- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
नव्या वर्षातला सर्वात मोठा विनोद तुम्ही ऐकला की नाही? - ‘पाकिस्तानबांगलादेशला सर्व प्रकारे मदत करेल’, असे उद्गार पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दारसाहेब यांनी काढले आहेत. यावर काय म्हणावे? मागच्या वर्षी पिठासाठी पाकिस्तानमध्ये लांबच लांब रांगा लागत होत्या, आठवते? आपल्याकडे एक म्हण आहे : खिशात नाही आणा, पण मला बाजीराव म्हणा ! पाकिस्तानची ही अशी अवस्था आहे.
वास्तवात इशाक दार पुढच्या महिन्यात बांगलादेशमध्ये जाणार आहेत आणि तूर्त ते इतक्या उत्साहात दिसतात की, इतिहासातल्या कत्तली, बलात्कार विसरून त्यांनी बांगलादेशला आपला ‘हरवलेला भाऊ’ म्हटले. १९७१ साली पाकिस्ताननेच या सगळ्या गोष्टी त्यांच्या ‘भावाच्या’ घरात केल्या होत्या, तेव्हा तो भाऊ स्वतंत्र झालेला नव्हता. आता शेख हसीना सत्तेवर नाहीत आणि बांगलादेशात भारताविषयी द्वेषाची पेरणी करणारी सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशशी सख्य करण्याच्या हेतूने या ‘भावा’ला सर्व प्रकारची मदत करण्याच्या वल्गना हा देश करत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, मनात आणले तर बांगलादेश पाकिस्तानला विकत घेईल.
मागच्या एका दशकापासून पाकिस्तानचा आर्थिक विकासदर तीन ते चार टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे. मधली १-२ वर्षे, तर तो एक टक्क्यापेक्षाही कमी होता. याउलट बांगलादेशचा आर्थिक विकासदर सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शेख हसीना यांना पदच्युत केले गेले, तेव्हा बांगलादेशची आर्थिक व्यवस्था ४५४ अब्ज डॉलर्सची होती आणि पाकिस्तानची जेमतेम ३४० अब्ज डॉलर्सची ! सध्या ही परिस्थिती बहुतेक अशीच असणार. पाकिस्तानमधील गरिबीचा दर ३९ टक्क्यांपेक्षा जास्त असताना, बांगलादेशातील गरिबीचा दर ११ टक्क्यांपेक्षाही कमी होता, असे जागतिक बँकेची २०२२ची आकडेवारी सांगते. पाकिस्तानच्या स्वत:च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार गतवर्षी तेथील दरडोई उत्पन्न १५६८ डॉलर्स होते. बांगलादेशमधील हा आकडा तेव्हा २६८७ डॉलर्स होता. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री दार आपल्या ‘हरवलेल्या भावा’ला कसली मदत करणार?
१९६० मधे पश्चिम पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशच्या लोकांच्या तुलनेत ३० टक्के जास्त होते. जे १९७० मध्ये वाढून ८० टक्के झाले. ज्या बांगलादेशात कापूस पिकवला जात नाही, तो देश तयार कपड्यांच्या निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेला आहे. वस्तू तथा सेवा क्षेत्रात बांगलादेशने गत वर्षी ६४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली, पाकिस्तानची निर्यात होती केवळ ३५ अब्ज डॉलर्स ! बांगलादेशने हा टप्पा शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली गाठला.
शेख हसीना यांच्याही काही चुका झाल्या असतील; परंतु देशाला विकासाच्या रस्त्यावर न्यायचे असेल, तर उपद्रवी घटकांचा कठोरपणे सामना करणेही गरजेचे असते, हे कसे नाकारता येईल? शेख हसीना यांनी कट्टरपंथीयांना लगाम घातला आणि देशाला विकासाच्या रस्त्यावर नेले. परंतु, भारताला त्रास देणाऱ्या लोकांना सत्तेवर आणण्यासाठी विदेशी शक्तींनी शेख हसीना यांना कटकारस्थान करून हटवले. पण, दोन-दोन फुटांचे तीन लोक एकत्र आणले, तर ते सहा फुटांचे होत नाहीत. भारत हा एक समुद्र आहे, ज्याला कोणीही अडवू शकत नाही. प्रवाह थांबला, तर त्या थबकलेल्या पाण्यावर शेवाळ साठते हे भारताला ठाऊक आहे.
भारताचे काही शेजारी नाराज असतील, तर आता संधीचा फायदा घेऊन बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवता येईल, असे पाकिस्तानला वाटू लागले आहे, परंतु या रस्त्याने जाऊन जर बांगलादेश आर्थिक अवनतीच्या दिशेने गेला, तर तेथील जनता ते सहन करील काय? भारताशिवाय बांगलादेश चालू शकत नाही. त्याची जवळपास ९४ टक्के सीमा भारताशी जोडलेली असून, जवळपास तो घेरला गेलेला आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशचे सध्याचे नेतृत्व किती काळ भारतविरोधी बिगुल वाजवत राहिल? भारताची मदत घेतल्याशिवाय बांगलादेशची आर्थिक स्थिती किती काळ ठीक राहू शकेल?
दुर्दैवाने बांगलादेशात धार्मिक पत्ते खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या देशात नऊ टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे, ही गोष्ट तेथील विद्यमान नेतृत्वाच्या लक्षात यायला हवी. सरकारी नोकरीमध्ये, तर ही संख्या १५ टक्क्यांच्या आसपास आहे. पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले, तरी या सर्व चित्रातून भारताच्या खुणा हटवता येणार नाहीत. मोहम्मद युनूस देशाला हुकूमशाहीच्या दिशेने नेत आहेत का, अशी शंका व्यक्त करायला जागा आहे. शेख हसीना देशात नाहीत आणि ‘लवकर निवडणुका घ्या’, अशी मागणी करणाऱ्या खलिदा झियाही सध्या लंडनमध्ये गेलेल्या आहेत.
म्हणजे, देशात राजकीय नेतृत्वाचा पूर्णपणे अभाव आहे. मात्र, शेख हसीना या राखेतूनही पुन्हा उभ्या राहू शकतील, अशा राजकीय नेत्या आहेत. त्यांचा पक्ष भूमिगत असला, तरी त्याची ताकद संपलेली नाही. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय बांगलादेशला पाकिस्तानच्या रस्त्यावर नेऊ पाहते हे उघड आहे. ज्या सैन्याला तुम्ही बांगलादेशच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी बोलावता आहात, त्याच सैन्याने आणि आयएसआयने पाकिस्तानला नरकात ढकलले आहे, हे विसरू नका, मोहम्मद युनूस. तुम्हालाही बांगलादेशला नरकाच्या दिशेने घेऊन जायचे आहे का?