेत्या, कार्यकर्त्यांना सायकल चालवून बालपणात हरवायची संधी मिळाली, हेही नसे थोडके. आंदोलनातील प्रदर्शनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहता येऊ शकते हेच यातून लक्षात यावे.
पेट्रोल, डिझेलप्रमाणेच स्वयंपाकाचा गॅसही महागल्याने काही ठिकाणी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक केला गेला व या दरवाढीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. पारंपरिक निषेध मोर्चे न काढता अगर धरणे न धरता केल्या जात असलेल्या या आंदोलनात वेगळेपण आहे हे खरे, पण आंदोलनाचा विषय बाजूस सारून अलीकडच्या काळात हद्दपार होत असलेल्या चुलीवरील स्वयंपाकाचा विचार केल्यास त्यातील लज्जतदार चवीचा आनंद स्मरून गेल्याखेरीज राहत नाही. आधुनिकतेच्या ओघाने म्हणा, की कालमानानुरूप बदलत्या जीवनशैली प्रमाणे; आज अधिकतर घरात गॅस शेगडीवरील स्वयंपाक होऊ लागला आहे; परंतु चुलीच्या राखेत शेकलेल्या भाकरीची सर गॅसवरच्या भाकरीत कशी येणार? तेव्हा अशा आंदोलनकर्त्यांनी अपवाद म्हणून का होईना कधीतरी चुलीवर स्वयंपाक करून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या नातवांना त्यावरील स्वयंपाकाची चव काय असते, हे चाखायची संधी द्यायला काय हरकत असावी? दुसरे म्हणजे, आता पावसाळा सुरू झाला आहे. जागोजागी रस्त्यात खड्डे पडतील व त्यात पावसाचे पाणी साचून अपघात घडतील, असे घडू लागताच परंपरेप्रमाणे रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करायचे आंदोलन हाती घेतले जाईल; हरकत नाही. यातही समस्येकडे लक्ष वेधण्याची अभिनवता निश्चित आहे, परंतु याच मंडळीने याच पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून त्यातही वृक्षारोपण केले तर पर्यावरणाला मोठा हातभार लागू शकेल; पण ते कुणी करत नाही.
अभिनवतेचे सोडा, परंतु कधी कधी काही आंदोलनांची व ते करणाऱ्या आंदोलकांची गंमतही वाटून जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास बऱ्याचदा अमुक एखादी गोष्ट होत नाही म्हटल्यावर त्याचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन केले जाते. काही बाबतीत तर चक्क मुंडनही केले जाते. गंमत किंवा आश्चर्य याचे, की अशा आंदोलन करणाऱ्यांपैकी काहींनी स्वत:च्या कुटुंबातील पितरांचे श्राद्ध कधी घातलेले नसते किंवा आप्तेष्टाच्या वियोगात मुंडन केलेले नसते. अशी मंडळी जेव्हा राजकीय आंदोलनात हिरीरीने पुढे होतात तेव्हा मूळ विषयाखेरीजच्या चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात, आंदोलनासाठी आंदोलन किंवा प्रदर्शन करणे वेगळे आणि स्वत:च्या जीवनात त्याबद्दलचे वेगळेपण अंगीकारणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. उक्ती व कृतीमधील फरक जसा असतो तसे याकडे बघता यावे, एवढेच यानिमित्ताने.